>> राहुल गांधींकडून ज्येष्ठ नेत्यांचा अपमान : आझाद
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला. गेल्या ५० वर्षांपासून कॉंग्रेससोबत असलेले नाते आपण तोडत आहोत, असे त्यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच राहुल गांधींचे पीए आणि त्यांचे सुरक्षा कर्मचारी हे आता पक्षासंबंधी निर्णय घेत आहेत. राहुल गांधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचा अपमान करत असल्याचा आरोप गुलाम नबी आझादांनी पत्रात केला आहे.
गुलाम नबी आझाद हे गेल्या बर्याच काळापासून पक्षावर नाराज असून, पक्षाविरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. काल अखेर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. जम्मू-काश्मीरमध्ये कॉंग्रेसने आझाद यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवावी, अशी सोनिया गांधी यांची इच्छा होती. त्यामुळेच त्यांना निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते; मात्र प्रकृतीचे कारण देत त्यांनी काही तासातच पदाचा राजीनामा दिला. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
आझाद यांनी सोनिया गांधींना सोपवलेल्या राजीनामा पत्रात राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. कॉंग्रेस पक्ष तुमच्या नेतृत्वात चांगले काम करत होता. मात्र, दुर्दैवाने जेव्हा पक्षात राहुल गांधी यांचा प्रवेश झाला आणि २०१३ मध्ये तुम्ही त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले तेव्हा पक्षातील संवादच संपला. कॉंग्रेसमधील चर्चेची प्रक्रिया आता बंद झाली असून कोणताही निर्णय राहुल गांधींच्या मर्जीतल्या आणि कोणताही अनुभव नसलेल्या नेत्यांकडून घेतले जातात. पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला सारले जात असून त्यांचा अपमान केला जात आहे, अशी खंत आझाद यांनी पत्रात व्यक्त केली आहे.
आधी कॉंग्रेस जोडो यात्रा काढा
अत्यंत खेदाने आणि अत्यंत भावूक अंत:करणाने मी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेससोबतचे माझे ५० वर्षांचे नाते तोडण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढण्यापूर्वी ‘कॉंग्रेस जोडो यात्रा’ काढावी, असा सल्लाही आझाद यांनी पत्रातून दिला आहे.