Home बातम्या एलिनांच्या भावनांशी खेळ नको

एलिनांच्या भावनांशी खेळ नको

0

– दिलीप बोरकर

कुठ्ठाळीचे आमदार आणि पर्यटनमंत्री माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे सध्या राजकीय भांडवल सुरू झाले आहे. माथानींच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या कुठ्ठाळी मतदारसंघातून त्यांच्या पत्नी एलिना साल्ढाणा यांना उमेदवारी देऊन निवडून आणावे आणि त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून घ्यावा असा निर्णय भाजपने घेतलेला असून त्यासाठी मंत्रिपद राखूनही ठेवलेले आहे. तरीसुद्धा त्यांना मंत्रिमंडळात समावेश करतेवेळी जो काही गोंधळ सध्या माजलेला आहे, त्यातून राजकारणाला वेगळाच रंग चढेल, मात्र त्यात एलिनांची फरपट होईल याकडे कोणाचेच लक्ष गेलेले दिसत नाही.

माथानी साल्ढाणा यांचे सामाजिक कार्य सर्वश्रृत आहे. त्यांच्या निधनानंतर गोमंतकीय जनतेने साश्रू नयनांनी त्यांना दिलेला निरोप म्हणजेच त्यांच्या कामाची पावती म्हणावी लागेल. परंतु आता लक्षात घ्यायची बाब म्हणजे त्यांची पत्नी एलिना म्हणजे माथानी नव्हेत. एलिना या एक शिक्षिका आहेत. त्या शिक्षिका म्हणून नुकत्याच निवृत्त झाल्या आहेत. माथानींप्रमाणेच त्यांनी कित्येक विद्यार्थी घडवलेले आहेत. त्यांनी माथानींच्या प्रत्येक निवडणूक प्रचारातच नव्हे, तर प्रत्येक राजकीय निर्णयात हिरीरीने भाग घेतलेला आहे. राजकारणातील व्यक्तीच्या मागे त्यांच्या धर्मपत्नी असतातच असे नव्हे. गोव्यातील राजकारण हे दोन प्रकारचे आहे. एक भोगाचे आणि दुसरे त्यागाचे. माथानी साल्ढाणा हे त्यागाचे राजकारण घेऊन मार्गक्रमणा करीत आलेले होते. त्या वाटचालीत एलिनाही गेली कित्येक वर्षे त्यांच्या हातात हात घालून चालत आलेल्या आहेत. आज त्यांना अर्ध्या वाटेवर एकट्या टाकून माथानी अनंताच्या प्रवासाला निघून गेलेले आहेत. माथानींचे कार्य आता एलिनांना पुढे न्यायचे आहे.

हे सगळे जरी खरे असले, तरी आम्ही या गोष्टीकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहता कामा नये. माथानी साल्ढाणा हे समाजाचे नेते होते. माथानी हे एकंदर रसायनच वेगळे होते. म्हणूनच इथे एक गोष्ट नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजे एलिना म्हणजे माथानी नव्हेत. माथानींची पत्नी असूनही एलिनांचे व्यक्तिमत्त्व, विचारसरणी वेगळी आहे. एलिना माथानींसोबत राजकीय क्षेत्रात भले वावरलेल्या असतील, परंतु माथानींच्या रक्तात असलेले क्रांतीचे वेड त्यांच्यात उतरले आहे हे शंभर टक्के सांगता येत नाही. त्याचा विचार अजून कोणी केलेला दिसत नाही.

सध्या जे काही चाललेले आहे, ते निव्वळ राजकारण आहे. त्या राजकीय खेळीला भावनिक जोड देण्यात आलेली आहे. माथानी साल्ढाणांच्या आकस्मिक निधनामुळे जनमानसात, विशेष करून कुठ्ठाळी मतदारसंघातील माथानींच्या समर्थकांमध्ये एक भावनिक वलय निर्माण झालेले होते. माथानींचे जेव्हा निधन झाले, तेव्हा माथानी फक्त एक सामाजिक कार्यकर्ते नव्हते, तर गोवा राज्याचे मंत्री होते. त्यामुळे त्यांच्याकडून कुठ्ठाळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या पुष्कळ अपेक्षा होत्या. तेव्हा आपल्या लाडक्या नेत्याचे आकस्मिक जाणे त्यांना धक्कादायकच होते. त्याचसाठी माथानींच्या मृत्यूने निर्माण झालेली पोकळी त्यांच्या पत्नी एलिना यांनी भरून काढावी असा विचार येणे साहजिकच आहे. अशा प्रकारच्या भावनिक घटना यापूर्वीही घडून आलेल्या आहेत.

पाळी मतदारसंघाचे आमदार प्रताप गावस त्यांच्या बंधूंच्या आकस्मिक निधनानंतर आलेल्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते. त्यावेळी जनमानसात एक भावनिक लाट आली होती. आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रताप गावस निवडून येऊ शकले नाहीत. या घटनेचे उदाहरण इथे देण्याचे कारण म्हणजे माथानींच्या मृत्यूप्रसंगीच्या लोकांच्या भावना वेगळ्या होत्या. माथानींच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण गोवा हळहळला होता. एक आदर्श नेता गेला याचे ते दुःख होतेच, त्याच बरोबर एवढे परिश्रम घेऊन, निवडून येऊन मंत्रिपदावर आरूढ झाल्याबरोबर जेमतेम दोन चार दिवसांनी मृत्यू ओढवणे यामागची हळहळ अधिक तीव्र असते. त्याच तीव्रतेतून माथानींची जागा एलिना यांनी घ्यावी असा विचार पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माथानींना जाऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटलेला आहे. एलिना त्या धक्क्यातून आता बाहेर पडत आहेत. त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवून समाजकार्यास प्रारंभ केला आहे. पर्रीकर सरकारने त्यांच्यासाठी मंत्रिपद राखून ठेवलेले आहे. माथानींच्या जाण्याने रिक्त झालेल्या मतदारसंघातून त्यांना निवडून आणण्याचा संकल्प भाजपने केलेला आहे, परंतु संकल्प करणे, मंत्रिपद देणे हे जरी त्यांच्या हाती असले तरी येणार्‍या निवडणुकीत मतदारांचे मतदान कसे होईल हे त्यांच्या हाती नाही. कुठ्ठाळीची पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने दोन जून ही तारीख निश्‍चित केलेली आहे. भाजपची उमेदवारी एलिना यांना नक्की झालेली आहे. सरकारने त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्याचेही नक्की केलेले असले तरी दोन जूनच्या मतदानात काय वाढून ठेवले आहे याची कल्पना कोणीही करू शकत नाही.

माथानींच्या निधनाच्या वेळी जनमानसात ज्या भावना होत्या, त्या हळूहळू ओसरत चाललेल्या आहेत. काळ हा या गोष्टी घडवून आणतो. काही दिवसांपूर्वी एलिनांविरुद्ध आम्ही उमेदवार ठेवणार नाही म्हणणारे पुढारी आता राजकीय दृष्टीने विचार करू लागले आहेत. भाजपचे सरकार पाडण्यासाठी जर आणखी एका आमदाराची भर पडू शकेल का, या दिशेने विचार चालू आहेत. एलिनांच्या पाडावासाठी एक सर्वपक्षीय उमेदवार उभा करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहे. मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत कुठ्ठाळी मतदारसंघात बरीच उलथापालथ होईल आणि यातून एलिनांवर अन्याय झाला तर त्याला जबाबदार कोण असेल?

माथानी साल्ढाणा भाजप सत्तेवर असताना कायमचे मनोहर पर्रीकर यांच्यासोबत होते. माथानी एका शब्दाची व्यक्ती होती. त्याची कदर पर्रीकरांना होती. त्यातून उतराई होण्यासाठी पर्रीकरांनी एलिना यांना मंत्रिपद देऊन कुठ्ठाळीतून माथानींच्या जागी निवडून आणण्याचे ठरवलेले आहे हे योग्यच आहे. पर्रीकर हे संवेदनशील आहेत असे म्हणतात. माथानींच्या मृत्यूची बातमी ऐकून ते ओक्साबोक्शी रडलेही असतील, परंतु संवेदनशील व्यक्तीपेक्षा ते मुरलेले राजकारणी आहेत. एलिनांना निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळात सामावून घेणे हे परिपक्व राजकारण्याचे लक्षण आहे. त्याचसाठी मुख्यमंत्री इरेला पेटलेले आहेत.

एलिना साल्ढाणा राजकारणात सक्रियपणे उतरलेल्या आहेत. माथानीची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. त्यांचा हा निर्णय राजकीय प्रेरणेतून आलेला नसून भावनिक घालमेलीतून तयार झालेला आहे. माथानींच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून त्यांनी हा घेतलेला आहे. कुठ्ठाळीत भाजपच्या तिकीटावर लढणार असलेल्या उमेदवार एलिना यांना मंत्रिपद देण्यात गैर काहीच नाही. कायदेशीरदृष्ट्या आणि घटनात्मकदृष्ट्या त्याला हरकत घेण्याचे कारण नाही, परंतु त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे हा निवडणूक आचारसंहितेचा भंग ठरेल. त्यांना मंत्रिपद दिल्याने दोन जून रोजी होणारे मतदान हे एका मंत्र्याविरोधात सर्वसामान्य उमेदवारास मतदान असे असमान पद्धतीने होईल. त्यामुळे एलिनांचा निवडणुकीआधी मंत्रिमंडळात समावेश करणे हे नैतिकदृष्ट्या अयोग्य आहे. माथानी नैतिकतेला विशेष महत्त्व देत होते याचे या प्रसंगी भान गरजेचे आहे. भाजपने एलिना यांना प्रथम निवडून आणावे आणि नंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा. उगाच निवडणूक आयोगाला आव्हान देण्यात अर्थ नाही. मंत्रिपद बहाल करण्यात एक महिना उशीर झाला तर जग काही बुडणार नाही, पण पोटनिवडणुकीत कर्मधर्मसंयोगाने मतदारांनी विपरीत कौल दिला तर मात्र एलिनांच्या भावनांशी तो खेळ ठरेल.