Home Featured अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

0

फोंडा विधानसभा मतदारसंघ पोटनिडणूक; काँग्रेस, भाजप आणि आपचे उमेदवार रिंगणात

फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजपचे उमेदवार रितेश नाईक, काँग्रेसचे उमेदवार केतन भाटीकर व आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक हे तिघेही सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर विश्वनाथ दळवींनी माघार घेतल्याने फोंड्यात आता तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

फोंडा मतदारसंघात दि. 9 रोजी पोटनिवडणूक होणार आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्व उमेदवार शेवटच्या दिवशी अर्ज सादर करणार आहेत. भाजपचे उमेदवार रितेश नाईक अर्ज सादर करताना भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
काँग्रेस उमेदवार केतन भाटीकर यांच्या उमेदवारी अर्ज सादर करताना राज्यातील काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार गीतेश नाईक उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचे आमदारही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

रितेश नाईकांचा प्रचार सुरू

भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी विविध भागांना भेटी देत स्थानिक नागरिक, समाजप्रमुख आणि विविध घटकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
या भेटीत त्यांनी पायाभूत सुविधांची कमतरता, रोजगाराच्या संधी, युवकांचे प्रश्न आणि शासकीय योजनांचा लाभ या मुद्द्यांवर त्यांनी विशेष भर दिला. लोकाभिमुख आणि व्यवहार्य प्रशासनाची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी बोलताना रितेश नाईक म्हणाले, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्यासोबत काम करताना मला शासनकारभार आणि तळागाळातील जनसेवेचा मौल्यवान अनुभव मिळाला आहे. हा अनुभवच काम करताना मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी;
विश्वनाथ दळवींची माघार

भाजपचे फोंडा मतदारसंघातील एक वजनदार नेते व फोंडा मतदारसंघात होऊ घातलेल्या गोवा विधानसभा पोटनिवडणुकीतील पक्षाचे उमेदवारीसाठीचे एक दावेदार विश्वनाथ दळवी यांनी काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेत असून भाजपचे उमेदवार रितेश नाईक यांना पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

आपण पक्षाशी एकनिष्ठ असूनही पक्षाने आपणाला उमेदवारी न दिल्याबद्दल विश्वनाथ दळवी यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच आपली भूमिका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट करणार असल्याचे सांगितले होते.

काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर पथ प्रथम म्हणत त्यांनी उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेत उमेदवार रितेश नाईक यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच या निवडणुकीत भाजपचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विश्वनाथ दळवी हे या निवडणुकीत पक्षाशी बंडखोरी करण्याच्या भीतीने भाजपमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.