‘आदिपुरुष’ला विरोध कायम

0
2

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ प्रदर्शित झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला असून, त्यातील वादग्रस्त संवादांमुळे हा वाद आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर करणी सेनेने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. रामायणातील पात्रांच्या विचित्र वेशभूषा, वादग्रस्त संवाद आणि सीतामातेच्या जन्मस्थानाचा चुकीचा उल्लेख यामुळे हा चित्रपट आजच्या तरुणाईपासून वयोवृद्ध प्रेक्षकांच्या टीकेचा लक्ष्य बनला आहे. भारतात या चित्रपटाला विरोध होतच असून, नेपाळमध्ये तर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.

या चित्रपटातील संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी लिहिले असून, तेच वादाचे प्रमुख कारण बनले आहेत.
आदिपुरुष हा एक तथ्यहीन चित्रपट आहे. चित्रपटही नाही तर कार्टून फिल्म आहे. सरकारने अशा चित्रपटांवर तातडीने बंदी घालावी. कोणाच्याही श्रद्धेशी खेळणाऱ्या अशा चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी काल करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल अम्मू यांनी केली.

सेन्सॉर बोर्डामध्ये बसलेल्यांना जोडे मारायला हवेत, ज्यांनी हिंदूंच्या श्रद्धेशी खेळ केला आहे. सेन्सॉर बोर्डाचे कायदे बदलण्याची गरज आहे. तसेच करणी सेना चित्रपटगृहात गेली तर मनोज मुंतशीरची लंका जाळूनच बाहेर पडेल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या नियमांमध्ये बदल करण्याची विनंती देखील केली.