सासवड येथे होणार्या ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांची काल निवड झाली. शिंदे यांना ४६२ मते मिळाली, तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी ज्येष्ठ समीक्षक प्रभा गणोरकर यांना ३२५ मते मिळाली. श्री. शिंदे, गणोरकर यांच्यासह साहित्यिक संजय सोनवणी व अरूण गोडबोले हेही अध्यक्षपदाच्या रिंगणात उतरले होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे पोहोचलेल्या ९१० मतपत्रिकांची मोजणी काल सकाळी सुरू झाली. दुपारी शिंदे यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. श्री. शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. संमेलनाध्यक्षपदाचा सन्मान आपण आपल्या आईला अर्पण करीत असल्याची प्रतिक्रिया श्री. शिंदे यांनी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आपण लेकरू आहोत, त्यामुळे त्यांनाही हा सन्मान अर्पण करतो असेही ते उद्गारले.