– डॉ. सोमनाथ कोमरपंत
भारताच्या सांस्कृतिक परंपरेत प्राचीन काळापासून श्रीगणेशाचे आराध्य दैवत म्हणून आगळे–वेगळे स्थान आहे. सर्वत्र शुभकार्याचा प्रारंभ गणेशस्तवनाने करण्याचा प्रघात आहे. अध्ययनाचा आरंभ ‘श्रीगणेशाय नमः’ या शब्दांत वंदन करूनच होई. पूर्वी ही अक्षरे धूळपाटीवर गिरवली जात असत. अशा प्रकारे गणेश हे विद्येचेही दैवत मानले जाते. महाभारताच्या आदिपर्वात सांगितलेल्या कथेनुसार महाभारताची रचना करताना व्यासमुनींचा लेखक गणपती हाच होता. परंतु ही कथा आदिपर्वात मागाहून समाविष्ट केली असावी असे महाभारताच्या संशोधकांचे मत आहे.
गणपती किंवा गणेश म्हणजे गणांचा स्वामी. गण म्हणजे समुदाय. ख्यातनाम प्रकांड पंडित आणि प्रज्ञावंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी नोंदविलेल्या मतांनुसार ‘गणपत्यथर्वशीर्ष’ या उपनिषदात गणपती या दैवताचे वर्णन आलेले आहे. परंतु ईशादी प्राचीन उपनिषदांत तज्ज्ञांनी याची गणना केलेली नाही. ते गुप्तकालात रचले असावे. आर्य आणि आर्येतर संस्कृती एकात्म होण्याच्या कालखंडात आर्येतर संस्कृतीच्या इतर दैवतांप्रमाणे गणपती हे दैवत आर्यांनी स्वीकारले असे ते म्हणतात.
गणेशजन्माविषयी अनेक आख्यायिका जनमानसात प्रचलित असल्या तरी तो शिव–पार्वती यांचा पुत्र हे भारतीय परंपरेने प्रमाण मानलेले आहे.
गणपतीचे शिर गजाचे असले तरी त्याचा एक तुटलेला दात हातात असतो. दुसरा मुखात असतो. मूषक हे त्याचे वाहन. गणपती चतुर्हस्त असून दात, पाश, अंकुश आदी गोष्टी त्याने निरनिराळ्या हातांत धारण केलेल्या असतात. चौथा वरदहस्त असतो. ऋद्धी आणि सिद्धी या पार्श्वदेवता. गुप्तकाल हे प्राचीन भारतातील सुवर्णयुग. त्या कालखंडात गणपतीला शुभदेवता म्हणून महती प्राप्त झाली. भारताप्रमाणेच आशिया खंडातील चीन, जपान आणि कोरिया या देशांत त्याचे त्या काळात पूजन होऊ लागले.
शेंदूर, रक्त वस्त्र, रक्त फूल, दूर्वांकुर आणि मोदक किंवा लाडू ही त्याची पूजासामग्री.
(मराठी विश्वकोश ः खंड ४ था, प्रमुख संपादक ः तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, म.रा.सा.सं. मंडळ, पृ. ८०५–८०६)
श्रीगणेश हा सुख प्राप्त करून देणारा, दुःख नाहीसे करणारा. त्याची मुद्रा आपल्या मनात प्रसन्नता आणि आल्हाद निर्माण करते. ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या प्रारंभी श्रीगणेशाचे स्तवन केलेले आहे. त्याला ॐकार स्वरूप मानलेले आहे. त्यांच्या वाग्विलासाचे नितांत रमणीय रूप येथे प्रकट झालेले आहे. त्यांची प्रज्ञा आणि प्रतिभा येथे एकवटली आहे. भारतीय प्रज्ञेचे आणि सर्जनशीलतेचे दैवत म्हणूनही श्रीगणेशाकडे पाहता येईल. ज्ञानदेवांनी यथोचित शब्दांत ते पहिल्या अध्यायात उलगडून दाखविले आहे.
जनमानसाची ज्या दैवताविषयी अनन्य निष्ठा आहे, ममत्व आहे; त्या मंगलमूर्तीचे रामदासांनी केलेले स्तवन अर्थवाही आणि प्रासादिक आहे. त्यांची आरती किती लोकप्रिय आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
सुखकर्ता, दुःखहर्ता वार्ता विघ्नाची
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची
कंठी झळके माळ मुक्ताफळांची
जय देव जय देव जय मंगलमूर्ती
दर्शनमात्रे मनःकामना पुरती
जय देव जय देव॥
पुढच्या दोन चरणांतही रामदासांनी श्रीगणेशाचे तन्मयतेने वर्णन केलेले आहे. शेवटी या देवाधिदेवाला संकटात धावून येण्यासाठी आणि निर्वाणीच्या क्षणी रक्षण करण्यासाठी आर्जवाने विनंती केलेली आहे. आधुनिक काळातील कवी–कवयित्रींचेही श्रीगणेश हे लाडके दैवत आहे. शांताबाई शेळके यांची गणेशाविषयीची कित्येक गाणी लोकप्रिय झालेली आहेत. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांनी ती गायलेली आहेत.
सरत्या श्रावणात पावसाचा वेग कमी झालेला असतो. उन्हा–पावसाचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. श्रावण संपतो आणि भाद्रपद सुरू होतो. शुद्ध चतुर्थीला येते ती गणेशचतुर्थी. आबालवृद्धांची प्रतीक्षा असते ती या दिवसासाठी. जन्माष्टमीपासूनच गणेशचतुर्थी जवळ आल्याची ललकारी दिली जाते. कित्येक महिन्यांपूर्वी गणेशमूर्ती सजू लागलेल्या असतात. सामान्यतः हा उत्सव दोन दिवसांपुरता मर्यादित असतो. काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा दिवसांपर्यंत मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. विशेषत्वाने हा उत्सव अनंत चतुर्दशीपर्यंत चालतो. महाराष्ट्रात हा उत्सव पेशवाईच्या काळापासून साजरा केला जातो. पश्चिम किनारपट्टीतील कोकण, गोवा आणि कारवार या भागांत त्याचप्रमाणे बेळगाव येथे तो उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो.
निसर्ग हिरवाईने नटलेला असतो… शेते बहरून आलेली असतात…. ‘सस्यश्यामला’भूमीने पुढे येणार्या समृद्धीचे दृढ आश्वासन दिलेले असते… आसमंत प्रसन्न असतो… लोकांची मने प्रसन्न असतात. या पार्श्वभूमीवर मंगलमूर्तीचे आगमन होते… गणेशचतुर्थी हा एका दृष्टीने सर्जनशीलतेचा उत्सव असतो. दुसरीकडे भक्तिभावनेने साजरा करण्याचा हा उत्सव असतो. बदलत्या काळातही कुटुंबातील व्यवसायानिमित्त विखुरलेली माणसे एकत्र येण्याचा हा सोहळा असतो.
यानिमित्ताने घरादाराची स्वच्छता केली जाते. मखर साजविले जाते. विविध पद्धतीने दीपरोषणाई केली जाते. मखरातील मंगलमूर्तीच्या दर्शनाने नेत्र सुखावतात. नंतर लक्ष वेधून घेते शीर्षभागी असलेली फुला–फळांनी शोभिवंत झालेली ‘माटोळी’; आंब्याच्या पानांचे तोरण ल्यालेली. माणसांच्या सर्जनशीलतेची आणि कल्पकतेची कसोटी येथे लागत असते. ही फुले, ही फळे परिसराशी नाते सांगणारी असतात. अनेक आरत्या म्हटल्या जातात. घुमट, समेळ, झांज इत्यादींच्या नादनिदानाने आसमंत दुमदुमून जातो. माणसांच्या जीवनशैलीचा ताल, तोल आणि लय यांचे प्रतिबिंब तेथे पडलेले असते. गतिमान जीवनप्रवाहात परंपरेचे पालन करण्याची प्रेरणा त्यामागे असते. बालकमंडळीच्या निरागस आनंदाला तर सीमाच नसते. ती मग्न असतात फटाके उडविण्यात, फुलबाज्या व झाडे लावण्यात, बाण उडविण्यात. या नव्या जमान्यात आतषबाजीचे नानाविध प्रकार आलेले आहेत. करंज्या, मोदक, लाडू आणि मिष्टान्नाची रेलचेल असते. जीवनकलह कितीही वाढू दे, महागाई गगनाला भिडू दे; गणेशचतुर्थीच्या उत्साहात कुठेही कमी पडू द्यायचे नाही, मुलांना नाउमेद करायचे नाही असे वडीलधार्या माणसांनी ठरविलेले असते. हे दोन दिवस कुटुंबीयांना भेटण्याचे, मित्रमंडळीला भेटण्याचे, गणेशमूर्ती आणि त्याच्या भोवतालची सजावट न्याहाळण्याचे…. असा हा संमीलनाचा सोहळा… मंगलमूर्तीच्या आगमनाच्या वेळची उत्कंठा आणि त्याच्या विसर्जनाच्या वेळची उदासीनता, निःस्तब्धता हा वर्णन करण्याचा विषय नसून अनुभवण्याचा असतो. संस्कृतीच्या गाभार्यात अशा प्रकारे गणेशाची प्रतिष्ठापना झालेली आहे. लोकांच्या श्रद्धेची पाळेमुळे अशी खोलवर गेलेली आहेत. जीवनमूल्यांवर संस्कार करणारा हा उत्सव; त्याचप्रमाणे कलेचे संवर्धन करणारा.
वैयक्तिकरीत्या घराघरांतून गणेशमूर्ती पुजली जाते; त्याचप्रमाणे सार्वजनिक रीतीने गणेशोत्सव साजरा होतो. लोकमान्य टिळकांनी १८९३ साली महाराष्ट्रात ही प्रथा सुरू केली. पारतंत्र्याच्या काळात राष्ट्रजागृती आणि समाजप्रबोधन करावे या प्रेरणेतून त्यांनी तो सुरू केला. शिवजयंत्युत्सवाची जोडही त्यांनी त्याला दिली. या दोन उत्सवांमुळे पुणे व मुंबई येथे राजकीय नेते, विचारवंत आणि विद्वान यांची व्याख्याने होऊ लागली. यातून राष्ट्रीय कीर्तनकार पुढे आले. तळागाळापर्यंत त्यांनी राष्ट्रप्रेमाची ऊर्मी नेऊन पोचविली. पोवाडे व मेळ्याची पदे रचली गेली. समाज प्रबुद्ध होण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. पुढे हे लोण सर्वत्र पसरले. देशाच्या अनेक भागांत तो साजरा होऊ लागला.
शतकाहून अधिक काळ लोटला… आज या सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थिती काय आहे? मध्यंतरीच्या काळात स्वातंत्र्य आले. प्रेरणा बदलल्या…. पूर्वी प्रबोधन करणे हा अग्रक्रम होता. स्वराज्यात काही प्रमाणात सुबत्ता आल्यामुळे लोकांची मानसिकता बदलली. प्रबोधनाची जागा मनोरंजनाने घेतली… येथपर्यंत ठीक होते. पण अलीकडे अभिरुचीलाही अनिष्ट वळण लागले आहे. भौतिक समृद्धी आल्यानंतर सांस्कृतिक जीवनावर कसे आघात होतात हा आज चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झालेला आहे. मूळ उद्दिष्ट बाजूला पडलेले आहे. महानगरांमध्ये या उत्सवाच्या वेळी उत्साह आणि चैतन्य निर्माण होण्याऐवजी कोलाहलच माजतो. अशावेळी अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे… समाज घडविण्याचे कार्य एकेकाळी सार्वजनिक गणेशोत्सवाने हिरिरीने केले, पण आजचे वास्तव काय आहे? या निमित्ताने लक्षावधी रुपयांची उलाढाल होते. हा निधी लोककल्याणाच्या स्थायी स्वरूपांच्या विधायक कार्याकडे वळवायला हवा.
या माध्यमात बदलत्या काळातील आव्हाने पेलण्याची फार मोठी क्षमता आहे. हा केवळ धार्मिक उत्सव नाही. त्याला सामाजिक आणि सांस्कृतिक मिती आहे. समाजातील वाढती विरूपता घालवून आदर्श जीवनमूल्ये पुन्हा एकदा रुजविण्याचे उत्तरदायित्व सार्वजनिक गणेशोत्सवाचे व्यासपीठ स्वतःकडे घेऊ शकते. भारतीय गणराज्यात भविष्यकाळात असे घडेल अशी आशा बाळगूया!