Home बातम्या एका सूरश्रीची कथा – गुरुप्राप्ती आणि अखंड साधना

एका सूरश्रीची कथा – गुरुप्राप्ती आणि अखंड साधना

0

– विष्णू सूर्या वाघ

(भाग-२)

अल्लादियाखॉंसाहेब आणि उस्ताद बर्कतुल्लाखॉंसाहेब यांचे घरोब्याचे संबंध होते. शिवाय अल्लादियाखॉं हे भास्करबुवांचेही गुरू होते. त्यामुळे ‘मी तुमची शिष्या व्हायला तयार आहे. तुम्ही मला शिकवाल का?’ असे निरोप या ना त्या मध्यस्थामार्फत पाठवण्याचा सपाटाच केसरबाईंनी लावला. खॉंसाहेबांनी प्रारंभी काहीच दाद दिली नाही. ‘करतो, पाहतो, चाललंय ते बरं चाललंय’ अशा प्रकारची मोघम उत्तरे देऊन ते टोलवाटोलवी करू लागले. आता केसरबाईही हट्टाला पेटल्या. खॉंसाहेबांचे मन वळवण्यासाठी त्यांनी कलकत्त्याचे शेठ लाला दुनीचंद, मुंबईतले एक श्रीमंत शेठ विठ्ठलदास द्वारकादास आणि थेट करवीरचे छत्रपती शाहू महाराज यांना आपणासाठी शब्द घालण्याची विनंती केली. परमेश्‍वरकृपेने या धडपडीला शेवटी यश आले. खॉंसाहेब विरघळले. त्यांनी केसरबाईंना तालीम द्यायचे कबूल केले. पण त्याचबरोबर पाच महत्त्वाच्या अटीदेखील घातल्या. या अटी अशा होत्या-

१. काही ठराविक रक्कम देऊन गंडा बांधून घेतला पाहिजे.

२. मासिक अमुक रुपये तनखा दिला पाहिजे.

३. तालीम किमान दहा वर्षे चालली पाहिजे.

४. तब्येत बरी नसल्यामुळे किंवा काही आकस्मिक कामासाठी बाहेर गेल्यामुळे तालीम झाली नाही तरी गैरहजेरीचाही तनखा नियमित मिळाला पाहिजे.

५. तब्येत बरी नसल्यामुळे काही काळ मुंबईबाहेर जाऊन राहावं लागलं तर त्या ठिकाणी येऊन तालीम घेतली पाहिजे.

आपण घातलेल्या अटी केसरबाईंना मान्य होणार नाहीत व त्या आपणाकडे शिकण्याचा नाद सोडून देतील अशी खॉंसाहेबांची अटकळ असावी; मात्र ती साफ चुकली व केसरबाईंनी सर्व अटी मान्य केल्या.

साकल्यानं विचार केला तर या अटी घालण्यामागे खॉंसाहेबांनीदेखील काही ठोस विचार केला असावा असं दिसून येतं. केसरबाईंच्या हातून आपल्या जयपूर अत्रौली घराण्याची सेवा चांगल्या तर्‍हेने पार पडावी, त्यांची प्रगती आदर्शस्वरूपाची व्हावी, तालमीत दीर्घकाळपर्यंत सातत्य असावं, गुरू व शिष्या दोघांनाही उत्तुंग यश प्राप्त व्हावं, दोघांपैकी कुणाचंही नाव खराब होऊ नये असे महत्त्वाचे हेतू या अटींमागे होते. खॉंसाहेब त्यावेळी सत्तरीच्या घरात पोचले होते. या वयात पैसे मिळवण्यासाठी वणवण दगदग करणे त्यांच्या प्रकृतीला मानवले नसते. त्याशिवाय केसरबाईंच्या शिकवणीतही खंड पडला असता. त्यांनी पाच अटी घालण्याचे हेच कारण!

वरील सर्व अटी खॉंसाहेबांनी सन्मान्य धोरणाने आणि विलक्षण द्रष्टेपणाने घातल्या होत्या. घटनांच्या या मालिकांमधून जे काही निर्माण होईल ते असामान्यच असेल असे त्यांना वाटत होते. पुढे तसेच घडले. खॉंसाहेबांची ही शिष्या भविष्यकाळात श्रेष्ठतम गायिका बनली. भले भले मानसन्मान व किताब तिला प्राप्त झाले. पण यशाच्या त्या शिखरावर पोचण्यासाठी काट्याकुट्यांनी भरलेले असंख्य डोंगर या गानयोगिनीला पार करावे लागले. स्वरांनी रोमांचित बनलेली ती एक आगळीवेगळी संघर्षकहाणीच आहे.

दि. १ जानेवारी १९२१! भारतीय संगीताच्या इतिहासातील एक अपूर्व दिवस. याच दिवशी केसरबाईंनी उस्ताद अल्लादियाखॉंसाहेब यांचा गंडा बांधून घेतला. मुंबईतील अनेक ख्यातनाम कलाकार व मान्यवर व्यक्तींच्या साथीने गुरू-शिष्यांनी कलासेवेची जबाबदारी स्वीकारली.

गंडाबंधनानंतर खॉंसाहेबांच्या कडक शिस्तीखाली केसरबाईंची तालीम सुरू झाली. ती प्रदीर्घकाळ चालली. १९२० पासून १९४६ पर्यंत सुमारे २६ वर्षे केसरबाईंनी संगीताचे ज्ञान खॉंसाहेबांकडून ग्रहण केले. त्यांचा आवाज मुळातच रुंद, टाला व गंभीर होता. खडतर साधनेमुळे या आवाजात विलक्षण तेज निर्माण झालं. पण…

हा मार्ग निष्कंटक निश्‍चितच नव्हता. तालीम सुरू होऊन केसरबाई नियमित शिकवणीत रूळतात न रुळतात तोच, म्हणजे महिना उलटण्याच्या आत खॉंसाहेबांची तब्येत बिघडली. काही केल्या आराम पडेना. खॉंसाहेबांनी औषधोपचारांसाठी मुंबई सोडून सांगलीला जायचा निर्णय घेतला. मुंबईतील डॉक्टरांवर खॉंसाहेबांचा फारसा विश्‍वास नव्हता, पण सांगलीचे प्रसिद्ध वैद्य आबासाहेब सांभारे यांचे ते भक्त होते. सांभारेच आपणावर औषधोपचार करून आपणाला बरे करतील अशी त्यांची श्रद्धा होती. त्याप्रमाणे त्यांनी आपला मुंबईतील मुक्काम हलवला आणि ते तडक सांगलीला जायला निघाले. औषधोपचार किती दिवस चालणार हे सांगणे कठीण होते. त्यामुळे केसरबाईंनाही आपलं बिर्‍हाड बांधून खॉंसाहेबांच्या मागं सांगलीला जाऊन राहणे भाग पडले. त्यावेळी केसरबाईंच्या पदरी एक छोटी मुलगी होती. परंतु त्यांची मोठी बहीण सोनाबाई हिने तिला सांभाळण्याची जबाबदारी आपणावर घेऊन केसरबाईंना सांगलीला पाठवले.

खॉंसाहेब सांगलीला येऊन वैद्य सांभारे यांच्या वाड्यात राहू लागले. केसरबाईही तिथेच राहायच्या. केसरबाई मुंबईत सुखवस्तू वातावरणात वाढलेल्या. त्यामानाने सांगलीचे जीवन खेडवळच म्हणावे लागेल. सांभारे यांनी त्यांची राहण्याची सोय चांगली केली होती. सांगलीचा हवापालट खानसाहेबांनाही फायदेशीर ठरत होता. मात्र सांगलीची हवा केसरबाईंना मानवत नव्हती. एकाएकी केलेल्या स्थलांतराचा तब्येतीवर परिणाम होऊ लागला. त्यातून खॉंसाहेबांच्या तालमींचे दंडकही विलक्षण. केसरबाई पहाटे पाच वाजता उठायच्या व सलग दोन तास मंद्रसाधना करायच्या. साडेपाच ते साडेसातपर्यंत तंबोरा लावून त्या बसायच्या. सातच्या सुमारास खॉंसाहेब उठायचे. आठ वाजता प्रत्यक्ष गुरूमुखातून तालीम सुरू व्हायची ती थेट दुपारी एक वाजेपर्यंत चालायची. एक वाजता भोजन झालं की दुपारी तीन ते साडेतीनपर्यंत विश्रांती. पुन्हा चार वाजता तालमीला सुरुवात. आठ वाजेपर्यंत खॉंसाहेबांनी शिकवलेले धडे घोळवीत केसरबाई बसायच्या. आठ वाजता रात्रीचं भोजन झालं की खॉंसाहेब वैद्यमहाराजांकडे गप्पा ठोकायला किंवा बैठक मारायला निघून जायचे, पण केसरबाई मात्र जेवण उरकून लगेचच रियाजाला बसायच्या. गायन हे रिकाम्यापोटी करावं, भरल्या पोटावर गायचं नाही असा एक समज त्याकाळी प्रचलित होता. त्यामुळे अल्लादिया केसरबाईंना भरल्या पोटी गायला लावतात याचं अनेक जणांना आश्‍चर्य वाटत होतं. परंतु खॉंसाहेबांनीच हा दंडक घातला होता. त्याचं कारणही ते स्पष्टपणे सांगायचे. ‘‘बेटा, खाने के बाद आराम करने की आदत अच्छी नहीं| भरे हुए पेट पर भी गाना चाहिए, नहीं तो न गाने की आदत लग जाती हैं|’’

केसरबाईंची ही स्वरसाधना रात्री उशिरापर्यंत चालायची. कधीकधी उत्तररात्री किंवा पहाटे गस्तीला येणारा रखवालदार बाहेरून हाक मारून वेळेची जाणीव करून द्यायचा. पण केसरबाईंनी स्वतःला संगीताच्या सेवेसाठी समर्पित करण्याचाच जणू चंग बांधला होता. खॉंसाहेब आधीच मोठ्या मुश्किलीने शिकवायला तयार झाले होते. तशात आपणाकडून दुर्लक्षामुळे किंवा आळसामुळे काही चूक घडली तर कोणत्याही क्षणी ते रागावून निघून जाण्याची भीती. यामुळे केसरबाई साधनेत कोणतीही कमतरता राहू देत नसत. सुरुवातीला रियाजासाठी सहा-सात तास बैठक मारून एके जागी बसणे कठीण जाऊ लागले. पण नंतर त्यांना सवय होत गेली. त्यातच पहिल्या पंधरा दिवसांत आवाज बसला. कधीकधी तर बोलणंही कठीण होई. फारच त्रास होतोय असं जाणवलं तर खॉंसाहेब एकदोन दिवस विश्रांती देत. पण पुन्हा लगेच तालमींना सुरुवात. खॉंसाहेब म्हणत ः

‘‘बेटा, तुझा आवाज जाणार नाही, काळजी करू नकोस. जेवढा आवाज काढणं शक्य आहे तेवढाच काढ. पण मेहनतीत खंड पडता उपयोगी नाही. यातूनच तुझा आवाज बनणार आहे.’’

खॉंसाहेबांनी सांगितलं तसंच झालं. बरोबर सहा महिन्यांनी त्यांचा आवाज थोडा थोडा सुटू लागला. पुढच्या दोन महिन्यांत तो पूर्णांशाने खुला झाला. केसरबाईंनाही यात गंमत वाटू लागली. आवाज केव्हाही लागू लागला. त्यात एक तर्‍हेचा जोर उत्पन्न झाला. धार आली व मनात येईल तसा तो फिरवता येऊ लागला!

खॉंसाहेबांनी केसरबाईंना प्रथम तोडीची तालीम सुरू केली. या रागात त्यांनी केसरबाईंकडून सर्व तर्‍हेची मेहनत करून घेतली. एक साधा आरोह-अवरोहाचा पलटा ते सांगायचे व केसरबाई तो घोटत बसायच्या. त्यात काही चूक झाली की ते दुरुस्त करायचे. तो एकच पलटा बाई तासन्‌तास गाऊन दाखवायच्या व खॉंसाहेब समोर बसून ऐकायचे. एक पलटा आत्मसात केला की दुसरा सांगायचे. तो दहा-पंधरा दिवस चाले. मग तिसरा पलटा. असा एक एक पलटा केसरबाईंनी किमान लाख वेळा तरी घोटला असेल. बरं, पलटे जलद जलद घोटण्याची तरी सोय? तीही नव्हती. हे पलटे अतिशय संथ लयीत घोटण्यावर खॉंसाहेबांचा कटाक्ष होता.

पुढं पुढं सांगलीत राहणं फारच अशक्य झालं तेव्हा केसरबाई मुंबईला परतल्या. मात्र त्यानंतर अल्लादियाखॉंसाहेब कधीही मुंबईत आले की त्यांच्याकडे जाऊन त्या तालीम घेत असत. प्रसंगी आपले स्वतःचे कार्यक्रमही रद्द करून जात. एकदा शिकायला सुरुवात केली की त्यांना वेळकाळाचं भान राहत नसे. प्रकृतीचीही हेळसांड व्हायची. गाणं शिकण्यासाठी चाललेली तिची ही उरफोड बघून घरच्या मंडळींना लोक म्हणायचे ः

‘‘हे काय चालवलंय तुम्ही? पोर छाती फुटून, रक्त ओकून मरेल अशानं!’’

पण केसरबाईंनी कशाचीही पर्वा केली नाही. पूर्वजन्मीच्या पुण्याईनं असा गुरू मिळालाय. ही संधी पुन्हा येणार नाही. या महासागरातून जेवढं पाणी ओंजळीत भरून घेता येईल तेवढं घ्यायचं असा निर्धारच त्यांनी केला होता जणू!

केसरबाईंनी एकंदर तीस वर्षे गाण्याचा निव्वळ अभ्यास केला. अल्लादियाखॉंसाहेबांनी हातचे काहीही राखून न ठेवता आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक हिशेबांकडे न पाहता अविश्रांतपणे दोन तपे बाईंना तालीम दिली. केसरबाईंनीही जमेल तेवढं घेतलं. मात्र आपण गुरूकडून सर्वकाही घेऊ शकले नाही याची थोडी खंत त्यांना आयुष्यभर वाटत राहिली. खॉंसाहेबांच्या ज्ञानाचं भांडार अफाट होतं. मरतेसमयी ते केसरबाईंना म्हणालेदेखील-

‘‘बेटा, तुने मेरा पेट बिल्कुल खाली नहीं किया| मेरे अवगत चीजों में से कई चीजें खाली होती, तबही मेरे मन को सुकून मिलता!’’

खॉंसाहेब कधीकधी असं बोलायचे, पण ही आपली शिष्या नक्कीच आपलं नाव रोशन करील याची त्यांना खात्री होती. विश्‍वासाच्या बळावरच त्यांनी प्रामाणिकपणे गुरूसेवा करून गुरू सांगतील त्याप्रमाणे अखंडित रियाज केला आणि एक असं उंच भव्य शिल्प उभं केलं की त्यावरचं आवरण दूर होताच ते शिल्प पाहताच संगीतातील विद्वान, बुद्धिमान दिपून गेले.

केसरबाईंची पहिली जाहीर मैफील मुंबईतच झाली; आणि तीही मुंबापुरीतील समस्त ख्यातनाम- विद्वान गायक-गायिकांच्या उपस्थितीत. या एकाच गाजलेल्या मैफलीने केसरबाईंचे नाव मुंबापुरीत सर्वतोमुखी झाले. हळूहळू मुंबईबाहेरून आमंत्रणं येऊ लागली. भारतभर मोठ्या शहरांतून त्यांच्या मैफली आयोजित होऊ लागल्या. संगीतातील मोठमोठे कलाकार आणि समाजातील अन्य विषयांचे जाणकार, विद्वान, अधिकारी व अभिरूचीसंपन्न समाजातील रसिक व्यक्ती आवर्जून त्यांचं गाणं ऐकायला गर्दी करू लागल्या.

केसरबाईंचं गाणं ऐकून त्यांचे पहिले गुरू रामकृष्णबुवा वझे म्हणाले, ‘‘निरनिराळ्या सुवासिक फुलांचा भरदार गुच्छ असावा आणि त्याला उंची अत्तर लावलेलं असावं, अगदी तसंच केसरबाईंचं गाणं आहे!’’

अत्तर लावलेल्या सुवासिक फुलांचं हे देणं केसरबाईंना मिळालं ते त्यांचे गुरुवर्य अल्लादियाखॉंसाहेबांकडून. तरीही त्या पूर्ण समाधानी नव्हत्या. आपण सर्वज्ञ आहोत असाही आव त्यांनी कधी आणला नाही. पण संगीतात जे चांगलं आहे ते कुठूनही मिळवायची एक चौकस वृत्ती त्यांच्यात होती. अमुक एका व्यक्तीजवळ शिकून घेण्यासारखं काही आहे असं समजताच त्या व्यक्तीची पाठ त्या सोडीत नसत. अल्लादियाखॉंच्या चुलतबंधूंचे चिरंजीव बशीरखॉं ठुमरी चांगली शिकवतात हे त्यांना समजलं मात्र, त्यांनी तडक कलकत्ता गाठलं. बशीरखॉंकडून ठुमरी शिकून घेतली.

बाईच्या जन्माला आले नसते तर मी खूप काही शिकून घेतले असते असे केसरबाई म्हणायच्या. एका विशेषांकाला मुलाखत देताना त्या म्हणाल्या ः

‘‘मला देवानं पुरुषाच्या जन्माला घातलं असतं तर बरं झालं असतं. गाणं शिकताना मला पदोपदी जे अडथळे आले त्यांना मी जुमानलं नसतं. पृथ्वीच्या पाठीवर कुठंही मी गाणं शिकण्यासाठी गेले असते. माझ्या गुरूकडून मी सर्वकाही शिकू शकले नाही म्हणून मला वाईट वाटतं. माझ्या स्त्रीत्वामुळे माझ्या मार्गात अनेक अडचणी आल्या. आजदेखील त्या अडचणी आहेत. माझ्या शारीरिक दुर्बलतेमुळे मनात असूनदेखील बर्‍याच गोष्टी मला करता येत नाहीत.’’

केसरबाई स्वतःविषयी फार थोडं बोलायच्या. आपल्या गाण्याविषयी स्वतःहून तर त्या कधीच बोलत नसत. पण आपणाला निर्विघ्नपणे संगीतसाधना करू देण्यात बहीण सोनाबाईचा वाटा फार मोठा आहे असे त्या वारंवार सांगायच्या. सोनाबाईनं माझ्या मुलीचा सांभाळ केला नसता तर संगीत शिकणं आपणाला अवघड गेलं असतं याची कबुलीच त्यांनी देऊन टाकली आहे.

केसरबाईंचा सारा थाट खानदानी पद्धतीचा होता. त्याचं वर्णन करताना पुलंनी लिहिलंय-

‘‘मध्यम उंची, गौर वर्ण, विलक्षण तेजस्वी डोळे, करारी जिवणी, ओठांच्या कडा पानानं किंचित अधिक आरक्त झालेल्या, कानात हिर्‍यांची कुडी, हातात हिर्‍यांच्या बांगड्या, बोटात हिर्‍याची अंगठी, गळ्यात फक्त एक मोत्यांची माळ, राजघराण्यातल्या स्त्रीसारखी उंची पण शुभ्र किंवा मोतिया रंगाची साडी. डोकीवरून पदर घेतलेला. चालण्या-पाहण्यात त्या वेषाला साजेल असाच डौल, मैफलीतल्या एखाद्या परिचिताला ओळख दाखवलीच तर त्यातून मेहेरबानीच दिसावी अशा ढंगाची खानदानी लकब. एकूण ‘दबदबा’ हाच त्या सार्‍यांतून साधला जाणारा परिणाम!’’

केसरबाईंच्या हयातीत त्यांची मैफिल पाहण्याचे भाग्य लाभलेले थोर संगीत समीक्षक व संगीत नाटककार गोपाळकृष्ण भोबे यांनी केसरबाईंच्या मैफलीचं वर्णनही अत्यंत सुंदर शब्दांत केलं आहे ः

‘‘आमच्या पिढीला त्यांच्या मैफलीचं वैभव पाहायला मिळालं हे आमचं मोठं भाग्य. आपापल्या क्षेत्रात फार मोठी कर्तबगारी गाजवलेले स्त्री-पुरुष केसरबाईंच्या मैफलीत आपला मोठेपणा सोडून मिळेल तिथे बसतात. संगीत विश्‍वात ज्यांनी नाव घेण्याजोगं काही केलंय असे लहानमोठे कलावंत काहीतरी नवं शिकायला मिळेल या उद्देशाने आतुर कानांनी नतमस्तक होऊन मुकाट कोपरे गाठतात. आणि डोळे दिपून जावेत असा एक-एक झगझगीत दागिना बाई आपल्या स्मरणसंदुकीतून काढू लागल्या की सारी मैफल विस्मित होते. आ वासून पाहत राहते. प्रत्येकाला त्या मैफलीचा आनंद महिनोन् महिने पुरतो. त्यांची एखादी तरी तान किंवा स्वरालंकार आपल्या गळ्यात यावा म्हणून संगीताचे विद्यार्थी प्रयत्न करतात; पण तसा सहज हवेसारखा सर्वांगपरिपूर्ण, पंचवीस वर्षांच्या तपश्‍चर्येनं मिळवलेला अवघड स्वरालंकार साध्य होणं ही एक दुर्लभ गोष्ट आहे.’’

त्याही पुढं जाऊन त्यांच्या गानशक्तीची यथार्थता सांगताना भोब्यांनी लिहिलं आहे-

‘‘भूपनट, सावनीनट, हेमनट, केदारनट, कामोदनट, ललितागौरी, सावनीकल्याण, मालिगौडा, काफीकानडा, बसंतीकेदार, खोकर, नायकी, कानडा, नटबिहाग, हुसेनी कानडा, पटमंजिरी, शुक्लबिलावल असे अवघड, बुद्धी गुंग करणारे रागप्रकार ऐकायचे असतील, त्यातील चमत्कार पाहून थक्कं व्हायचं असेल, स्वरांची वलयांवर वलयं कानाभोवती पसरताना धुंद व्हायचं असेल तर अशा बुद्धिमान श्रोत्यांनी केसरबाईंचं गाणं ऐकलं पाहिजे. मन तिथं थबकून राहतं. वैचित्र्याच्या, बिकटपणाच्या कोड्यात गुंगून जातं.’’

केसरबाईंच्या त्यावेळी गाजलेल्या एका मैफलीचा रसास्वाद मला ‘संगीताचे मानकरी’ या शीर्षकाच्या एका जुन्या पुस्तकात सापडला. या पुस्तकावर लेखकाचं नाव नाही. परंतु ‘एकलव्य’ हे टोपणनाव आहे. मला वाटतं एकलव्य या टोपणनावानं ज्येष्ठ संगीतदिग्दर्शक केशवराव भोळे हे संगीतविषयक लेख लिहायचे. त्यांचे लेख आस्वादात्मक तसेच टीकात्मकही असायचे. केसरबाईंच्या मैफलीचा थाट त्यांनी कसा उभा केला आहे पहा-

‘‘डोकीवर पदर घेऊन उजव्या हातानं तंबोरा छेडीत असलेल्या केसरबाई, उजव्या बाजूला बाईंचे बंधू (अनंतराव केरकर) अथवा विष्णुपंत शिरोडकर तबल्यावर, डाव्या बाजूला अंमळ मागं मजीरखॉं सारंगीवर, अशा थाटात त्यांची मैफल सुरू होते. अलीकडे स्वर भरण्याला त्या तंबोरा-पेटी घेऊ लागल्या आहेत. दोन तंबोरे, चित्रविचित्र हातवारे करणारा पेटीवाला, सारंगीवाला, बाजूला ‘माशाल्ला, माशाल्ला, सुभानल्ला’ वगैरे उद्गारांची वेळी-अवेळी खैरात करून ‘कल्लोळ’ माजवणारी शिष्यमंडळी, जराशी बिकट तान घेतली की ती अतिशय ‘मुश्कील’ आहे असे म्हणणारे स्तुतिपाठक अशा लोकांमध्ये होणार्‍या जाहिरातवजा मैफलींची तुलना बाईंच्या जरूर तितक्याच साथीवर चाललेल्या साध्यासुध्या पण वैचित्र्यपूर्ण, तयार संगीतानं शोभलेल्या मैफिलीशी करावी.’’

‘‘साथीची खरी मजा मजीदखॉं सारंगीवाला असताना अथवा हल्ली अमीरबक्ष असताना ऐकायला मिळते. या दोघांची साथ बाईंच्या गाण्याला संगत करणारी व रंग भरणारी असते. मजीदखॉंची सारंगी केसरबाईंच्या गाण्याबरोबर तितक्याच तयारीनं फिरत असते. ती त्यांचा सुरेल आवाज झाकून टाकत नाही किंवा मागंपुढं होत नाही. अगदी सवंगड्याप्रमाणे बरोबर असते. मध्यंतरी बाई गात नसल्या की त्यांनी काढलेली आलापी किंवा तान मजीदखॉं हुबेहूब काढतात. सारंगीच्या साथीवर आमचं हिंदुस्थानी संगीत अत्यंत शुद्ध स्वरूपात ऐकण्यास मिळते. केसरबाई एकाच तंबोर्‍याच्या व सारंगीच्या साथीवर आपल्या मोठ्या व सुरेल आवाजानं किती उत्तम गातात ते ऐकण्यासारखं आहे. फाजील साथीच्या गोंगाटात गाणार्‍याच्या आवाजाचं निर्भेळ स्वारस्य श्रोत्यांना चाखायला मिळत नाही. बेताच्या साथीचं केसरबाईंचं भरपूर गाणं साथीच्या गोंगाटात स्वतः बेतानं गाणार्‍या गवयांना सडेतोड उत्तर आहे!’’

डॉ. शरद्चंद्र विष्णू गोखले हे शास्त्रीय संगीताचे आणखीन एक मर्मज्ञ. केसरबाईंचं गाणं कसं होतं याचं साद्यंत वर्णन त्यांनी एके ठिकाणी केलं आहे. ते म्हणतात ः ‘‘बाईंचा आवाज अतिशयच निर्मळ. अतिशयच साफ. भरदार तरी झनाना. अत्यंत सुरेल. जणू सनईच गोडगोड वाजत आहे. त्यांचा स्वर अडीच- पावणेतीन सप्तके सारख्याच रुंदीने, बलाने एकमापला जातो. कधीही वळणे सहजपणे घेतो. अशा स्वराला संस्कृत ग्रंथात तेलाच्या धारेची उपमा आहे. त्या आवाजाला दोष असा माहीतच नाही. अखंड दमश्‍वास असा अफाट की ऐकताना श्‍वास कोंडतो. शब्दोच्चार, वर्णोच्चार साफ आणि शुद्ध. पण गळ्यात जशी धक्काबुक्की नाही तशी उच्चारातही नाही. गाण्यात वेडीवाकडी भागदौड नाही तशी स्वभावातही नाही. पण सुस्त तुस्तपणाही नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत गाण्यात काही चैतन्य खेळत असतं. या पद्धतीच्या गायनात ध्रुपद आणि ख्याल यांच्यामधील सीमा पुसल्या गेल्या जातातच, पण होर्‍या, ठुमर्‍यांतूनही दर्शन घडते ते अल्लादिया परंपरेचे! त्या सर्व प्रकारांचे मूलतत्त्व असे की शब्द आहेत- अर्थ आहे! त्यांची पूर्ण अभिव्यक्ती आहे. रागशुद्धता आहे- वाणी व मुडा शुद्ध आहे- पण शेवटी भावाभिव्यक्ती जी होते, जी काळजाचा ठाव घेते, ती शब्द-अर्थ-राग-मुद्रा-वाणी यांच्यातर्फे नव्हे तर केवळ स्वरलयाच्या जडणघडणीच्यातर्फे- रसकल्पना कोणी मानो न मानो, रस कितीही असोत, पण ते मानवी इच्छा-आकांक्षांच्या आलंबनानेच मानलेले आहेत. पण इच्छा-आकांक्षांच्याही निरपेक्ष असा केवळ ‘रस’ म्हणून संगीतात काही आहे व तो ‘गानरस’ हे केसरबाईंच्या गाण्यामुळे पटते.’’

(क्रमशः)