– डॉ. शुभांगी सुनील नाईक (शब्दांकन-देवकी नाईक)
मानवाला आज अमाप सुखसोयी उपलब्ध आहेत. तरीसुद्धा आपल्याला नेहमी वाटत राहतं की, आपल्या काही इच्छा अपूर्ण आहेत. आपण मग ह्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यामागे लागतो. अनेकदा असफल ठरतो. अनेकदा आपल्या मनाला कसलं तरी दुःख, कसली तरी व्यथा सतत सलत राहते.
छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण आपलं सुखी जीवन निराशामय करून ठेवतो. आपली झोप उडते. मग आपल्याला काहीच बरं वाटत नाही. कुठंच लक्ष लागत नाही. एक प्रकारची उदासीनता आपल्या चेहर्यावर पसरते. लक्षात ठेवा ही उदासीनता एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपवू शकते. उदासीनता हा मानसिक विकार आहे.
अशी एकही व्यक्ती नसेल जी, उदासीनतेपासून मुक्त आहे, दूर आहे. जगातील नामवंत आणि थोर व्यक्तीची सुद्धा ह्या उदासीनतेपासून सुटका झालेली नाही. शेक्सपिअर, मायकेल, अंजलो, टॉलस्टॉय, लिंकन, इंदिरा गांधी या सारख्यांना सुद्धा कधी ना कधी उदासीनतेनं ग्रासलेल होतं. ही उदासीनता कुण्याच्याही वाट्याला येऊ शकते तसेच औदासीन्य कुठल्याही कारणानं येऊ शकते.
जागतिक सर्वेक्षणांत असे आढळून आले की, नोकरी करणार्या जोडप्यांमध्ये औदासीन्य जास्त असतं. भारतात स्त्रियांपेक्षा पुरुषांना हा मानसिक विकार जास्त सतावतो. उदासीनता आल्यावर व्यक्ती हसणेच विसरते. त्याच्या स्वभावात आमुलाग्र बदल घडून येतो. माणूस चिडचिडा होतो, तो कुणाशीही बोलणं टाळतो. त्याला गोंधळ, गोंगाट सहन होत नाही. मोठ्यानं बोललेलं सुद्धा आवडत नाही. दैनंदिन जीवनातील आवडणार्या गोष्टीसुद्धा त्याला त्या परिस्थितीत आवडत नाही. पाहणार्यांना हा त्याच्यात झालेला बदल लगेच लक्षात येतो. त्यालाही वाटतं त्याचं काही तरी बिनसलंय.
उदासीनता एखाद्या व्यक्तीला इतकी पछाडते की, कधी कधी त्याला वाटतं, ह्यावर काही इलाज नाही. आपलं जगणं निरर्थक आहे. आणि त्यावर उपाय एकच तो म्हणजे आत्महत्या. ह्या उदासीनतेमुळे माणूस आत्महत्याही करतो. आत्महत्या हे भ्याडपणाचे लक्षण आहे. आपण जीवनातील प्रत्येक संकटाला सामोरे गेले पाहिजे, हीच आपली आयुष्यातील कठोर परीक्षा असते. आपण त्या कसोटीला उतरले पाहिजे. सोन्याला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागते. कित्येक थोर माणसे हे घाव सोसूनच नामवंत झालेले आहेत. माणसाकडे सहनशक्ती असायला हवी.
उदासीनता दोन विभागामध्ये विभागली जाते. १) न्युरोटिक डिप्रेशन
२) सायकोटिक डिप्रेशन
– न्युरोटिक डिप्रेशनमध्ये उदासीनता यायला काही तरी कारण असावं लागतं.
– सायकोटिक डिप्रेशनमध्ये उदासीनतेचं स्पष्ट कारण आढळत नाही. ती आंतरिक कारणामुळे मेंदूतून उद्भवते.
उदासीनतेच्या मूळ कारणाचा अद्याप शोध लागायचा आहे. प्रत्येक माणूस दुसर्यापासून वेगळा असतो. कुठल्या क्षणाला, त्याला कुठल्या कारणामुळे उदासीनता येईल सांगता येत नाही. दारूच्या व्यसनाच्या आधीन झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला तिच्या हळवेपणामुळे उदासीनता येऊ शकते. मालक आणि नोकर ह्यांच्यातील तंटा, घरात सून सासूमध्ये होणारे मतभेद, शेजार्यांशी भांडण उदासीनतेला आमंत्रण देत असतात. ह्यामुळे घरातील वातावरण दूषित होतं. प्रत्येक माणूस चुकत असतो. पण प्रत्येकवेळी त्याला शिस्त लावू नये. त्याला स्वतःची चूक समजून घेण्याचा प्रयत्न करू द्यावा.
तसेच आपण आजच्या युगात पाहत असतोच की, वयात आलेल्या तरुणांमध्ये ही उदासीनता जास्त असते. त्याची कारणेही अनेक असू शकतात. बेकार तरुण-तरुणी तर उदासीनतेला मिठी मारून बसतात. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षांची भीती वाटते व कधी कधी प्रेमभंग, किंवा प्रियकराचा अथवा स्वतःच्या मुलाचा मृत्यू असह्य होऊन उदासीनता येत असते. ह्या अशा परिस्थितीत व्यक्ती आत्महत्यासुद्धा करण्यास प्रवृत्त होत असतात.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात पाहत असतो की, जास्तपणे व्यवहारात बुडालेली व्यक्ती, कर्जात बुडालेली व्यक्ती, आरोग्य बिघडलेली व्यक्ती तसंच कॅन्सर, एड्ससारखे रोग झालेली व्यक्ती पूर्णतः उदासीनतेच्या आधीन होते.
वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?
खालील कोणतीही चार किंवा अधिक लक्षणे व्यक्तीमध्ये दोन आठवडेहून अधिक काळ आढळल्यास त्या व्यक्तीने वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
१) सतत दुःख मनात ठेवून घेणं.
२) सतत वाईट होणार असं वाटून घेणं.
३) नेहमी आपल्याला दोषी ठरवणे.
४) कामात किंवा इतर व्यवहारात आनंद मिळत नाही.
५) झोप येत नाही किंवा जास्त झोपणं, किंवा खूप लवकर उठणे.
६) भूकेमध्ये बदल होत असल्यास.
७) मधेच थकवा येतो, आळस येतो.
८) आत्महत्येचे विचार मनात येणं.
९) माणूस चिडचिडा किंवा अस्वस्थ होणे.
१०) व्यक्तीला लक्ष गुंतवण्यास व निर्णय घेण्यास कठीण जाणे.
होमिओपॅथिक ट्रिटमेंट ः-
उदासीनतेसाठी ः ऍकोनाईट नॅप-३०-२००
अपचनामुळे उदासीनता ः आल्फा आल्फा
दीर्घ आजारामुळे उदासीनता ः नॅट्रममूर-२००
झोपमोड ः नक्सोआम-२००
कुठल्याही कामातून लक्ष उडणे- फॉस्फॉरिक ऍसिड-३०
ही औषधे केवळ वैद्यकीय सल्ल्यानुसारच घ्यावी.
उदासीनतेनं पछाडलेल्या व्यक्तींना धीर द्यावा. चार हिताच्या जीवनाविषयी गोडी निर्माण करणार्या गोष्टी सांगाव्या. त्याच्याशी प्रेमानं-ममतेनं वागून त्याचं मन हलकं करावं. असं केल्यानं त्याची उदासीनता नाहीशी होते.