अहेर

0
195
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

लग्न करणार्‍या व्यक्तींचा आपल्याशी असलेला नातेसंबंध, ऋणानुबंध किंवा मैत्रीसंबंध म्हणा त्याची पैशात किंवा दागिन्यांत मोजदाद करता येते का, हाच मूलभूत प्रश्‍न आहे. जर येत असेल तर असला अहेर हा आपल्या संबंधांची लांबी-रुंदी-उंची मोजणारं गणितशास्त्रातलं उपकरणच असतं.

 

‘अहेर’ हा शब्द कानी पडला की आपल्यासमोर कोणाचं तरी लग्न, मुंज, घरप्रवेश असे प्रसंग उभे राहतात. खरं म्हणजे अहेर हे एकप्रकारचं खुशीनं दिलेलं बक्षीस किंवा उपकाराची परतफेड असावी. हा पूर्वीपासून चालत आलेला रीतीरिवाज असावा. तो कोणी व कशासाठी सुरू केला हा संशोधनाचा विषय! मुलगा-मुलगी लग्न करतात ते गृहस्थाश्रमात प्रवेश करण्यासाठी. त्याला वैयक्तिक इच्छा हेच कारण. अशा प्रसंगी अहेर कशाला? शुभेच्छाच महत्त्वाच्या! उपस्थित राहणारे एक प्रकारच्या आपुलकीनं, बंधुभावानं, मैत्रीच्या नात्यानं किंवा एक प्रकारच्या जवळिकीच्या नात्यानं येतात, समारंभात भाग घेतात, समारंभाला शोभा आणतात, समारंभाचा आनंद लुटतात, एवढंच! त्यासाठी अहेर देण्याचा किंवा घेण्याचा संबंध तो काय? भाग घेतला, आनंद लुटला म्हणून?

बघितलं तर अहेर तरी कसले-कसले असतात? कपडे, घरात वापरण्याच्या वस्तू, संसारोपयोगी वस्तू, प्रासंगिक किंवा विशेष प्रसंगी उपयोगी पडणार्‍या वस्तू; एवढ्यापर्यंत योग्य नसलं तरी एकवेळ ठीक. पण दागिने, रोख पैशांची पाकिटं असला अहेर मात्र विलक्षण व निव्वळ अनाठायीच! लग्न करणार्‍या व्यक्तींचा आपल्याशी असलेला नातेसंबंध, ऋणानुबंध किंवा मैत्रीसंबंध म्हणा त्याची पैशात किंवा दागिन्यांत मोजदाद करता येते का, हाच मूलभूत प्रश्‍न आहे. जर येत असेल तर असला अहेर हा आपल्या संबंधांची लांबी-रुंदी-उंची मोजणारं गणितशास्त्रातलं उपकरणच असतं. असला अहेर करण्यासाठी कोण जवळचा, कोण दूरचा, किती दूरचा असलं परिमाण बाळगावं लागतं; एक प्रकारचं नफा-तोटा कोष्टक किंवा ऍसेट-लायाबिलिटीचा ताळेबंद ठेवावा लागतो!

अलीकडच्या काळात मात्र पत्रिकेवर ‘कृपया अहेर आणू नये’ असे छापलेले आपल्या नजरेस पडते. असे छापण्याची पद्धत किंवा प्रथा मला आठवते त्याप्रमाणे जवळजवळ पन्नास वर्षांपासून म्हणजे आमच्या बालपणाच्या वेळेपासून कधीतरी सुरू झाली. अशा प्रथेची कोणीतरी श्रीगणेशा केली व अन्य लोकांनी ती गिरवायला प्रारंभ केला. आम्ही त्यावेळी विनोदानं म्हणत असू की, पत्रिकेवरची ही खास विनंती नसून अहेराची आठवण करून देणारी सूचनाच आहे. ज्या कोणाला अहेर घ्यायचाच नाही त्यांनी तो घेऊच नयेत, चक्क नाकारावा. पैशांचं पाकीट असेल तर ते ज्या खिशातून बाहेर काढलं असेल त्या खिशात त्याची रवानगी करतील. हाच तर अहेर न घेण्याचा मोठेपणा! त्यासाठी ‘कृपया अहेर आणू नये’ असल्या विनंत्या कशाला? अशाप्रकारे अहेर घेण्याचं बंद केलं असतं तर व पाळलं असतं तर अहेराची प्रथा मागच्या पन्नास वर्षांत पूर्णपणे बंद झाली असती! पुष्कळशा लोकांची अहेराच्या फासातून किंवा पाशातून मुक्ती झाली असती!

अहेराचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे ते एकप्रकारचं उसनं वाणं असतं, कर्जच असतं! आपण अहेर म्हणून जे स्वीकारतो त्याचा हिशेब ठेवावा लागतो; देणार्‍याचं नाव, दिलेली वस्तू व तिची किंमत, पैसे असतील तर ती रक्कम वगैरे वगैरे. हे कर्ज आपल्याला कधीतरी फेडायचं असतं. आपल्या घरची कार्ये कमी असतील व आपल्याला अहेर केलेल्यांच्या घरची कार्ये जास्त असतील तर परतफेडीचा हिशेब मात्र चुकतो. आयपेक्षा व्यय अधिक होतो. त्यामुळे अशा बाबतीत अहेर फेडण्याच्या समाधानापेक्षा आपल्या खिशाला बसलेली ‘खोट’ नको तो अहेर म्हणण्याची पाळी आणतो!

दुसरं असं की आपल्याला मिळालेल्या अहेराची त्यावेळची किंमत व आता परतफेड करताना मोजावयाची किंमत तरी कुठे सारखी असते? वस्तूंचे, दागिन्यांचे भाव सदैव चढेच असतात, ते आणखी नुकसानकारक! रोख स्वरूपात मिळालेल्या अहेराची त्यावेळची किंमत व त्या रकमेची आजची किंमत म्हणजे क्रयशक्ती तरी कुठे सारखी असते? म्हणून होतं काय तर आपल्याला अहेराची परतफेड चक्रवाढव्याजासह करावी लागते हे निश्‍चित!

वस्तूंच्या स्वरूपात मिळणारा अहेर पण फायद्याचा असतोच असं नाही. एकाचसारख्या चार-चार वस्तू येतात; कुकर, मिक्सर, ज्यूसर, घड्याळं अशा. अशा वस्तूंचा दैनंदिन कामात उपयोग किती व कसा करायचा? शिवाय आज असल्या सगळ्या वस्तू आपल्याकडे असतातच. त्यामुळे जादा झालेल्या वस्तूंची रवानगी माळ्यावर होते, नाहीतर ‘फुक्याफुकी’ कोणाला तरी दान कराव्या लागतात. कुठलाही दुकानदार असल्या वस्तू घेऊन त्यांच्या बदल्यात आपल्याकडच्या नवीन वस्तू देण्याचा व्यवहार करत नाही. आपणही त्या कोणाला पैशांच्या बदल्यात विकू शकत नाही. एकंदरीत ‘अव्यवहारेषुव्यवहार’ आपल्या नशिबी येतो. यावर एक नामी उपाय मात्र आहे, तो म्हणजे, ज्यांच्याकडून असल्या वस्तू अहेर म्हणून आल्या असतील त्यांच्याच ‘गळ्यात’ त्या बांधायच्या. पण त्यासाठी त्यांच्या घरी होणार्‍या कार्याची वाट पाहावी लागेल!

नवीन प्रथेप्रमाणे ‘अहेर आणू नये’ऐवजी ‘आपला बहुमूल्य आशीर्वाद हाच अहेर’ असं छापलं जातं. ‘आपली उपस्थिती हाच अहेर’ असंही एक पाऊल पुढे जाऊन छापलं जाऊ शकतं. यापेक्षा ड्रग्जपासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ‘से नो टू ड्रग्ज’ अशी जी मोहीम राबवली जाते तशी ‘से नो टू अहेर’ अशी पण राबवली तर परिणामकारक होईल. ‘हुंडा’ हा बंदी असलेला प्रकार आहे. अर्थात बंदी असलेले प्रकार चोरट्या मार्गाने चालतातच. अहेराला बंदी घालण्याची मागणी अजूनतरी कोणी केलेली नाही व तसं करण्याचा ‘प्रकाश’ कोणाच्या डोक्यात पडलेला नाही. कर्ज जसं बुडवतात तसा अहेरपण आपण बुडवू शकतो, परतफेडीचं बंधन झुगारू शकतो. पण ज्यांच्या हे स्वभावात नाही त्यांच्या बाबतीत अहेर हा जरी रोग कसा नसला तरी एक प्रकारचं ‘दुखणं’ मात्र असतं. म्हणूनच अहेर न देणं व न घेणं हाच जालीम उपाय ठरू शकतो म्हणजे खरी मुक्ती! कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीसारखी!

पण लक्षात कोण घेणार?