Home बातम्या आयपीएलला फिक्सिंगचा डाग

आयपीएलला फिक्सिंगचा डाग

0

प्रशांत वेरेकर

एका षटकात सहा चौकार किंवा सहा षटकार असा धावांचा पाऊस किंवा हॅट्‌ट्रिकसह चार बळी, शेवटच्या चेंडूवर विजय, अफलातून झेल किंवा चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण, जोडीला मादक चिअर लिडर्सच्या दिलखेचक अदा यांमुळे इंडियन प्रिमियर लीग तथा आयपीएल म्हणजे मनोरंजनाची एक पर्वणीच जगभरातील क्रिकेटप्रेमींना ठरल्याचे सर्वसाधारण मत बनले आहे. याचवेळी अलीकडील काळात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्यामुळे आयपीएल नावाचे भारतीय क्रीडा ब्रँड क्रिकेट खेळाच्या विकासाच्या किंवा भवितव्याच्या दृष्टीने हितकारक की मारक ठरणार हा विषय वादविवादाचा मुद्दा ठरू शकतो.

आयपीएलचे यंदाचे पाचवे वर्ष सर्वात यशस्वी ठरणार असल्याचा दावा या स्पर्धेच्या धुरीणांनी स्पर्धा सुरू होण्याआधी केला होता; मात्र ही स्पर्धा अंतिम टप्प्यात येत असतानाच घडलेल्या घटनांनी या स्पर्धेला गालबोट लावले आहे. एका अर्थी आयपीएलला आयपीसीचा (इंडियन पीनल कोड) हादरा बसला असेच चित्र जाणवत आहे. आयपीएलमधील कथित काळा पैसा, स्पॉट किंवा मॅच फिक्सिंगचे आरोप, त्यावरून काही खेळाडूंचे झालेले निलंबन, एका ऑस्ट्रेलियन खेळाडूला विनयभंगाच्या आरोपावरून झालेली अटक, बॉलिवूड बादशहा शाहरुख खान याने केलेली दंगामस्ती या सर्वांवर कारवाईच्या बडग्यासाठी आयपीसीचा वापर अनिवार्य असल्यामुळे यंदाच्या आयपीएलला आयपीसीचा दणका बसल्याची कोटी केल्यास वावगे ठरणार नाही.

आयपीएल स्पर्धेविषयी क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांमध्येही भिन्न मते आहेत. कोणत्याही अन्य विषयाप्रमाणेच क्रिकेटच्या या ‘बोन्साय’ रूपाच्याही चांगल्या-वाईट बाबी आहेत. या स्पर्धेमुळे नावही न ऐकलेले खेळाडू प्रकाशझोतात येऊ शकले. अशा खेळाडूंना यामुळे मोठ्या प्रमाणात धनलाभही झाला. प्रस्थापित क्रिकेटपटू तर कोट्यधीश बनले आहेत. यंदाच्या स्पर्धेदरम्यान एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे ज्या गोष्टींबाबत संशय व्यक्त केला जात होता, त्यावर झगझगीत प्रकाशझोत पडला आणि खळबळ उडाली. यात भर पडली ती ल्व्यूक पॉमर्सबॅक या बंगळूर संघाच्या खेळाडूवरील विनयभंगाचा आरोप व परिणामस्वरूप अटकेची. शाहरूख खानची मैदानावरील दांडगाई हाही वादाचा विषय ठरला.

आयपीएल स्पर्धा म्हणजे जागतिक क्रीडा क्षेत्रात भारताचा एकमेव क्रीडा ब्रँड असल्याने त्याला या घटनाक्रमांमुळे धोका निर्माण झाला आहे आणि विशेष करून स्पॉट फिक्सिंगचे ताजे प्रकरण हे (अद्याप सिद्ध झाले नसले तरी) भारतात घडले असल्याने या सर्वाच्या मुळाशी जाऊन कठोर कारवाई करणे हे बीसीसीआयचे परम कर्तव्य आहे.

आयपीएलमध्ये आलेला कथित काळा पैसा आणि स्पॉट फिक्सिंग हे विद्यमान घडीस कळीचे मुद्दे बनले आहेत. येथील कायदा यंत्रणा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काळ्या पैशाचा मुद्दा सोडविणे तसे कठीण नाही. मात्र स्पॉट फिक्सिंगचा प्रश्‍न सोडवणे बरेच कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे काही देशी खेळाडूंनी फ्रँचायजींकडून बीसीसीआयने निश्‍चित केलेल्या त्यांच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम काळ्या पैशाच्या स्वरूपात घेतल्याचे उघडकीस आणले. त्यानंतर या खेळाडूंनी जरी हात झटकण्याचे प्रयत्न केले असले आणि त्यानंतरही त्या खेळाडूंना बीसीसीआयने निलंबित केले असले तरी संशयाचे हे भूत रेंगाळतच राहणार आहे.

या सर्वास बीसीसीआयने खेळाडूंची किंमत ठरविण्याची स्वीकारलेली पद्धत कारणीभूत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आयपीएलसारख्या स्पर्धेत खेळाडूंची किंमत ही मागणी-पुरवठा तत्त्वावर ठरत असते. या संदर्भातील एक उत्तम उदाहरण देता येईल ते रवींद्र जडेजाचे. रवींद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघ ६ दशलक्ष डॉलर्सना खरेदी करील असे आधी कोणालाही वाटले नव्हते; परंतु ४ फेब्रुवारीच्या लिलावात तसे घडले. मुंबई इंडियन्सशी २ दशलक्ष डॉलर्सना टाय झाल्यानंतर चेन्नईने जडेजाला ४ लाख डॉलर्स वाढवून संघात घेतले. सर्वसामान्य स्थितीत बीसीसीआयने जडेजाची किंमत २ दशलक्ष डॉलर्स केली नव्हती. त्याचवेळी त्याच्या किमतीचे प्रमाणीकरण तुलनेसाठी धोनीशीही केले जाऊ शकत नव्हते. धोनीला चेन्नईने १.८ दशलक्ष डॉलर्सना संघात राखून ठेवले होते. जडेजाची किंमत गेल्या लिलावाच्या संदर्भातून आणि फ्रँचायजींच्या गरजांच्या आधारावर ठरवण्यात आली असण्याची शक्यता आहे. या पद्धतीच्या परिणामस्वरूप ज्या देशी खेळाडूंना आपल्यावर किमती संदर्भात अन्याय झाल्याचे वाटते असे खेळाडू टेबलाखालून व्यवहार करण्यास उद्युक्त होतात. बीसीसीआयच्या या धोरणामुळे सौरभ तिवारीसारख्या खेळाडूला १.६ दशलक्ष डॉलर्सची किंमत मिळते आणि त्याच्या एवढ्याच कुवतीचे अनेक खेळाडू १० ते ३० लाख रुपयांच्या स्लॅबमध्ये टाकले जातात. मोनिश मिश्रा व अन्य पाच खेळाडूंचा दर्जा सौरभ तिवारी याच्यापेक्षा कमी नाही. त्यामुळे आपल्याएवढ्याच दर्जाच्या खेळाडूला आपल्यापेक्षा प्रचंड रक्कम मिळते हे पाहून त्यांना मत्सर वाटणे स्वाभाविक आहे. या मानसिकतेतून मोनिश मिश्रा, शलभ श्रीवास्तव, टी. पी. सुधींद्र, अमित यादव व अभिनव बाली यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र या मानसिकतेचे समर्थन कोणालाही करता येणार नाही. त्याचवेळी भविष्यात या गोष्टी होऊ न देण्यासाठी बीसीसीआयने फ्रँचायजी ज्या खेळाडूंना तसेच संघात राखून ठेवील त्यांचा अपवाद सोडून इतर सर्व खेळाडूंना लिलावाच्या रिंगणात ठेवावे लागेल. या पद्धतीमुळे या खेळाडूंची किंमत मार्केट दरानुसार निश्‍चित होऊन खेळाडूंना टेबलाखालून व्यवहार करण्याची संधी राहणार नाही.

स्पॉट फिक्सिंग ही फार मोठी डोकेदुखी ठरली आहे. जगभरात कोठेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्पॉट फिक्सिंग यशस्वीपणे हुडकून सिद्ध करणारी यंत्रणा उपलब्ध नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास रणजी क्रिकेट स्पर्धेतील एखाद्या सामन्यात एखाद्या फलंदाजाने काही षटके निर्धाव खेळून काढल्यास संबंधित फलंदाज हेतुपूर्वक तसा खेळ करतो असे म्हणणे शक्य नाही. गेल्या मोसमात गोव्यात महाराष्ट्र विरुद्ध गोवा यांच्यातील पर्वरीतील मैदानावर खेळल्या गेलेल्या रणजी सामन्यात अशी संशयास्पद स्थिती निर्माण झाली होती. परिणामस्वरूप गोव्याचा तडाखेबंद फलंदाज स्वप्निल अस्नोडकरला निलंबितही करण्यात आले होते. (स्वप्निलविषयीचा जीसीएचा सदर निर्णयही तसा वादाचाच मुद्दा आहे ही बाब वेगळी) यावरून स्पॉट किंवा मॅच फिक्सिंग सिद्ध करणे किती कठीण आहे हे कळून येते.

भारतीय उपखंडात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांदरम्यान सट्टेबाजीला तर बहर येत असतो. अशाच प्रकारांमधून महंमद अझरुद्दीन, अजय जडेजा यांसारखे नजाकतदार खेळाडू कलंकित बनले. सट्टेबाजी व मॅचफिक्सिंग हातात हात घालून कार्यरत आहे. सट्टेबाजीला कायदेशीर करणे हा मॅच फिक्सिंगच्या प्रकारांवर उपाय होऊ शकेल असे अनेकांना वाटत असले तरी ते तितकेसे खरे नाही. अन्यथा सलमान भट्ट, महंमद आसिफ आणि महंमद आमीर या युवा पाकिस्तानी खेळाडूंबाबत जे घडले ते घडले नसते. इंग्लंडमध्ये सट्टेबाजी बर्‍याच काळापासून कायदेशीर आहे. असे असूनही या पाकिस्तानी खेळाडूंचे प्रकरण घडलेच. त्यामुळे कठोर दंड हा प्रभावी उपाय ठरू शकतो. स्पॉट फिक्सिंग करण्यात गुंतलेल्या खेळाडूंवर आजन्म बंदीची शिक्षा हा यावर रामबाण इलाज होऊ शकेल.

या पार्श्‍वभूमीवर सर्वच क्रिकेटपटूंवर संशयाने पाहणे उचित ठरणार नाही. सर्वच ठिकाणी काही कुजके आंबे असतातच. मॅच फिक्सिंग, स्पॉट फिक्सिंगच्या घटनांमुळे क्रिकेटवर निरागसपणे प्रेम करणार्‍या शौकिनांमध्ये उद्विग्नता निर्माण होत असते. याच अनुषंगाने आयपीएल स्पर्धेच्या जागतिक ब्रँडच्या प्रतिमेला फिक्सिंग प्रकरणामुळे तडा गेला आहे. तरीही म्हणून ही स्पर्धाच बंद करावी अशी मागणीही सयुक्तिक ठरणार नाही. मात्र क्रिकेट कलंकित होऊ न देण्यासाठी कठोर भूमिका बीसीसीआयच्या धुरीणांना स्वीकारावीच लागणार आहे.

विद्यमान आयपीएलमधील विविध अनुचित प्रकारांमुळे भारताचे एक माजी आक्रमक फलंदाज तथा विद्यमान खासदार कीर्ती आझाद यांनी कठोर शब्दांत टीका केली. एवढेच नव्हे तर या सर्वांच्या निषेधार्थ त्यांनी लाक्षणिक उपोषणही केले. संसदेतही या सर्वांवर तिखट प्रतिक्रिया उमटल्या. केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी या संदर्भात बीसीसीआयला अनेक सूचनाही केल्या आहेत. अशा घटना टाळण्यासाठी बीसीसीआयचा आयपीएलमध्ये कोणताही संबंध असू नये असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे. पाच खेळाडूंना निलंबित करून फिक्सिंगचा डाग पुसला जाणार नाही. दीर्घकालीन उपाययोजना त्यासाठी कराव्या लागतील. या संघटनेचे सर्व आर्थिक व्यवहार आरटीआयखाली आणावे हा त्यांचा आग्रह आहे.

बीसीसीआयने आयपीएलपासून अलिप्त राहावे हा मुद्दा अधोरेखित करताना माकन यांनी इंग्लिश प्रिमियर लीग स्पर्धेचे उदाहरण दिले आहे. तेथील राष्ट्रीय फुटबॉल संघटनेऐवजी तेथील क्लब्सतर्फे इंग्लिश प्रिमियर लीग स्पर्धेचे व्यवस्थापन पाहिले जाते. त्यामुळे राष्ट्रीय संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे हितसंबंध लीग स्पर्धेच्या व्यवहारांमध्ये असण्यास प्रतिबंध होतो असा त्यांचा दावा आहे. मात्र आयपीएलमधील चेन्नई फ्रँचायजीचे सर्वेसर्वा हे खुद्द बीसीसीआयचे अध्यक्ष. एन. श्रीनिवासन हे आहेत.

आता बीसीसीआयने फिक्सिंगमधील संशयित पाच खेळाडूंना निलंबित करून पहिले पाऊल टाकले आहे. या प्रकरणी चौकशी समितीप्रमुख म्हणून रवी सावनी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. सावनी हे आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी व सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल १५ दिवसांत देण्याची मुदत त्यांना देण्यात आली आहे. हे प्रकरण निलंबित पाच खेळाडूंचा बकरा करून थांबते की आणखी काही सांगाडे नजीकच्या काळात बाहेर येतात ते लवकरच दिसून येईल.