अष्टमी फेरीच्या अर्जांसाठी झुंबड; व्यापार्‍यांवर पोलिसांचा लाठीमार

0
24

>> अर्ज न मिळाल्याने पणजी मनपासमोर व्यापार्‍यांचा गोंधळ; एकजण ताब्यात

राजधानी पणजीतील मांडवी तीरावरील पदपथावर भरणार्‍या वार्षिक अष्टमीच्या फेरीत स्टॉल्स थाटण्यासाठी पणजी महापालिकेत काल अर्जांचे वितरण करण्यात आले. यावेळी अर्जांसाठी मोठ्या संख्येने व्यापारी जमले होते; मात्र अनेक व्यापार्‍यांना अर्जच न मिळाल्याने त्यांनी गोंधळ घातला. परिणामी पोलिसांना हस्तक्षेप करीत जमावावर लाठीमार करावा लागला. यावेळी पोलिसांनी अर्ज नेण्यासाठी आलेल्या एका व्यापार्‍याला ताब्यात घेतले.

१७ ऑगस्टपासून मांडवी तीरावर अष्टमीची फेरी भरणार असून, या फेरीत २५० हून अधिक स्टॉल्स उभारले जाणार आहेत. काल मंगळवारी या स्टॉल्ससाठीच्या अर्जांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे स्टॉल्स उभारण्यास इच्छुक असणार्‍या व्यापार्‍यांनी काल सकाळी ६ वाजल्यापासूनच पणजी मनपाबाहेर गर्दी केली होती; मात्र प्रत्यक्षात अर्ज वितरित करण्याचे काम हे ९.३० वाजता सुरू झाले.

यावेळी रांगेत उभे असलेल्या लोकांना एक-एक करून अर्ज घेण्यासाठी आत सोडले जात होते. मनपाच्या दोन्ही बाजूंनी अर्ज नेण्यासाठी व्यापार्‍यांची लांबलचक रांग लागली होती. २०० रुपये घेऊन प्रत्येक व्यक्तीला एका स्टॉलसाठीचा अर्ज देण्यात येत होता. यावेळी रांगेतील एका व्यक्तीला त्याच्याकडून २०० रुपये एवढे शुल्क घेऊनही अर्ज न देता ते संपले असल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्याने हे अर्ज काळ्या बाजारात विकण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर अर्ज न मिळालेल्या सर्वांनी एकच गर्दी करून गोंधळ घातला. यावेळी या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. तसेच पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले.

दरम्यान, अष्टमीची फेरी १७ ते ३० ऑगस्टपर्यंत मांडवी तीरावर भरणार आहे. बुधवारपासून स्टॉल्स उभारले जातील, तर गुरुवारपासून फेरीत विविध प्रकारच्या साहित्याची विक्रीला सुरुवात होईल. या फेरीत कपडे, फर्निचर, गृहसजावटीचे साहित्य, खेळणी अशा प्रकारचे स्टॉल्स असतील. गणेशचतुर्थीपूर्वी ही फेरी होत असल्याने ग्राहक मोठ्या संख्येने वस्तूंची खरेदी करत असतात. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यासाठीच या फेरीत स्टॉल्स थाटण्यासाठी व्यापार्‍यांची धडपड सुरू असते.