अफगाणिस्तानचा आयर्लंडवर २२ धावांनी विजय

0
18

>> पाहुण्या संघाचे जलदगती गोलंदाज प्रभावी

>> फलंदाजीत गुरबाज, नजिबुल्ला झादरानची चमक

आघाडी फळीच्या आक्रमक फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या प्रभावी मार्‍याच्या बळावर अफगाणिस्तानने तिसर्‍या टी-ट्वेंटी सामन्यात आयर्लंडचा २२ धावांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी पाच सामन्यांच्या मालिकेतील पिछाडी १-२ अशी कमी केली. मालिकेतील आव्हान राखण्यासाठी पाहुण्या अफगाण संघाला काल विजयाशिवाय पर्याय नव्हता. प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८९ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारल्यानंतर अफगाण संघाने आयर्लंडचा डाव ९ बाद १६७ असा रोखला.

आयर्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हझरतुल्ला झाझाय व रहमनुल्ला गुरबाज यांनी कालच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या डावाची सुरुवात केली. या द्वयीने पहिल्या गड्यासाठी ९० धावा जोडल्या. गुरबाजने धोका पत्करला तर झाझायने सावध खेळ केला. २० वर्षीय गुरबाज याने टी-ट्वेंटीमधील आपले चौथे व आयर्लंडविरुद्धचे पहिलेच अर्धशतक लगावले. त्याने ३५ चेंडूंचा सामना करताना ८ चौकार व १ षटकारासह ५३ धावा कुटल्या. सलामीवीरांच्या पतनानंतरस इब्राहिम व नजिबुल्ला झादरान यांनी संघाची धावगती मंदावणार नाही याची दक्षता घेतली. त्यांनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. नजिबुल्लाने अवघ्या १८ चेंडूंत ५ षटकारांसह ४२ धावांची बरसात करत संघाला दोनशेच्या आसपास पोहोचवले. आयर्लंडकडून जोशुआ टट्ल वगळता एकाही गोलंदाजाला धावगतीला लगाम घालणे शक्य झाले नाही.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडला चांगल्या सलामीची अपेक्षा होती. परंतु, पॉल स्टर्लिंग डावातील पहिल्याच षटकात माघारी परतला. कर्णधार बालबर्नी यानेदेखील त्याचा कित्ता गिरवला. यानंतर आयर्लंडच्या फलंदाजांमध्ये तंबूत परण्याची जणू स्पर्धांच लागली. त्यामुळे त्यांची तेराव्या षटकात ७ बाद ८५ अशी घसरगुंडी उडाली. अष्टपैलू जॉर्ज डॉकरेल याने ३७ चेंडूंचा सामना करत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आपल्या गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्‍या डॉकरेल याने १०३व्या टी-ट्वेंटी सामन्यातील हे पहिलेच अर्धशतक. पदार्पणवीर फिओना हँड याने १८ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ३६ धावा झोडपल्या. या द्वयीने आठव्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी रचली. परंतु, आघाडी फळीच्या सपशेल अपयशामुळे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मालिकेतील चौथा सामना सोमवार १५ ऑगस्ट रोजी खेळविला जाणार आहे.

धावफलक
अफगाणिस्तान ः हझरतुल्ला झाझाय झे. स्टर्लिंग गो. हँड ३९, रहमनुल्ला गुरबाज झे. अडेर गो. लिट्ल ५३, इब्राहिम झादरान झे. टकर गो. लिट्ल ३६, नजिबुल्ला झादरान झे. हँड गो. अडेर ४२, मोहम्मद नबी धावबाद ६, राशिद खान नाबाद ०, अवांतर १३,
एकूण २० षटकांत ५ बाद १८९
गोलंदाजी ः मार्क अडेर ४-०-४२-१, जोश लिट्ल ४-०-२९-२, ग्रॅहम ह्युम ४-०-४१-०, गॅरेथ डेलानी ४-०-३३-०, फिओन हँड ३-०-२९-१, कर्टीस कॅम्फर १-०-१४-०
आयर्लंड ः पॉल स्टर्लिंग झे. गनी गो. फारुकी ०, अँडी बालबर्नी झे. राशिद गो. फारुकी १, लोरकान टकर झे. नवीन गो. मुजीब ३१, हॅरी टेक्टर झे. गुरबाज गो. नवीन ८, गॅरेथ डेलानी झे. नजिबुल्ला गो. नबी १६, जॉर्ज डॉकरेल नाबाद ५८, मार्क अडेर झे. रशीद गो. मुजीब ६, फिओन हँड झे. हझरतुल्ला गो. नवीन ३६, ग्रॅहम ह्युम धावबाद १, जोश लिट्ल नाबाद ०, अवांतर ७, एकूण

२० षटकांत ९ बाद १६७
गोलंदाजी ः फझलकह फारुकी २-०-११-२, अझमतुल्ला ओमरझाय २-०-१३-०, नवीन उल हक ४-०-३८-३, राशीद खान ४-०-३८-०, मोहम्मद नबी ४-०-३८-१, मुजीब उर रेहमान ४-०-२८-०