– विष्णू सूर्या वाघ
गोमंतकीय रंगभूमीच्या इतिहासात ‘हंस संगीत नाट्य मंडळ’ या संस्थेचा अध्याय वेगळा लिहावा लागेल. ‘हंस’ ही केवळ एक नाट्यसंस्था नव्हती; ते एक कुटुंब होते. निस्सीम नाट्यवेडानं भारावलेला जातिवंत ‘नाटक्यां’चा तो एक परिवार होता. रंगभूमीच्या मुशीत जन्माला आलेल्या या लोकांनी जोडलेली नाती रक्ताच्या नात्यांपेक्षा अधिक बळकट होती. विश्वनाथ नाईक यांनी लावलेलं ‘हंस’चं झाड दिवसेंदिवस फुलत गेलं. त्याचा विस्तार वाढत गेला. विश्वनाथ नाईक, सूर्या वाघ, बाबनी गावकर, किशोर बोरकर, शांताराम नाईक, नरसिंह नाईक, अलका वेलिंगकर, किशोरी हळदणकर, शशिकला नागेशकर, तुकाराम फोंडेकर, शांताराम नावेलकर, केशव वाघुर्मेकर, कांता पारकर अशी कितीतरी या परिवारातील मंडळी ‘नाटक’ हा एकमेव ध्यास घेऊन जगली. या परिवारातला शेवटचा शिलेदार परवा गेला- तुळशीदास लोटलीकर.
गोमंतकीय रंगकर्मींची जुनी पिढी आता जवळपास लयाला गेल्यात जमा आहे. विशेषत: गोमंतकीय संगीत रंगभूमीच्या वैभवशाली कालखंडाचे मानकरी आज दिसणे दुरापास्त झालेय. या पार्श्वभूमीवर ‘तुळशीदास लोटलीकर’ या गुणसंपन्न कलाकाराची आठवण नेहमी येत राहील. तुळशीदास लोटलीकर हे माझ्या वडिलांच्या बरोबरीने काम करणारे. अनेक नाटकांतून अभिनयाचे धडे त्यांना सूर्या वाघ यांनीच दिले होते. ‘हंस’च्या कुटुंबात आम्ही त्यांना ‘तुळशीदासमामा’ म्हणायचो. तरुण वयात त्यांचे रूप अत्यंत राजबिंडे होते. गौर वर्ण, धारदार नाक, भेदक नजर, किंचित घारे डोळे, पसरट हसरे ओठ, सुंदरशी हनुवटी, डौलदार अंगयष्टी आणि भारदस्त चाल असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्या काळी मी, दिलीपकुमार, रवींद्र वगैरे मुले त्यांना थट्टेने ‘हंस’चा रवींद्र महाजनी म्हणत असू. देखणेपणाच्या बाबतीत दावा सांगता येईल असे दोनच नट ‘हंस’कडे होते- ते म्हणजे स्वत: विश्वनाथकाका आणि दुसरे तुळशीदासमामा.
तुळशीदासमामांकडे ऍडीशनल क्वालिफिकेशन होतं ते म्हणजे गायनसिद्धी. अतिशय गोड, खडा तितकाच मुलायम आवाज. बहारीने गाणारा ‘हंस’च्या भात्यातला दुसरा बाण म्हणजे शांताराम नाईक. बाकीचे सूर्या वाघ, बाबनी गावकर, नरसिंह नाईक, पांडुरंग गावकर वगैरे सगळे ‘अ-सूर’ पंथी! ही अशी नटमंडळी असल्यामुळे हंसच्या नाटकांचा तोंडावळा ठरलेला असायचा. विश्वनाथकाका मुख्य भूमिकेत, गायक नट म्हणून तुळशीदासमामा किंवा शांतारामभाऊ, विनोदी किंवा खलपुरुषाच्या भूमिकेत बाबनीमाम, सूर्या वाघ, नरसिंहभाऊ आणि इतर. पुढे पुढे नंतरच्या पिढीतील शंभूनाथ नाईक, सोमनाथ नाईक, रवींद्र, दिलीप, विजू, प्रसन्न लोटलीकर, बिपीन मंगेशकर, मी स्वत:, नितीन म्हार्दोळकर, अजित केरकर, राजेंद्र सावंत, अनिल मोडक, नितीन कोलवेकर, गोविंद बागकर, अजित कामत, आनंद काणेकर अशी अनेक मंडळी ‘हंस’च्या प्रवाहात उतरली आणि या जाणत्यांना थोडी उसंत मिळाली. त्यापूर्वी आम्हालाही थोडे सिनियर असलेले जगदिश वेरेकर, सुभाष पारकर, रोहदास नाईक इत्यादी कलाकार ‘हंस’च्या फळीत दाखल झाले होते.
बालवयाचा उंबरठा ओलांडून आम्हाला हळूहळू नाटक समजू लागलं त्या काळात ‘हंस’ची नाटकं गोवाभर गाजत होती. ‘मत्स्यगंधा’, ‘रायगड’ व ‘ययाती’ या तिन्ही नाटकांची तुलना तर थेट ‘कंपनी’च्या म्हणजे धि गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकांशी केली जात होती. कारणही साहजिक होतं. कंपनीतील नाटकामध्ये काम करणार्या कलावंतांच्या तोडीस तोड ठरतील असे कलावंत ‘हंस’कडे होते. तांत्रिकदृष्ट्याही कसली कमतरता नव्हती. त्यामुळे नाटकांचे प्रयोग गावोगावी होत. ‘हंस’च्या ‘मत्स्यगंधा’चा पहिला प्रयोग मी काणकोणला श्रद्धानंद विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पाहिला. मला आठवतं, त्यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेतील तत्कालिन विरोधी पक्षनेते प्रा. ग. प. प्रधान उपस्थित होते. गानतपस्विनी अंजनीबाई लोलयेकरनाही त्यावेळी पाहिल्याचं मला अंधुकसं आठवतं. नाटकाची अनाऊन्समेंट झाली आणि पडदा वर गेल्याबरोबर झाकोळलेलं आकाश, विजांचा लखलखाट आणि मेघांचा गडगडाट या पार्श्वभूमीवर कालर्षी व वर्तमान यांचा प्रवेश सुरू झाला आणि श्रद्धानंदच्या आवारातले सगळे प्रेक्षक एका वेगळ्याच जादुई वातावरणात पोचले. पुढे धीवर-सत्यवतीचा प्रवेश, चंडोलची एंट्री (ही भूमिका माझे वडील करायचे. ‘धीवर’ बाबनी गावकर आणि ‘सत्यवती’ अलका वेलिंगकर). देवव्रत-प्रियदर्शनचं तीरासारखं येणं आणि जाणं यात सगळे रमले असतानाच ऋषीवेशातील पराशराचं मंचावर झालेलं आगमन. पराशर बनून आलेल्या तुळशीदासमामांचं ते रूप अद्याप माझ्या डोळ्यांसमोर आहे. सखाराम मयेकर यांची रंगभूषा आणि केशवमाम वाघुर्मेकर यांची वेशभूषा. पाठीवर रुळणारा केशसंभार, कपाळावरील भस्माचा लेप, टोकदार दाढी, गुडघ्यापर्यंत नेसलेलं पीतांबर, खांद्यावरून लपेटलेलं व्याघ्राजीन, गळ्यात रुद्राक्षमाळा, एका हातात दंड तर दुसर्या हातात कमंडलू अशा वेषातील पराशराचं ते रूप आजही डोळ्यांसमोरून हटत नाही. नंतर गोवा हिंदू असो.च्या नाटकातील रामदास कामत यांचा पराशरही पाहिला. गाण्यामध्ये कामत निर्विवादपणे उजवे होते, पण अभिनयात आणि ‘दिसण्यात’ तुळशीदासमामांची सर त्यांना नव्हती. ‘नको विसरू संकेत मीलनाचा’ ही मुलतानीतील दिंडी म्हणताना भावविभोर होणारा पराशर आणि ‘साद देती हिमशिखरे’ हे गीत गातेवेळी ‘स्वप्न रंगले रात्री धुंद प्रेमिकांचे’ या ओळीतली व्याकुळ व्यथा तुळशीदास लोटलीकर नेमकेपणे व्यक्त करीत. पराशराची ही भूमिका त्यांनी नक्कीच दीड-दोनशे वेळा तरी वठवली असेल.
तुळशीदासमाम हे गायक तर होतेच, पण पहिली गोष्ट म्हणजे ते अत्यंत चांगले अभिनेते होते. चांगला गायक हा चांगला अभिनेता असतोच असे नाही. पण लोटलीकर याला अपवाद होते. त्यांची शब्दफेक नेमकी होती आणि उच्चारही स्पष्ट होते. या बाबतीतलं बरंचसं मार्गदर्शन त्यांनी माझ्या वडिलांकडून घेतलं होतं. पल्लेदार आवाजाची देणगी त्यांना उपजत लाभली होती. यामुळे गद्य भूमिकाही ते तितक्याच ताकदीने वठवायचे. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकातील त्यांची शंभूराजेंची भूमिका घ्या. ‘कोण म्हणतो शंभूराजे स्वतंत्र नाहीऽऽत?’ असा सळसळता सवाल करीत राजारामाला पाठंगुळी मारून रंगमंचावर झेपावणारा त्यांचा संभाजी अजून डोळ्यांपुढे येतो. ‘आम्ही गैर वागलो- आम्ही गैर बोललो’ हे गाजलेलं स्वगत म्हणतानाचा आतल्या आत घुसमटणारा संभाजी आणि जमिनीवर पडलेली शाल उचलताना ‘रामराजे किती भाग्यवान! शाल घालणार्या त्यांच्या मॉंसाहेब तरी आहेत! आज आमच्या मॉंसाहेब असत्या तर…?’ असं म्हणणारा भावूक संभाजी तुळशीदासमामा सर्वस्व ओतून करायचे. ‘रायगड’ हे गद्य नाटक. तरीही सहसा म्हटलं न जाणारं ‘सह्यगिरीच्या कुशीत निजल्या रायगडा हो जागाऽऽ शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा!’ हे शीर्षकगीत ते आवडीने म्हणायचे. पुढे याच नाटकात त्यांनी केलेली हंबीररावांची भूमिका मी पाहिली आणि विश्वनाथकाकांच्या आजारपणात केलेली शिवाजीचीही.
तुळशीदासमामांची आणखी एक गाजलेली गद्य भूमिका म्हणजे ‘ययाती.’ ‘हंस’च्या मूळ नटसंचात ययाती विश्वनाथकाका करायचे आणि कच शांताराम नाईक. लोटलीकरांनी अनेकवेळा कचाचीही भूमिका केली, पण शांतारामभाऊ व तुळशीदासमामा यांची तुलना केली तर रसिकांना शांतारामभाऊंचा कच अधिक आवडायचा. तुळशीदासमामांचा कच वाईट व्हायचा असं नव्हे, पण ‘प्रेम वरदान स्मर सदा’, ‘मी मानापमाना’ या पदांना जी धार लागते ती शांतारामभाऊंकडे अधिक होती. त्यामानानं लोटलीकरांचा ययाती फार प्रभावी व्हायचा. देवयानीला उद्देशून ‘अरे ही घार नाही, ही तर नागीण आहे’ हा परिच्छेद ते फारच परिणामकारकरीत्या सादर करायचे.
‘सौभद्र’ आणि ‘स्वयंवर’ या दोन्ही नाटकांतील कृष्णाच्या भूमिका तुळशीदासमामना स्वत:ला अत्यंत आवडायच्या. वास्तविक दोन्हीत कृष्ण असला तरी भूमिकांचे पोत वेगवेगळे आहेत. ‘सौभद्र’मधला कृष्ण खेळकर, रंगेल व काहीसा लबाड तर ‘स्वयंवर’मधला कृष्ण प्रेमिक तरीही वीरवृत्तीचा. ‘सौभद्र’मधली त्यांची भूमिका मी पाच-सहा वेळा तरी पाहिली आहे. त्यात नेहमी लक्षात राहिला तो रुक्मिणीशी लगट करणारा कृष्ण. ‘नच सुंदरी करू कोपा’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ आणि ‘प्रिये पहा’ ही तिन्ही पदे एकाच प्रवेशात तुळशीदासमामा बहारीने म्हणायचे. ‘कडकडकड शब्द करोनी’ असं गर्जत रुक्मिणीला घाबरवून सोडण्याचा त्यांचा आविर्भाव औरच असायचा. त्याचप्रमाणं रुक्मी व शिशुपालाला आव्हान देताना ‘मी वज्रमुष्टी!’ हे ‘स्वयंवर’मधलं गाणं ते तडफदारपणे म्हणायचे. याच नाटकातली ‘रमणी मजसि निजधाम’ आणि ‘कांता मजसि तूच’ ही गाणीसुद्धा खुलवण्याची त्यांची वेगळी पद्धत होती.
‘विद्याहरण’मधील कच, ‘पुण्यप्रभाव’मधील नुपूर, ‘एकच प्याला’तील सुधाकर, ‘नेकजात मराठा’मधील जयवंतराव, ‘संशयकल्लोळ’मधील आश्विनशेठ, ‘पंडितराज जगन्नाथ’मधील जगन्नाथ, ‘जय जय गौरी शंकर’मधील शंकर, ‘सुवर्णतुला’मधील कृष्ण, ‘सौभद्रा’तील अर्जुन व नारद अशा अनेक भूमिका आपल्या अभिनय व गायनशैलीच्या बळावर त्यांनी संस्मरणीय केल्या.
तुळशीदास लोटलीकर यांचा परंपरागत व्यवसाय सुवर्णकाराचा. पण सोन्याचे दागिने घडवण्यापेक्षा अभिनयाचे अलंकार आणि गायनाची आभूषणे घडवण्यात त्यांनी अधिक धन्यता मानली. रंगभूमीवर त्यांनी १९५३ साली प्रवेश केला तो ‘राक्षसी लालसा’ या नाटकातील बिजलीच्या भूमिकेद्वारे. सुरुवातीला अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाच त्यांच्या वाट्याला आल्या. पण अखेर त्यांना मान्यता मिळाली ती राजबिंडा पुरुष गायक-नट म्हणूनच.
मा. दत्ताराम, मा. गंगाराम, नूतन गंधर्व अनंत दामले, फैयाज, अंजली घांग्रेकर, मधुवंती दांडेकर, कीर्ती शिलेदार यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. गोमंतकीय रंगभूमीवर अलका वेलिंगकर, किशोरी हळदणकर, शशिकला नागेशकर, गुलाब मंगेशकर, महानंदा आमोणकर यांसारख्या अभिनेत्रींसोबत त्यांनी नायकाची कामे केली. मा. बालाजी गुरव, मा. काशिनाथ शिरोडकर, मा. सूर्या वाघ, तातोबा वेलिंगकर, विश्वनाथ नाईक, किशोर बोरकर, नरहरी वळवईकर या दिग्गजांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. अनेक पुरस्कार मिळाले. राज्य सरकारनेही सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
वाडी तळावलीचे सरपंच म्हणूनही त्यांनी एक टर्म भूषवली. राजकारण हा त्यांचा पींड नव्हता. पण परिस्थितीने त्यांना राजकारणात आणले. सरपंचपदाची मुदत संपल्यावर ते पुन्हा राजकारणाच्या वाट्याला कधीच गेले नाहीत.
तुळशीदासमामांची आयुष्याची शेवटची वर्षे आजारपणात गेली. काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. शरीराची एक बाजू थरथर कापत असलेल्या अवस्थेत त्यांना पाहिलं की मनाची घालमेल होई. रंगभूमीवर त्यांची तडफदार रूपं ज्यांनी पाहिली त्या माझ्यासारख्या माणसाला तर अधिकच त्रास व्हायचा. त्याही अवस्थेत ते बाहेर फिरायला जात. पण त्या थरथरत्या स्वरूपातला तो माणूस भलताच कुणी होता. तो बालपणी आम्ही पाहिलेला तुळशीदास लोटलीकर नव्हता. गेल्या ९ डिसेंबरला गेला तो हा भलताच माणूस. रंगभूमीवरचा तुळशीदास लोटलीकर मात्र अजून माझ्या हृदयाच्या आतल्या कप्प्यात जिवंत आहे…. स्पॉटलाईटच्या प्रकाशात उभा राहून ऑर्गनच्या सुरांत सूर मिसळून तो गातच आहे-
मला नाही उरली अता
ओढ प्रपंचाची
साद देती हिमशिखरे
शुभ्र पर्वताची…!