आयपीएल सट्टा घेणाऱ्या तिघांना सांगोल्डात अटक

0
7

>> साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या तिघांना साळगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे साडे चारलाखांचा मुद्देमाल जप्त केला. साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सांगोल्डा येथील एका बंगल्यात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्यानंतर शनिवारी (दि. 6) रात्री सदर बंगल्यावर छापा टाकला आणि तिघांना मुद्देमालासकट पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये कल्पेशभाई चंदुलाल ठक्कर, संदीपकुमार जयेशभाई ठक्कर आणि मयूर पटेल यांचा समावेश असून ते गुजरातचे निवासी आहेत.

शनिवारी आरसीबी आणि राजस्थान रॉयल या संघांमध्ये सामना चालू असणाऱ्या क्रिकेट सामन्यावर ते मोबाईल आणि लॅपटॉपद्वारे ऑनलाईन पद्धतीने सट्टा घेत होते. त्यांच्याकडून दहा मोबाईल संच, बारा लॅपटॉप, तीन वह्या आणि तीन राऊटर्स मिळून सुमारे 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सोमनाथ माजिक, उपनिरीक्षक किशोरकुमार नाईक, हवालदार विशांत मयेकर, विजय पाळणी, यशवंत साखळकर, महिला पोलीस हवालदार सोनिया म्हाळसेकर यांचा या कामगिरीत सहभाग होता. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.