आगामी दोन महिने रस्ते खोदण्यास मनाई

0
2

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन महिन्यांसाठी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा रस्ते, अंतर्गत आणि सर्व प्रकारचे रस्ते खोदण्यास बंदी घातली असून हा आदेश येत्या 1 जून 2023 पासून लागू होणार आहे.
सीआरपीसीच्या कलम 144 अन्वये जारी करण्यात आलेला आदेश येत्या 1 जूनपासून 60 दिवसांसाठी अमलात राहील. या कालावधीत रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच, खोदण्यात आलेला रस्ता 6 तासांच्या आत पुन्हा दुरुस्त करण्याची अट घालण्यात आली आहे. तथापि, सरकारी सार्वजनिक सेवा प्रदान करणाऱ्या वीज, सार्वजनिक बांधकाम खाते, बीएसएनएल या विभागांनी केलेल्या रस्ते खोदकामासाठी ही मनाई लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

विविध कामांना गती
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या सूचनेनंतर पणजीतील स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता बांधकाम, मलनिस्सारण वाहिनी, केबल्स आदी कामे करणाऱ्या कंत्राटदारांनी कामाला गती दिली आहे. येत्या 31 मेपर्यंत विविध कामे पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने कंत्राटदारांनी कामे बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तथापि, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांतईनेज परिसरातील केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. सदर कामे बंद ठेवल्यास स्थानिक नागरिकांना आणखीच त्रास सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने कंत्राटदारांना कामे पावसाळ्यात सुरू ठेवून पूर्ण करण्याची सूचना केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

स्मार्ट सिटीअंतर्गत कामे सुरूच राहणार ः मुख्यमंत्री
उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळ्याच्या दोन महिन्यांत रस्ते खोदकामावर बंदीचा आदेश दिलेला असला तरी, पणजी शहरातील स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली विकासकामे सुरूच राहणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकासकामे पावसाळ्यात सुरू राहतील, असे दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेले आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी यंत्रणेला रस्ता खोदण्यास मनाई केलेली नाही.