कर्नाटकात आज मतमोजणी

0
13

>> निकालाची उत्सुकता; भाजप सत्ता राखणार का?

बहुप्रतीक्षित कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवार दि. 13 मे) होणार असून, त्यात मतमोजणीअंती कर्नाटकची सत्ता कोणाच्या हातात जाते, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या निवडणुकीत 2615 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांचे राजकीय भवितव्य शनिवारी स्पष्ट होणार आहे. बहुमताचा आकडा 113 हा असून, मतदानोत्तर चाचण्यांत त्या आकड्यापर्यंत काँग्रेस पोहोचत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. ज्याचे नेतृत्व बसवराज बोम्मई हे करत आहेत; पण या निवडणुकीच्या निकालानंतर कर्नाटकची सत्ता कोणाच्या हाती जाणार यावर वेगवेगळे राजकीय अंदाज वर्तवले जात आहेत.
बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांत (एक्झिट पोल) काँग्रेस आणि भाजप यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यात काही एक्झिट पोलनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का बसण्याची चिन्हे असून, काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अंदाजांमुळे भाजपची धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 113 इतका आहे. त्यामुळे हा जादुई आकडा गाठण्यात आता कोणता राजकीय पक्ष यशस्वी होईल हे शनिवारीच स्पष्ट होईल.
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठीच्या मतमोजणीला 13 मे रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 36 मतमोजणी केंद्रांवर सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी
व्यक्त केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे राजकीय महत्त्व कर्नाटकच्या राजकारणापुरते मर्यादित नसून 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही ते महत्त्वाचे मानले जात आहे. कर्नाटकच्या निवडणूक निकालांचा 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीशी संबंध जोडला जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 400 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव झाला, तर केंद्रातील या सत्ताधारी पक्षाला 2024 च्या निवडणुकीसाठी ठेवलेले आपले लक्ष्य गाठणे अवघडच नव्हे, तर अशक्य होईल, असे बोलले जात आहे.