उद्योजकासह पत्नी, मुलाची आत्महत्या

0
12

>> कोट्यवधींच्या कर्जामुळे कुटुंबाने संपवले जीवन; पतीची केप्यात, तर पत्नी-मुलाची कारवार येथे काळी नदीत आत्महत्या

मूळ कारवार तालुक्यातील आणि दाबोळी-वास्को येथील रहिवासी एका 50 वर्षीय उद्योजकाने कोट्यवधींच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून पाडी-केपे येथे काल आत्महत्या केली. त्याआधी त्यांची 37 वर्षीय पत्नी आणि 12 वर्षीय मुलाने देखील कारवारमधील नदीत उडी टाकत जीवन संपवले. उद्योजक श्याम पाटील यांनी पाडी-केपे येथे झाडाला गळफास लावून आत्महत्या केली, तर त्यांची पत्नी ज्योती पाटील आणि मुलगा दक्ष पाटील (वय 12) यांनी कारवारातील काळी नदीत उडी मारुन आत्महत्या केली. श्याम पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी कुंकळ्ळी पोलीस तपास करत आहेत, तर दक्ष व ज्योती पाटील यांच्या मृत्यूप्रकरणी चित्ताकुल पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सविस्तर माहितीनुसार, श्याम पाटील हे पत्नी ज्योती व मुलगा दक्ष यांच्यासह कारवारला गेले होते. 28 जून रोजी साडेआठ वाजण्याच्या सुमारास कारवार येथून कार घेऊन गोव्याकडे निघाले होते. कारवार येथून गोव्याकडे येत असताना श्याम पाटील यांनी त्यांचा मित्र राजकुमार गनी व मेहुणा सचिन नाईक यांना व्हॉईस मेसेज केला. त्यात त्यांनी आपण घेतलेले कोट्यवधींचे कर्ज फेडता येत नसल्याने आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. शिवाय कारवार येथे पत्नी व मुलाने आत्महत्या केल्याचे या व्हॉईस मेसेजमध्ये म्हटले होते.

काल दुपारी अडीचच्या सुमारास पाडी-केपे येथे मृतदेह आढळल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना झाडाला नायलॉनची दोरी बांधून गळफास घेतलेल्या एका इसमाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत श्याम पाटील यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर श्याम पाटील यांचा भाचा विराज नाईक याने मृतदेहाची ओळख पटवली. कुंकळ्ळी पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करत तपास केला जात आहे. त्यांचा मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे.
तसेच श्याम यांची पत्नी ज्योती व मुलगा दक्ष यांचे मृतदेह कारवारातील देवबाग समुद्र किनाऱ्यावर आढळून आले. या प्रकरणी चित्ताकुल पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदर पाटील कुटुंबावर कर्जाचा डोंगर वाढला होता. श्याम पाटील यांनी आपल्या कंपनीसाठी कोट्यवधींचे कर्ज घेतले होते. मात्र व्यवसायात यश न आल्याने त्यांना ते कर्ज फेडणे कठीण होऊन बसले होते. त्यांनी मित्र आणि आपल्या मेहुण्याला पाठवलेल्या व्हॉईस मेसेजमध्येही या कर्जाचा उल्लेख केला होता. याच कर्जाच्या डोंगरामुळे सदर कुटुंबाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.