सत्तेत आल्यास बेरोजगारांना दरमहा 3000 रुपये भत्ता

0
4

कर्नाटकच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मोठ्या आशा असून त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. कर्नाटकात जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला, तर बेरोजगारांना दोन वर्षे दरमहा 3000 रुपये भत्ता देणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल केली. बेळगावमध्ये झालेल्या सभेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. बेरोजगारी कमी करण्यासाठी केंद्र सरकार काहीही करत नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष बेरोजगार पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना दोन वर्षांसाठी 1,500 रुपये प्रति महिना देणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच कर्नाटकात 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणाही त्यांनी केली. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास दहा लाख तरुणांना रोजगार दिला जाईल आणि अडीच लाख सरकारी पदेही भरली जातील, अशी मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली. महिलांना दरमहा दोन हजार रुपये आणि गरीब कुटुंबांना दहा किलो तांदूळ देणार असल्याचेही ते म्हणाले.