पावसाचा जोर कायम; पडझडीच्या 58 घटना

0
7

>> 3 जुलैपर्यंत जोरदार वाऱ्यांसह पाऊस बरसणार; हवामान खात्याचा अंदाज

राज्यभरात पावसाचा जोर कायम असून, दुपारपर्यंत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने सायंकाळी अधिक जोर धरला. सायंकाळनंतर पेडण्यापासून काणकोणपर्यंत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. जून महिन्याच्या पहिल्या 20-22 दिवसांत लपंडाव खेळणाऱ्या पावसाने आता जोर धरला आहे. दरम्यान, येथील हवामान विभागाने शुक्रवार 30 जून, 1, 2 आणि 3 जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, जोरदार वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच राज्यभरात 58 ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. त्यात मडगाव येथे कोकण रेल्वे स्थानकाजवळ मुख्य रस्त्यावर झाड पडून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला, तर हरमल येथे एक भलामोठा वृक्ष वीजवाहिन्यांवर कोसळून वीजपुरवठा खंडित झाला.

मंगळवार रात्रीपासून सातत्याने बरसणाऱ्या पावसाचा बुधवारनंतर काल देखील जोर कायम राहिला. सकाळ आणि दुपारच्या सत्रात राज्यभरात रिमझिम सरी बरसल्या. सायंकाळी 5 नंतर पावसाचा जोर वाढला. या पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावरील पुलांवर पाणी साचले. तसेच सखल भागांतही पाणी साचून तळ्यांचे स्वरूप आले.
पावसाअभावी शेतीची कामे खोळंबली होती. पावसाला बराच विलंब झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला होता. आता जोरदार पाऊस बरसत असल्याने हळूहळू शेतीकामांना वेग येऊ लागला आहे.

राज्यभरात चोवीस तासांत झाडे पडझडीच्या आणखी 47 घटनांची नोंद झाली. म्हापसा परिसरात झाडांच्या पडझडीच्या 4 आणि जमीन खचल्याच्या एका घटनेची नोंद झाली. पेडण्यात झाडांच्या पडझडीच्या पाच घटनांची नोंद झाली. वाळपई परिसरात 2, जुने गोवा परिसरात 5, मडगाव परिसरात 3, वास्को भागात 6, फोंडा भागात 4, कुडचडेत 4, वेर्णा येथे 1, कुंडईमध्ये 4, पिळर्ण येथे 2, कुंकळ्ळी येथे 1 आणि पर्वरी येथे 4 झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली. त्याशिवाय गुरुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत झाडाच्या पडझडीच्या आणखी 11 घटनांची नोंद झाली.