Home Featured आग लावणाऱ्यांना ओेळखा

आग लावणाऱ्यांना ओेळखा

0

मुंबईमध्ये मीरा रोड भागात एका माथेफिरूने दोघा सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून भोसकले. काश्मीरमध्ये पहलगाममध्ये ज्या प्रकारे पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून आणि ‘कलमा’ पढायला लावून निर्दयपणे ठार मारण्यात आले, त्याच प्रकारे महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये असा प्रकार एखाद्याने करणे हे खरोखर धक्कादायक आहे. ह्या कृत्यामागचा नेमका उद्देश काय असावा हे कोडेच आहे. धर्माधर्मांमध्ये आगी लावण्यासाठी अलीकडे काही घटक सातत्याने प्रयत्न करीत आहेत. हा हल्लादेखील अशाच एखाद्या व्यापक षड्यंत्राचा भाग असू शकतो. हा माथेफिरू हल्लेखोर पूर्वी अमेरिकेत होता हेही येथे विशेष उल्लेखनीय आहे. समाजमाध्यमांवरून हल्ली धर्माधर्मांमध्ये विष कालवण्याचे प्रकार होतात. ह्यापैकी प्रक्षोभक मजकूर आणि व्हिडिओ पसरवणारी किती खाती खरी असतात आणि किती खोटी हे ओळखणेही कठीण बनले आहे. त्यामुळे भारताचा विकासरथ रोखण्यासाठी त्याचा कच्चा दुवा असलेली धार्मिक दरी अधिक रुंदावत नेण्यासाठी बाह्य घटकांकडून प्रयत्न होत नसतील कशावरून? आयसिसची विषवल्ली अजूनही जगातून नष्ट झालेली नाही. नुकतेच आफ्रिकेत मालीमध्ये आयसिसने डोके वर काढले. तेथे त्यांचा हैदोस सुरू आहे. शिवाय जगभरात ह्या विषारी विचारसरणीने प्रेरित होऊन अनेक माथेफिरू दहशतवादी कृत्यांत सामील होताना दिसतात. अनेकदा त्यांचा कर्ताकरविता कोणी दुसरा असतो किंवा ते स्वतःच अशा दुष्कृत्यास प्रेरित झालेले असतात. मुंबईतील प्रकरण हे ‘लोन वूल्फ’चे म्हणजे स्वयंप्रेरणेने केेलेल्या हल्ल्याचे असल्याचे तपास यंत्रणा सांगत आहेत, परंतु खरोखरच हा अशा प्रकारचा हल्ला आहे की त्यामागे काही त्याचे प्रेरणादाते आहेत ह्याचा तपास झाला पाहिजे. ह्या संदर्भात अत्यंत कसोशीने आणि दहशतवादाची कलमे लावूनच तपास झाला पाहिजे, कारण अशा प्रकारे स्वयंप्रेरणेने खुनी हल्ले व्हायला लागले तर त्यातून धार्मिक सौहार्दाला आणि सामाजिक शांततेला तडा जायला वेळ लागणार नाही. किंबहुना त्याच उद्देशाने कोणीतरी अशी विषवल्ली समाजात पद्धतशीरपणे पसरवत तर नाही ना, अशी शंका घ्यायला जागा आहे. अलीकडेच टीसीएस ह्या टाटा उद्योगसमूहाच्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ‘कॉर्पोरेट जिहाद’ चा प्रकार समोर आला. कोणी त्यावर कितीही पडदा ओढायचा प्रयत्न केला आणि वरिष्ठ व्यवस्थापनाने हात झटकले, तरी त्यातील सत्य आता उजेडात आले आहे, जे अत्यंत धक्कादायक आहे. ‘लव्ह जिहाद’ ची चर्चा गेली अनेक वर्षे चालली आहे. अलीकडेच अशी दोन प्रकरणे अमरावती आणि कोल्हापुरात उजेडात आली आहेत, जेेथे कित्येक हिंदू मुलींशी समाजमाध्यमांवरून मैत्री करून त्यांचा उपभोग घेतला गेला. हे लिंगपिसाट ‘लव्ह जिहाद’ने प्रेरित होते का ह्याचाही तपास झाला पाहिजे. अशा गुन्ह्यांना धार्मिक अंग असते तेव्हा ते सामाजिक एकजुटीला तडा देणारे दुष्कृत्य असते हे लक्षात घेतले गेले पाहिजे आणि त्यासंदर्भात कठोर कारवाई झाली पाहिजे.
गोवा हा इतर प्रदेशांच्या तुलनेत शांत गणला जातो, परंतु येथेही अलीकडेच सेंट फ्रान्सिस झेवियरबाबत अत्यंत असभ्य भाषेत टिप्पणी करून येथील शांततेला तडा देण्याचा विनाकारण प्रयत्न झाला. आता ‘हातकातरो’ खांबाचा विषय उकरून काढून त्यातूनही हिंदू व ख्रिस्तीधर्मीयांमधील फूट अधिक विस्तारण्याचा प्रयत्न काही घटकांकडून सातत्याने चालला आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रश्नांकडे कानाडोळा करण्यासाठी ही इतिहासातील भुते उपयोगी पडत असतात. राज्याच्या सध्याच्या प्रश्नांकडे डोळेझाक करून भलत्या गोष्टी उकरून काढून धर्माधर्मांमध्ये आगी लावण्याचा जो आटोकाट प्रयत्न सध्या चालला आहे, त्याबाबत मूक सहमती न दर्शवता सरकारने ह्यामागील सूत्रधारांचा शोध घेणे जरूरी आहे. निवडणुका जवळ येतात तेव्हा धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारे मते मिळवण्यासाठी अशी आगलावी कृत्ये सर्रास घडवली जातात. गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे प्रयत्न पद्धतशीरपणे चालले आहेत हे आपण जनतेने समजून घेणे जरूरी आहे. धार्मिक भावना भडकावून आणि इतर धर्मियांबद्दल विष कालवून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी येणाऱ्या काळात अनेक महाभाग पुढे येणार आहेत. त्यांच्या ह्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांबाबत सुजाण जनतेने सदैव सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. समाजविघातक गोष्टी, मग त्या कोणीही का करीत असेना, त्याचा कडाडून विरोध व्हावा. सलोखा, सौहार्द, शांतता ही आपल्या गोव्याची ओळख आहे. आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित अनेक प्रश्न आणि समस्या आहेत, त्यांना भिडण्याऐवजी अशा धार्मिक विद्वेषाच्या गुंगीत समाजाला ठेवून मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करविण्याचे तंत्र आता तरी आपण ओळखायला हवे.