इराणच्या शस्त्रास्त्र उत्पादन स्थळांवर इस्रायलचा हल्ला

0
4

इस्रायलने बुधवारी इराणवर शक्तिशाली हवाई हल्ले केल्याने तेहरान आणि त्याच्या आसपासच्या अणु प्रकल्पातील दोन सेंट्रिफ्यूज उत्पादन सुविधांसह प्रमुख लष्करी पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष इस्रायलच्या या ताज्या हल्ल्यांमुळे आणखी तीव्र झाला असून, यामुळे प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे.

इस्रायली लष्कराने काल रात्री इराणच्या सेंट्रिफ्यूज उत्पादन स्थळावर आणि अनेक शस्त्रास्त्र उत्पादन स्थळांवर हल्ला केला, असे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. या ऑपरेशनमध्ये 50 हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. गुप्तचर शाखेच्या अचूक मार्गदर्शनाखाली, गेल्या काही तासांत 50 हून अधिक हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी तेहरान परिसरातील लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत, असेही पुढे म्हटले आहे.
इस्रायली संरक्षण दलाने म्हटले आहे की, ज्या सेंट्रिफ्यूज स्थळावर हल्ला केला, त्या सेंट्रिफ्यूजमुळे इराणच्या अण्वस्त्रांसाठी युरेनियम समृद्धीकरण क्षमतेला गती मिळणार होती. इराण सरकार अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी बनवलेल्या युरेनियमचे समृद्धीकरण करत आहे.
इस्रायलने लक्ष केलेल्या इतर ठिकाणांमध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसाठी घटक तयार करणाऱ्या कारखान्यांचा समावेश आहे.

बुधवारी इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे किती नुकसान झाले, याची पूर्ण माहिती इराणने अद्याप दिलेली नाही, परंतु तेहरानमधील रहिवाशांनी स्फोटांची मालिका झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यांमुळे परिसर हादरला असून, रात्रीच्या अंधारात अनेकांना पळून जावे लागले. इराण-इस्रायल संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये अंदाजे 580 हून अधिक लोकांचा मृत्यू
झाला आहे.