कुख्यात खलिस्तानवादी अमृतपालसिंग आणि त्याच्या पाठीराख्यांविरुद्ध पंजाब पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्वतः जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा नवा अवतार असल्याच्या थाटात वावरणाऱ्या या अमृतपालच्या नांग्या वेळीच ठेचल्या गेल्या नाहीत, तर पंजाबमध्ये पुन्हा एकवार खलिस्तानवाद धगधगू लागेल हे निश्चित. एकेकाळी दुबईत नातेवाईकाच्या ट्रक व्यवसायात असलेला हा तरूण आता शिखांचा कैवारी बनून पंजाबात हैदोस घालतो आहे. काही दिवसांपूर्वी अजनाला पोलीस स्थानकात त्याने आणि त्याच्या सशस्त्र समर्थकांनी जो हैदोस घातला होता ती पंजाबमधील भावी अराजकाची नांदी ठरावी. पंजाबात पोलीस स्थानकांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यापर्यंत खलिस्तानवाद्यांची अलीकडे मजल गेली आहे. शिखांवरील कथित अत्याचारांचे पाठ पढवून कोवळ्या शीख तरुणांची माथी भडकावून त्यांना आपल्या चळवळीत सामील करून घेणारा हा अमृतपालसिंग पाकिस्तानच्या आयएसआयचा हस्तक आहे हे आता गुपीत राहिलेले नाही. आयएसआयच्या हस्तकांशी दुबईत त्याचे कसे संधान होते आणि त्यांच्या सांगण्यावरूनच तो पंजाबात कसा परतला आणि शेतकरी आंदोलनानंतर दीप सिधूने स्थापन केलेल्या वारीस पंजाब दी या संघटनेचा ताबा घेऊन तिच्या माध्यमातून तो खलिस्तानवादी विचार कसा फैलावतो आहे हे सगळे पाहिले, तर या काट्याचा नायटा होण्याआधीच तो काढला जाण्याची गरज भासते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना इंदिरा गांधींच्या वाटेने नेण्याची भाषा बोलण्यापर्यंत या अमृतपालची मजल गेली आहे. इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली होती, त्याची आठवण करून देत अमृतपाल या देशाच्या गृहमंत्र्यांना धमकावतो ही दुर्लक्षिण्याजोगी बाब नव्हे. खुद्द पंजाबच्या सुरक्षा यंत्रणा त्याच्या समर्थकांपुढे हतबल दिसत आहेत. अजनाला पोलीस स्थानकात जेव्हा त्यांनी हैदोस घातला तेव्हा पोलिसांनी त्याच्या समर्थकाला सोडून तर दिलेच, परंतु एवढा हिंसाचार करूनही अमृतपालला अटक करण्याची हिंमतही त्यांना दाखवता आली नाही. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान नुकतेच केंद्रीय गृहमंत्र्यांना जाऊन भेटले तेव्हा त्यांनी आपली हीच हतलबता व्यक्त केली असावी. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने आपले संपूर्ण पाठबळ अमृतपालला वठणीवर आणण्यासाठी देऊ केले आहे. त्याच्या कित्येक समर्थकांच्या गेल्या दोन दिवसांत मुसक्या आवळण्यात आल्या. खुद्द अमृतपालसिंगचा पाठलाग चालला होता व तासाभराच्या पाठलागानंतर त्याला अटक झाल्याचेही जाहीर झाले होते, परंतु त्याचे सहकारी पकडले गेले पण तो निसटला असे नंतर स्पष्ट झाले. पोलिसांनी घेरलेला अमृतपालसिंग पुन्हा पुन्हा कसा निसटू शकतो हे मोठे कोडे आहे आणि त्याला असलेली स्थानिक सहानुभूतीच त्याचे कारण असू शकते. पंजाब पोलीस त्याच्या वाढत्या प्रभावाला आटोक्यात आणू शकत नसेल, तर एनआयएने या विषयात लक्ष घालावे लागेल आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करून या खलिस्तानवाद्यांच्या मुसक्या आवळाव्या लागतील.
खलिस्तानची चळवळ पुन्हा उभारण्यासाठी व्यापक आंतरराष्ट्रीय प्रयत्न चाललेले गेली काही वर्षे दिसते आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या आजच्या तरुणाईच्या नित्य वापरातल्या समाजमाध्यमांवर मुख्यतः 18 ते 25 वयोगटातील शीख मुलांना शिखांवरील कथित अत्याचारांच्या कहाण्या पोहोचवून त्यांची माथी भडकावण्यासाठी अल्गोरिदमचा वापर केला जात असल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी विदेशांतून पुरवला जातो आहे. शिख समुदाय मोठ्या प्रमाणावर असलेल्या कॅनडा, ब्रिटन, जर्मनी आदी देशांतून खलिस्तानवादाला खतपाणी घातले जाते आहे आणि खुद्द पंजाबमधून मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुण त्यात सामील व्हावेत यासाठी पैशाचा पूर ओतला जाऊ लागला आहे. खलिस्तानवाद्यांकडून हत्या झालेले पंजाबचे माजी मुख्यमंत्री बियांतसिंग यांचे नातू रवनीतसिंग बिट्टूसारखे काही धाडसी लोकप्रतिनिधी सोडले तर कोणी या खलिस्तानवाद्यांच्या विरोधात बोलायलाही तयार दिसत नाहीत, उलट त्यांचे प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष समर्थनच होताना दिसते आहे. अमृतपालसिंग हा कसा हिंसाचारात गुंतलेला नाही त्यावर प्रवचने झोडायला पंजाबच्या काही लोकप्रतिनिधींनीही कमी केलेले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अमृतपालसिंगच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. तो स्वतः जणू भिंद्रनवालेच असल्यासारखा वागतो आहे. त्यांच्यासारखाच पेहराव, त्यांच्यासारखेच अंगरक्षकांचे संरक्षक कवच, त्यांच्यासारखेच वागणे बोलणे यातून शिखांचा नवा स्वयंघोषित कैवारी बनलेल्या या देशद्रोह्याला त्याची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. अन्यथ अमृत नाव असलेली खलिस्तानवादाची ही विषवल्ली फोफावत जाईल.