मोपा विमानतळ ही गोव्याची गरज असून त्याच्यावर कुणीही राजकारण करू नये. केंद्र सरकारने दाभोळी विमानतळाच्या विस्तारासाठी ५०० कोटी दिले असून ते काम पूर्ण होऊ दे नंतर मोपाला गती देण्यात येईल, अशी ग्वाही विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनी आगरवाडा येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले.
आगरवाडा येथे २४ रोजी सायंकाळी मांद्रे मतदारसंघातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांची सभा श्री सातेरी सभागृहात आयोजित केली होती.
मांद्रे कॉंग्रेस गटने आयोजित केलेल्या बैठकीला कॉंग्रेस केंद्रीय निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार, माजी केंद्रीय कायदा मंत्री ऍड. रमाकांत खलप, गोवा कॉंग्रेस प्रदेश सचिव बाबी बागकर, उत्तर गोवा सचिव लक्ष्मीकांत गोवेकर, हरमल माजी सरपंच डॅनियल डिसोझा, सुधीर कान्नाईक, आबा शेटगांवकर, अमरनाथ पणजीकर, अमोल राऊत, चंद्रकांत शेटगांवकर, बाबलो शेटगांवकर, राजमोहन शेट्ये आदी हजर होते.
स्वागत व सूत्रसंचालन सिरील फर्नांडिस यानी केले.
कॉंग्रेस केंद्रीय निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार यानी आपल्या भाषणात भाजपावर घणाघाती आरोप करताना, आजपर्यंत या पक्षाने केवळ समाजामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला.
माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत खलप यानी आपल्या भाषणात मोपा हा अत्यंत महत्वाचा असून मोपा विमानतळ येण्यापूर्वी साधन सुविधा, वीज, पाणी व रस्ते दळण वळणाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे.
गोवा कॉंग्रेस प्रदेश सचिव बाबी बागकर यांनी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यानी यापूर्वी कार्यकर्त्यांना वार्यावर सोडले, मात्र कार्यकर्त्यांनी प्रत्येकवेळी त्याग करून पक्षकार्यात वाहून घेतात, त्या कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन करून मोपा विमानतळ ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी अमरनाथ पणजीकर, डॅनियल डिसोझा, लक्ष्मीकांत गोवेकर आदीची भाषणे झाली.
दरम्यान, यावेळी चेल्लाकुमार यांना ‘पीपल फॉर मोपा’तर्फे निवेदन निमंत्रक देवेंद्र प्रभुदेसाई यांनी दिले. केंद्रात मोप विमानतळाचा विषय योग्यरित्या मांडावा अशी विनंती त्यांना करण्यात आली.