ओळखा क्षमता ज्ञानेंद्रियांची

0
227
  • प्रदीप गो. मसुरकर (मुख्याध्यापक, स.प्रा.शा., गिरी-नामोशी)

काही जन्मजात क्षमता मुलांच्या अंगात असतात. पालकांचे निरीक्षण, शिक्षकांचे निरीक्षण व प्रोत्साहन असल्यास मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळून ती एक चांगले नागरिक बनतील.

अध्ययन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकास बरेच अनुभव येतात. वर्गातील प्रत्येक मूल वेगळे असते. प्रत्येकाच्या आवडी, क्षमता निरनिराळ्या दिसून येतात (इन्डिव्हिज्युअल डिफ्रन्सेस). काही मुले पटकन् काही गोष्टी आत्मसात (ग्रहण) करतात तर काहींचे लक्ष नसते. प्रत्येक मुलाचा अध्ययनाचा कल निराळा असतो.

 

क्षमता पाहण्याची (व्हिज्युअल)-

राजेशची आई आपल्या राजेशचा अभ्यास घरी करून घेत असे. ती शिक्षकांनी काय शिकवलं हे वही उघडून पाहातसे. राजेश इयत्ता चौथीमध्ये शिकत होता त्यावेळेस तिच्या लक्षात आले की राजेश लिहून घेत असताना सोबत काही चित्रे काढायचा आणि काही गोष्टी लक्षात ठेवायचा. आईने विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे तो त्याने काढलेल्या चित्रांवरून देत असे. आणखी एक गोष्ट तिच्या लक्षात आली की बाजारात जाऊन आल्यावर, संध्याकाळचे फिरून आल्यावर, चार वर्षांपूर्वी पाहिलेल्या एखाद्या सिनेमातील हिरो- हिरोईन व स्टोरी तो जशीच्या तशी सांगत असे. अशा प्रकारची काही मुले असतात त्यांना ‘पाहिलेले’ चांगले लक्षात राहते. ‘व्हिज्युअल इम्पॅक्ट’ – अशी मुले बोलतानासुद्धा … ‘‘आय सी, आय गेट द पिक्चर’’, कोणी काही विचारले तर – ‘थांब तुला चित्र काढून दाखवतो’ व चित्र रेखाटून चांगल्या प्रकारे विश्‍लेषण करतात. कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी त्या वस्तू, प्रसंग, गोष्टी यांच्या चित्रांच्या रूपात लक्षात ठेवतात व परिक्षेच्या वेळी ही व्हिज्युअल मेमरी त्याला साथ देते. अशा प्रकारची मुले लिहून घेताना व विषय मांडताना व्यवस्थितपणे मांडतात व घटकांचे वर्गीकरण चांगल्या प्रकारे करतात. अशा प्रकारची मुले पुढे आर्किटेक्ट, डिझाईनर, इंजिनिअर, डॉक्टर या क्षेत्रांकडे वळण्याची दाट शक्यता असते.

१८ वर्षांपूर्वीची गोष्ट, अनुभव. मी माझ्या लहान मुलीला गार्डनमध्ये घेऊन गेलो होतो. त्यावेळेस तिचे वय चार वर्षांचे होते. लहान दगड घेऊन टाकत होती व खेळत होती. मध्येच तिला लहानशी अर्धवर्तुळाकृती काडी मिळाली. माझे लक्ष तिच्या खेळाकडे होतेच. लगेच माझ्यातील वडिलांची माया जागृत झाली व मी तिला सांगितले, ‘बाळ, ती काडी खाली टाक. डोळ्याला लागेल.’ त्यावेळी लगेच तिने उत्तर दिले- ‘पप्पा माझ्या हातात ‘चंदामामा’ आहे. क्षणभर मी विचार केला आपण प्रत्येक वेळेस चंद्र गोल असतो असे बिंबवतो, पण त्या मुलीने नकळत येता- जाता रात्रीच्या वेळी चंद्राची ‘कोर’ही पाहिली असेल व आत्मविश्‍वासपूर्वक ती म्हणाली, ‘चंदामामा’ माझ्याकडे आहे. आता तीच मुलगी २२ वर्षांची आहे. तिला पाहिलेल्या वस्तू, गोष्टी, प्रसंग, चित्रपट, घटना चांगल्या लक्षात राहतात व आज ती ‘आर्किटेक्स’ कोर्सच्या चौथ्या वर्षाला आहे व तिचे ड्रॉईंगही चांगले आहे. स्वतःच्या आवडीनेच तिने ते क्षेत्र निवडले आहे.

 

क्षमता ‘ऐकण्याची’ (हियरिंग- ऑडिटरी) –

ऐकलेले लक्षात ठेवण्याची क्षमता. अशी क्षमता काही मुलांमध्ये दिसून येते. त्यांना चित्रकला, प्रसंग आठवून लक्षात ठेवणे हे तितके जमतेच असे नाही पण कोणतीही गोष्ट कानाने ऐकली की ती जशीच्या तशी ते लक्षात ठेवतात. चांगल्या प्रकारे गोष्ट सांगतात, प्रश्‍न सोडवतात. अशा मुलांचा कल सर्वसाधारणपणे संगीताकडे (म्युझिशियन); मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट); समुपदेशक (कौन्सिलर) बनण्याकडे असतो.

वर्गातील संभाषणामध्ये अशा मुलांमध्ये समस्या सोडवण्याची क्षमता जास्त असते. ते चांगल्या रीतीने ऐकतात, विचार करतात व उत्तर देतात. अशा मुलांचा शब्दसंचय चांगला असतो. ही अशी मुले चांगले वक्ते होऊ शकतात. पण पालकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे त्यांच्या कानावर चांगले तेच शब्द पडले पाहिजेत. ते ऐकलेल्या शब्दांचे अनुकरण करतात. मलाही आमच्या शिक्षकांनी शाळेत शिकवलेल्या गोष्टी अजूनही आठवतात. तुम्हालाही लहानपणातील गाणी, जुन्या सिनेमांची गाणी जशीच्या तशी काही वेळेस आठवत असतील व ती मुखातून नकळत ओठावरून जात असतील!

 

क्षमता स्पर्शाची -कायनेस्थेटिक (टचिंग) –

अशा प्रकारची मुले आपल्या शरीराचा वापर करून शिकतात. स्पर्शज्ञानाने काही गोष्टींचे ज्ञान अवगत करतात. हावभाव गीत, रोल प्ले, खेळामध्ये नैपूण्य, डान्स, कोणतेही काम असो जेथे शरीराचा सहभाग व हालचाल असते व स्वतः हात लावून करून पाहणे, अनुभवणे व लक्षात ठेवणे होते. शारीरिक कौशल्ये चांगल्या प्रकारे आत्मसात करतात.

खेळ, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, डान्स, ऍक्टिंग अशा प्रकारांमध्ये नैपूण्य मिळवतात.

प्रत्येक मुलामध्ये वरीलपैकी तीन क्षमता कमी-अधिक प्रमाणात असतात. जी क्षमता जास्त असेल त्याप्रमाणे त्याला जर गती दिली तर जीवनात यशस्वी होतात.

डॉ. गर्डनर यांनी हॉवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये हॉवर्ड प्रोजेक्ट झिरो यामध्ये काम केले. यामधून आठ प्रकारच्या बौद्धिक क्षमता शोधून काढल्या.

मल्टिपल इंटेलिजन्स….

१. भाषिक – व्हर्बल/ लिन्ग्विस्टिक

२. गणितीय – लॉजिकल/ मॅथेमॅटिकल

३. सांगितिक – म्युझिकल

४. स्मृती – अवकाशासंबंधी – स्पॅशल

५. शारीरिक  – बॉडिली/कायनेस्थिक

६. सामायिक – इंटरपर्सनल

७. स्वतःविषयी – इंट्रापर्सिकल

८. नैसर्गिक – नॅचरल

प्रत्येकाला वरच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी, विकसित करण्यासाठी क्षमता असते. त्यानुसार त्यांनी प्रयत्न करावे लागतात.,

१) भाषाविषयक – तोंडी व लेखी भाषांचा वापर करून संभाषण/सुसंवाद साधणे.

२) गणित विषयक, अंक ज्ञानाविषयी – अंकांचा वापर करून प्रश्‍न सोडवणे, वैज्ञानिक प्रक्रियेत वापरून तर्क करणे इत्यादी.

३) संगीत विषयक – संगीताचा सराव, ताल, संगीतामधील रागदारी, फरक, परिसरातील आवाज, गायन इत्यादींचा समावेश.

४) स्मृती/अवकाशासंबंधी – आकार, रंग, स्थिती इत्यादी संबंधी.

५) शारीरिक – आपल्या भावना, शरीराचा वापर करून, समतोल (बॅलन्स), लवचिकता, वेग… (योग, खेळ, शारीरिक वैशिष्ट्ये )

६) गटाविषयक/ सामायिक – दुसर्‍याच्या भावना समजून घेणे, दुसर्‍याला मदत करणे, नेतृत्व करणे, इतरांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी.

७) स्वतःविषयक (सेल्फ कन्सेप्ट) – आपल्या क्षमता, ताकद, कमीपणा यांची जाणीव, मूड, सहनशीलता, आवड, दोष इत्यादी.

८) नैसर्गिक (नॅचरल) – पर्यावरण, वनस्पती, प्राणी, फरक, इत्यादी.

तर आपण कोणतेही मूल असो, त्याच्यावर आपल्या अपेक्षा लादू शकत नाही. काही जन्मजात क्षमता मुलांच्या अंगात असतात. पालकांचे निरीक्षण, शिक्षकांचे निरीक्षण व प्रोत्साहन असल्यास

मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळून ती एक चांगले नागरिक बनतील.

क्षमता ही प्रत्येकाकडे असतेच, पण ती तपासण्यासाठी ऍप्टिट्यूड टेस्ट घेण्यात येते. १०वीनंतर काय किंवा १२वीनंतर काय… असे प्रत्येक पालकांना आपल्या मुला/मुलीबद्दल काळजी वाटते व कोणते क्षेत्र निवडावे ते समजत नाही. त्यासाठी आता ९वी पास झाला की ऍप्टिट्यूड टेस्ट करता येते व त्यावरून मुलांच्या क्षमता आणि कमतरता शोधून काढता येतात व त्याची आवडही लक्षात येते. त्याप्रमाणे मुलांना योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे म्हणजे मग ती मुले आपल्या आवडीचे क्षेत्र घेऊन पुढे जातात व पालकांनाही त्याचा कोणताही त्रास होत नाही. मग ती शिक्षणात लवकर स्थिर होतात व प्रगती करतात.

ऍप्टिट्यूड टेस्टमध्येही गर्डनरच्या मल्टिपल इन्टेलिजन्सचा जास्त वापर केला जातो.