Home बातम्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने

आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने

0

– सुभाष साजू हळर्णकर,  अध्यक्ष, सहकार भारती, गोवा प्रदेश. 

संयुक्त राष्ट्रसंघाने २०१२ हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार जगातील सर्वच देशांमध्ये चालू वर्ष सहकार चळवळीला वाहिलेले आहे. त्या निमित्ताने जगभरात सहकार चळवळीचे विविधांगी कार्यक्रमही आयोजिण्यात येत आहेत. या वर्षाचे औचित्य साधून सहकार भारतीनेसुद्धा संयुक्त राष्ट्रसंघाच्या संमतीने आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. संपूर्ण जगभरातून अत्यंत उत्साहात या परिषदेला प्रतिसाद मिळत आहे. मध्य प्रदेश सरकार, सहकार भारती आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद ९ आणि १० फेब्रुवारी असे दोन दिवस भोपाळ येथे संपन्न होत आहे. सहकार चळवळ ही अत्यंत परिणामकारक आणि यशस्वीपणे राबवत असल्याचे अनेक देशांमधल्या सहकारी संस्थांच्या यशस्वी कार्यपद्धतीवरून दिसते.

हजारो वर्षांचा इतिहास असलेली सहकार चळवळ सर्वसामान्यांसाठी, त्याचे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. भारतातदेखील पूर्वीपासून सहकार पद्धतीनुसारच जीवनप्रणाली अस्तित्वात आहे. अठरापगड जातींपासून वस्तू विनिमय पध्दतीपर्यंत आणि आजच्या २१ व्या शतकात देखील सहकारी संस्थांचे पाठबळ सर्वसामान्यांना लाभत आहे. आज सर्वसामान्यांना भारतात सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ मिळत आहे. देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेत सहकारी पतसंस्थांच्या आकडेवारीचे प्रमाण कदाचित कमी असेलही, पण आज ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक सहकाराशी जोडलेले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतातील सहकार चळवळ ही जगातील सर्वांत मोठी लोकचळवळ मानली जाते. अर्थिक उन्नतीचा मार्ग म्हणून या चळवळीकडे पाहण्यात येते. त्यातील सामान्य माणसाचा सहभाग महत्त्वाचा आहे, आणि तो राहिलाही आहे. सहकार चळवळ ही समाजातील अप्रगत घटकांना एकत्र येऊन आत्मनिर्भर होण्याचा, प्रगती साधण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघानेही नमूद केले आहे.

सहकाराचा उदय पाश्‍चिमात्य देशांमध्ये झाला. सुमारे १०० वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी भारतात सहकाराचा पाया घातला, तरीही वैदिक काळापासूनच आपल्या देशात सहकाराची संकल्पना होती. आजच्या संदर्भात त्यांची पुनर्मांडणी करायला हवी म्हणून सहकाराला नवीन आयाम देणारा विषय जगासमोर मांडावा यासाठीच हे अधिवेशन भरविण्याचे प्रयोजन आहे. या परिषदेचे निमंत्रक माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे आहेत. उद्घाटक म्हणून केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान तसेच देशातील आणि जगातील जाणकारांची या परिषदेला उपस्थिती लाभणार असून त्यांचे मौलिक विचार ऐकण्याची संधीही मिळणार आहे.

सहकार क्षेत्रातील प्रशासक, कार्यकर्ते, संचालक तसेच ध्येयधोरणे ठरविणार्‍या सहकार क्षेत्रातील नामवंत, अनुभवी, संशोधक आणि कुशल वक्त्यांचे मार्गदर्शनही या परिषदेत लाभणार आहे. दोन दिवसांच्या प्रत्येक सत्रात देश-विदेशातील सहकार कार्यकर्त्यांचे अनुभव कथनही होणार आहे. जगातील चाळीस राष्ट्रे आणि भारतातील मिळून सातशे ते आठशे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थिती लावतील असा अंदाज आहे.

या परिषदेत प्रामुख्याने तीन मुद्दे असतील. पहिला म्हणजे, सहकारी कायदे वैश्‍विक तत्त्वावर आधारलेले आहेत. कारण आपल्याकडचे कायदे सहकाराच्या मार्गदर्शक तत्त्वांशी विसंगत असल्याचे आढळते.‘‘वैश्‍विक स्तरांवर लागू होणार्‍या मार्गदर्शक तत्वांवर आधारलेले सहकार विषयक कायदे’’ या विषयावर सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्री. लाहोटी यांचे व्याख्यान होईल.

सार्वजनिक-खासगी भागीदारीची अनेक उदाहरणे आहेत. पण सरकार आणि सहकार यांच्या भागीदारीतून अनेक मॉडेल्स उभी करता येतील. केंद्र सरकार, राज्य सरकार, याशिवाय पालिका देखिल अशा भागीदारीत प्रकल्प उभे करू शकते. हाच दुसरा विषय आहे. ‘‘ न्यू इनिशिएटिव्हज् टु प्रमोट पार्टनरशिप विथ को-ऑपरेटीव्हज्’’ या विषयावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे व्याख्यान होणार आहे.

या परिषदेतील सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे, बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेवर लोकांच्या सहभागातून, स्थानिक संसाधनांचा उपयोग करून किमान भांडवलाच्या मदतीने सहकार केंद्रित विकासाचे मॉडेल लोकांसमोर मांडले जाणार आहे. आणि त्या त्या देशात, त्या त्या परिस्थितीचा विचार करून हे मॉडेल विकसित करावे लागेल. त्याचे विस्तृत निकष शेवटच्या सत्रात अर्थतज्ज्ञ श्री. बजरंगलाल गुप्ता हे मांडणार आहेत.

चार वर्षांपूर्वी जगभर आर्थिक मंदीची मोठी लाट उसळली. त्याचे परिणाम अजूनही आपण भोगत आहोत. मात्र त्या लाटेत कुठेही सहकार क्षेत्राला अजिबात धक्का बसला नाही. मग ते अमेरिकेतील असेल, युरोपमधील असेल किंवा जपानमधील असेल. या काळात युरोप-अमेरिकेतील सहकारी बँकांच्या वृद्धींचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले. मार्केटिंग, कृषी उत्पादन प्रक्रिया म्हणजे ऍग्रो प्रोसेसिंग इत्यादी क्षेत्रातील ज्या सहकारी संस्था आहेत, त्या सर्वांचीच कामगिरी चांगली आहे. या सर्व बाबींबाबत सहकार हा सर्वात उत्तम प्रकार आहे, म्हणून देशाची व जगाची प्रगती ही सहकार समृद्धीतूनच होणार आहे, ही सहकार भारतीची ठाम आणि आग्रही भूमिका आहे. सहकार वृद्धींगत झाला तरच देश समृद्ध आणि बलशाली होणार हे निश्‍चित…!