Home बातम्या उपेक्षित वारसा

उपेक्षित वारसा

0

आपली आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दलची उदासीनता त्याला उपेक्षेच्या खाईत लोटत असते. त्याच्या जतनासाठी आपण काही तरी करावे, निदान आवाज उठवावा एवढे सामाजिक कर्तव्य पार पाडण्यातही आम जनता कसूर करते, त्यातून कालांतराने हा वारसा मातीमोल होऊन जातो. आपल्या भरजरी भाषावैभवामुळे आजही जुन्या पिढीच्या गळ्यातील ताईत असलेले नाटककार राम गणेश गडकरी यांच्या सावनेर येथील घराची कशी वाताहत झाली आहे, त्यावर मुंबईच्या एका दैनिकाने नुकताच प्रकाश टाकला आहे. ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’, ‘पुण्यप्रभाव’, ‘प्रेमसंन्यास’ अशा अजरामर नाटकांद्वारे ज्यांनी मराठी रंगभूमी आणि साहित्य समृद्ध केले, त्या गडकर्‍यांच्या घराची भग्नावस्था आपल्या सांस्कृतिक वारशाच्या कल्पना किती बेगडी असतात त्याचेच दर्शन घडवते आहे. काही दिवसांपूर्वी दक्षिणेतील ‘हिंदू’ दैनिकाने बेळगावजवळच्या सुळेभावी या गावी असलेल्या महान शास्त्रीय गायक कुमार गंधर्व यांच्या मूळ घरात उपाहारगृह चालवले जात असल्याचे वृत्त दिले होते. आपल्या बाकीबाबांच्या घरातही हाच प्रकार चालला होता हे वेगळे सांगायला नको.

ज्यांनी आपल्या ‘मालगुडी डेज’ मधून वाचकांना आगळा आनंद दिला, त्या दिवंगत लेखक आर. के. नारायण यांचे यादवगिरी, म्हैसूर येथील घर तर म्हैसूर महापालिका पाडायला निघाली होती. त्यांच्या चाहत्यांनी वेळीच आवाज उठवला म्हणून शेवटी कर्नाटक सरकारला ती वास्तू संरक्षित करणार असल्याची घोषणा करणे भाग पडले. ज्यांनी आपले जगणे समृद्ध केले, आपल्या अजोड कलेद्वारे आमच्या जीवनात आनंद पेरला, त्यांच्या पश्‍चात् त्यांचा वारसा असा मातीमोल होताना पाहून रसिकांच्या ह्रदयाला पीळ पडल्यावाचून राहणार नाही. गडकर्‍यांची सावनेर येथील तीन मजली वास्तू खरे तर संरक्षित वास्तू घोषित झालेली आहे. परंतु राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभागाच्या ‘संरक्षणा’च्या कल्पनेपोटी त्या घराला भग्नावस्था प्राप्त झालेली आहे. साफसफाई करणार्‍या झाडूवाल्याने पगार थकल्याने झाडलोटदेखील बंद केली आहे, या उपेक्षेला म्हणावे तरी काय? सुळेभावी येथील कुमार गंधर्वांचे घर त्यांच्या कुटुंबीयांनीच ४५ साली विकले. नव्या घरमालकाने तेथे चक्क उपाहारगृह चालवायला घेतले. त्यामुळे जेथे सकाळच्या प्रहरी ‘तोडी’ आळवला जायचा, तेथे चहा आणि उप्पीटाचा दरवळ येऊ लागला. ज्या कुमार गंधर्वांना पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, कालिदास सन्मान अशा सर्वोच्च सन्मानांनी गौरविले गेले, त्यांच्या घरामध्ये त्यांची खूण जपली न जाता उपाहारगृह चालवले जाणे हा निव्वळ करंटेपणा म्हणावा लागेल. आर. के. लक्ष्मण यांचे म्हैसूरमधील घर त्यांच्या मुलीनेच विकासकाला विकले, कारण त्या दुमजली टुमदार घराचे आजचे बाजारमूल्य तीन – चार कोटींच्या घरात सहज आहे. ते घर पाडायला घेतले गेले, तेव्हा ‘मालगुडी’च्या चाहत्यांनी आवाज उठवला. जनतेची संतप्त प्रतिक्रिया उमटली तेव्हा कुठे सरकारला जाग आली. अनेक मोठमोठ्या व्यक्तींच्या बाबतीत हे असेच घडते आहे. त्यांच्या पाऊलखुणा उमटलेल्या वास्तू संरक्षित करण्याऐवजी कालांतराने मातीमोल होत आहेत आणि त्याविषयी ना कुणाला खेद वाटत, ना खंत! मोठ्या व्यक्तींची घरे कशी जपावीत याचा आदर्श परदेशांत पाहायला मिळतो. शेक्सपीयरचे स्ट्रॅटफोर्ड अपॉन ऍवॉनचे घर कसे अभिमानाने जपले गेले आहे, त्याचे कोडकौतुक परदेशवारी करून आलेली माणसे सांगत असतात, परंतु आपल्याकडे मात्र वारसा जपण्याच्या बाबतीत सारा आनंदीआनंदच असतो. फारच ओरड होते, तेव्हा काही वास्तू सरकारने संरक्षित घोषित केलेल्या आहेत, परंतु निधीची चणचण, कल्पकतेचा अभाव आणि मुख्य म्हणजे उदासीनता यामुळे या तथाकथित ‘संरक्षित’ वास्तूंमधून नव्या पिढीला काही प्रेरणा मिळण्याऐवजी अशा वास्तूंना भेट दिल्यावर तेथील अवकळा पाहून उदासीनतेचे सावट मात्र मनावर येते. राजकीय नेत्यांच्या वास्तू जपण्याबाबत जेवढी तत्परता दाखवली जाते, तेवढीच तत्परता कला, साहित्य आणि सांस्कृतिक जगतातील व्यक्तींच्या वास्तूंप्रती दाखवली जायला हवी. दिल्लीमध्ये नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत अनेक नेत्यांची घरे उत्तम स्थितीत राखली गेली आहेत. मग इतरांच्या बाबतीतच अशी दारूण उपेक्षा का?