वर्ष २०१२-१३साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आज लोकसभेत मांडणार आहेत.
करदात्यांना उत्पन्न मर्यादा वाढविली जाण्याची शक्यता असून करयुक्त रकमेच्या मर्यादांमध्येही किंचित वाढ अपेक्षित आहे.
दरम्यान, थेट विदेशी गुंतवणूक व इतर आर्थिक सुधारांच्या बाबतीत मात्र धीमे पाऊल असण्याची शक्यता आहे. याशिवाय आगामी आर्थिक वर्षासाठी सुमारे ३० हजार कोटींचे निर्गुंतवणूकीचे लक्ष्य अर्थसंकल्पातून जाहीर होण्याची शक्यता आहे.
खालावत चाललेला विकासदर काबूत आणणे हे देखील मुखर्जी यांच्यासमोरचे आव्हान असेल.
बजेटनंतर रेल्वेमंत्र्यांची गच्छंती?
रेल्वे तिकीट दरवाढीवरून रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांच्यावर नाराज बनलेल्या तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्रिवेदींचे मंत्रिपद जाणे जवळपास अटळ आहे. त्यांना आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर काढले जाईल, असे संकेत मिळत आहेत. त्रिवेदी यांनी पक्षाध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्याकडे राजीनामा पाठवल्याचे वृत्त आहे. मात्र प्रधानमंत्र्यांनी कुठल्याच मंत्र्याने आपणास राजीनामा दिलेला नसल्याचे सांगितले. त्रिवेदींच्या जागी मुकूल रॉय यांना आणण्याबाबत श्रीमती बॅनर्जी ठाम आहेत.