एक-एक विद्वान, एक-एक मोती!

0
33

(योगसाधना ः ५७९, अंतरंगयोग- १६४)

  • डॉ. सीताकांत घाणेकर

सरस्वतीच्या उपासकांनी एकमेकांसह एका सूत्रात ओवून घेऊन काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. विद्वानांच्या शक्तीचा व्यवस्थित योग कोणत्याही महान कार्याला सुसाध्य बनवतो. एक-एक विद्वान एक-एक मोती आहे. पण ते सर्व भगवंताच्या सूत्रात ओवले गेले तर त्यांची शक्ती अनेक पटीने वाढते.

सर्व विश्‍वात विविध शक्ती आहेत. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक… सर्व मानवाच्या जीवनविकासासाठी अत्यावश्यक आहेत. या सर्व शक्तींचा विकास करण्यासाठी विविध साधने उपलब्ध आहेत. पण ही सर्व साधने योग्य तर्‍हेने वापरायला हवीत.

स्थूल शक्तींसाठी साधने वापरणे सोपे असते, पण सूक्ष्म शक्तींसाठी जे एकमेव साधन आहे ते म्हणजे साधना. व्यवस्थित अभ्यास करून शास्त्रशुद्ध पद्धतीने साधना केली तर मानवी ध्येयापर्यंत पोहोचणे सोपे जाते.
नवरात्रीपासून आपण अष्टभूजा देवीच्या प्रतीकरूपात असलेल्या अष्टशक्तींचा विचार करत आहोत. आतापर्यंत संयमशक्ती, समेटशक्ती, सहनशक्ती, सामावण्याची शक्ती, परखशक्ती या पाच सूक्ष्म शक्तींचा आपण काही उदाहरणांसहित विचार केला, थोडा सूक्ष्म अभ्यास केला.

जीवनात प्रत्येक पैलूवर अनेक छोट्या-मोठ्या समस्या आहेत. प्रत्येक समस्येचा विचार करून आपण तिचे स्वरूप परखतो. आता हवा आहे तो म्हणजे निर्णय. म्हणून सहावी शक्ती आहे निर्णयशक्ती. तिची देवी आहे सरस्वती.
साहजिकच आहे, कारण निर्णय घेण्यासाठी ज्ञान हवे आणि ज्ञानाची देवता आहे देवी सरस्वती. सरस्वतीकडे बघितले की लगेच लक्षात येतो तो बालपणात घरी व शाळेत नियमित म्हणत होतो तो श्‍लोक-
या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकारा या श्‍वेतपद्मासना
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिदैवैः सदा वंदिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा॥

  • जी कुंदकळीसारखी, चंद्र, तुषार व मुक्ताहारासारखी धवल आहे. जिने शुभ्र वस्त्र परिधान केले आहे. जिचे हात वीणारूपी वरदंडाने शोभत आहेत. जी श्‍वेत पद्मासनावर विराजित आहे. जिला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यासारखे मुख्य देव वंदन करतात, अशी निःशेष जडतेला दूर करणारी भगवती सरस्वती माझे रक्षण करो.

आतादेखील आपणातील अनेकजण ही प्रार्थना अनेकवेळा म्हणतात- बाल, तरुण, वृद्ध- स्त्रिया, पुरुष- सुशिक्षित, अशिक्षित… पण मुख्य मुद्दा असा की, बहुतेकजण, बहुतेकवेळा फक्त कर्मकांडात्मक शीघ्रगतीने म्हणतो. म्हणतेवेळी प्रार्थनेवर लक्ष किती असतो हा वादाचा विषय असेल. म्हणजे त्यावेळी आपले मन कुठे असते? श्‍लोकावर, देवीवर की संसारातील उपद्व्यापांवर? प्रत्येकाने ठरवायचे!
जसजसे वय व शिक्षण वाढत गेले तसतसे मला वाटले की शब्दार्थ बघूया. तो एवढा छान आहे की प्रार्थना अर्थ समजून म्हणायला लागलो. तद्नंतर कळलं की भावार्थदेखील बघायचा असतो. त्यामुळे तर पुष्कळ आनंद मिळायला लागला. वय वाढत गेले तसा मी थोडा-थोडा आध्यात्माकडे वळायला लागलो व मग सूक्ष्म असा गर्भितार्थ व आध्यात्मिक अर्थ बघू लागलो. आता तर या उच्च सूक्ष्म अर्थानी प्रार्थना म्हणतो. त्यामुळे आत्मानंदाचा अनुभव येतो.
या प्रार्थनेतील प्रत्येक गोष्ट प्रतीकरूपात आहे. सरस्वती कुन्द, इन्दू, तुषार व मुक्ताहार यांच्यासारखी धवल आहे. खरा सारस्वत तसाच असायला हवा (इथे सारस्वत हा गुणवाचक शब्द आहे, वर्णवाचक नाही. सारस्वत म्हणजे सरस्वतीच्या शुद्ध, पवित्र ज्ञानाचा वाहक). कुन्द-पुष्प सौरभ पसरविते, चंद्र शीतलता देतो, तुषार-बिंदू सृष्टीचे सौंदर्य वाढवतात, मुक्ताहार व्यवस्थेचे वैभव प्रगट करतो.

सार्‍या सारस्वताचे जीवन सौरभयुक्त असले पाहिजे. पुष्पाचा सुवास सहज पसरतो तसा त्याच्या ज्ञानाचा सुवास वातावरणात चौफेर पसरलेला असतो. चंद्र जसा समग्र विश्‍वाला शांती प्रदान करतो तसा सरस्वतीचा खरा उपासक अनेक लोकांच्या संतप्त जीवनात शीतलतेचा स्रोत वाहवतो. याच्या जीवनाच्या शीतल चांदण्यात अनेक दुःखी जीवांना शांती लाभते. त्याची शीतल छाया सर्वांना माया लावते. वृक्षाच्या पानांवर पडलेले दवबिंदू मोत्यांची शोभा धारण करून वृक्षाच्या सौंदर्यात भर टाकतात. त्याप्रमाणे सरस्वतीच्या सार्‍या उपासकांच्या अस्तित्वाने संसारवृक्षाची शोभा वाढते. अशा मानवाला सांगावे लागते की ‘जयति तेऽधिकं जन्मना जगत्’- हार म्हणजे मुक्ताहार. एका मोत्यापेक्षा मोत्याचा हार अधिक सुंदर वाटतो. सरस्वतीच्या उपासकांनीही याप्रमाणे एकमेकांसह एका सूत्रात ओवून घेऊन काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे. विद्वानांच्या शक्तीचा असा व्यवस्थित योग कोणत्याही महान कार्याला सुसाध्य बनवतो. एक-एक विद्वान एक-एक मोती आहे. पण ते सर्व भगवंताच्या सूत्रात ओवले गेले तर त्यांची शक्ती अनेक पटीने वाढते.
मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव|

  • एक एक शिकलेला माणूस हा दीपकासमान आहे. हे सर्व दिवे हारात गोवले गेले तर दिवाळीचा प्रकाश निर्माण होईल आणि जर हे दिवे अव्यवस्थित बनून अहंकाराने व्यर्थ झगडू लागले तर होळीची आग निर्माण होईल. दिवाळीचा प्रकाश प्रेरक असतो, तर होळीचा दाहक असतो.

आपल्यातील बहुतेकजण श्‍लोक पाठ करून तो पोपटासारखा म्हणतात. पण विद्वान व्यक्ती त्या श्‍लोकांचा गर्भितार्थ सांगतात व काही महापुरुष सूक्ष्म चिंतन करून संपूर्ण विवेचन करतात. (वरील ज्ञान हे प. पू. पांडुरंगशास्त्री यांच्या साहित्यातून घेतलेले आहे- ‘सरस्वतीपूजन- संस्कृती पूजन’).
विश्‍वाचा विचार करताना आजच्या जगात अशा सुविचारांची किती गरज आहे हे सहज कळते.
१. धवलता म्हणजे सुंदरता, पावित्र्यता हा गुण सहसा आज दिसत नाही.
२. पुष्पाचा सुवासदेखील माणसात अनुभवाला येत नाही.
३. चंद्राची शीतलतासुद्धा तेवढी दृष्टिक्षेपात येत नाही.
४. मोत्यांची माळ आपण वापरतो, पण एका सूत्रात ओवून काम करणारे अगदी कमी आहेत. जिथे-तिथे स्वार्थ व राजकारण दृष्टीस पडते.
५. दिवाळीचा प्रेरक प्रकाश कमी होऊन होळीची दाहक आगच चोहीकडे दिसते.
दुर्भाग्याने वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, वैश्‍विक जीवनात यातील नकारात्मक गोष्टीच जास्त दिसतात. म्हणूनच ज्ञानी व्यक्तींनी अशा भारतीय संस्कृतीतील साहित्याचा अभ्यास करून कर्मकांडांबरोबर आध्यात्मिक अर्थ समजून विश्‍वातील प्रत्येक व्यक्तीचा संपूर्ण जीवनविकास घडवणे आवश्यक आहे.

जीवनात अनेक निर्णय घ्यावे लागतात. तेव्हा निर्णयशक्ती कशी असावी याचे मार्गदर्शन आम्हाला सरस्वतीच्या मंत्रातून मिळते.
सरस्वतीच्या आसपास विविध वस्तू आहेत- हातांत ग्रंथ आहे, वीणा आहे, माळा आहे. तिचे कपडे शुभ्र आहेत. तिचे वाहन मोर आहे. यातील प्रत्येक गोष्ट प्रतीकरूपात आहे. त्याचा विचार आपण करणारच आहोत, पण त्याआधी संपूर्ण श्‍लोक व्यवस्थित आत्मसात करूया. याने आपली निर्णयशक्ती नक्कीच वाढेल. त्यासाठी साधनांबरोबर योगसाधना गरजेची आहे.