30 C
Panjim
Tuesday, June 22, 2021

अपरिपक्वतेचे दर्शन

पश्‍चिम बंगालचे वादग्रस्त निवृत्त मुख्य सचिव व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे विद्यमान मुख्य सल्लागार अलपन बंदोपाध्याय यांच्यावर केंद्र सरकारने उगारलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे देशात पुन्हा एकवार केंद्र – राज्य संबंधांचा व्यापक मुद्दा चर्चेला आला आहे. यास चक्रीवादळाच्या निमित्ताने त्या राज्याच्या दौर्‍यावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत आयोजित आढावा बैठकीला वेळेवर उपस्थित न राहणे आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत पुढील बैठकीसाठी काही मिनिटांतच निघून जाणे हा जो काही प्रकार घडला तो अवमान सहजासहजी विसरण्याच्या मनःस्थितीत मोदी सरकारही दिसत नाही. दुसरीकडे, ममता बॅनर्जीही आपल्या हट्टी स्वभावामुळे अडून बसल्या आहेत आणि बंदोपाध्याय यांना आपले सल्लागार नेमून केंद्रालाच त्यांनी ललकारले आहे.
बंदोपाध्याय यांच्यासंदर्भातील हा सगळाच प्रकार अत्यंत अशोभनीय आणि अपरिपक्वतेचे आणि राजकीय सूडनाट्याचेही हिडीस दर्शन घडवणारा आहे. पंतप्रधान जेव्हा एखाद्या राज्याचा दौरा करतात तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्याने आपल्या सरकारी अधिकार्‍यांसह तेथे आधी उपस्थित राहणे आणि राज्याच्या मदतीसाठी पंतप्रधानांकडे साकडे घालणे हा सामान्य शिष्टाचार आहे. परंतु ममता बॅनर्जी एक तर तेथे उशिरा पोहोचल्या आणि लगोलग मुख्य सचिवांसह पुढच्या बैठकीसाठी म्हणून निघूनही गेल्या. आपले हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालत राहिले, आपण जाण्यापूर्वी पंतप्रधानांची परवानगी घेतली होती, आपल्याला पुढील बैठकीला जायचे होते वगैरे युक्तिवाद भले त्यांनी केलेले असले तरी त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी सुवेंदु अधिकारी हे विरोधी पक्षनेते ह्या नात्याने पंतप्रधानांसमवेतच्या त्या बैठकीला हजर होते हेच त्यांनी ऐनवेळी बैठकीस हजर राहण्याचा आपला निर्णय बदलण्यामागचे कारण होते हे उघड आहे आणि ते बालीशपणाचे आहे. येथे प्रश्न कोण्या नरेंद्र मोदी नामक व्यक्तीच्या अवमानाचा नाही. देशाच्या पंतप्रधानांचा हा अवमान ठरतो आणि तो मुख्यमंत्रीपद भूषविणार्‍या एका जबाबदार व्यक्तीने करणे हे मुळीच शोभादायक नाही. ममतांची भूमिका त्यांच्या एकूण हटवादी वृत्तीला साजेशी आहे व तिला पश्‍चिम बंगालची नुकतीच पार पडलेली अटीतटीची विधानसभा निवडणूक, त्यानिमित्ताने पंतप्रधानांशी आणि त्यांच्या राजकीय पक्षाशी झडलेला तीव्र संघर्ष ही सगळी पार्श्वभूमी आहे हे जरी खरे असले तरी किमान चक्रीवादळासंदर्भातील बैठकीसाठी सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी ह्या बैठकीत सहभागी होणे गरजेचे होते. राज्याचे मुख्य सचिव बंदोपाध्याय मोदी – ममता वादात बळीचा बकरा ठरले असे म्हणावे, तर त्यांची कृतीही आक्षेपार्ह ठरते. राज्याचा मुख्य सचिव या नात्याने, दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधानांपुढे सादरीकरण करणे, राज्य प्रशासनातील अन्य अधिकार्‍यांसमवेत त्यांना स्थितीची माहिती देणे त्यांच्याकडून राज्याचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी ह्या नात्याने अपेक्षित होते. त्यांच्यासारख्या सनदी अधिकार्‍याने राजकीय विवादाचा भाग बनण्याचे काही कारण नव्हते.
केंद्र सरकारशी संघर्ष झडताच त्यांनी मुख्य सचिवपदासाठी नुकतीच मिळालेली मुदतवाढ नाकारली आणि दिल्लीला आलेले बोलावणेही धुडकावले. ममतांनी त्याची बक्षिसी म्हणून त्यांना आपले सल्लागारपद दिले. केंद्र सरकारनेही आता हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविलेला दिसतो. काल बंदोपाध्याय यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याखाली कर्तव्यात कसूर केल्याची नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यामुळे तो फौजदारी गुन्हा ठरतो व दंडाबरोबरच कारावासाच्या शिक्षेसही पात्र ठरतो. वास्तविक, आयएएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या वा बदल्यांसंदर्भात आखून दिलेले नियम आहेत आणि राज्य सरकारच्या पूर्वसंमतीविना परस्पर निर्णय घेतले जात नाहीत. परंतु येथे केंद्र सरकारही सूडाने पेटलेले दिसते. बंदोपाध्याय यांना धडा शिकवून एकप्रकारे ममता बॅनर्जींना जागा दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्यात राजकीय पक्ष, वैचारिक विचारधारा आदींसंदर्भात कितीही भेद असले तरी अशा प्रकारे दोहोंमधील संबंध एवढे पराकोटीच्या स्थितीत ताणले जाणे योग्य तर नाहीच व भारतीय लोकशाहीला शोभादायकही नाही. मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा केंद्र राज्य संबंधांचा नवा आदर्श निर्माण करण्याचे अभिवचन दिले गेले होते. दुर्दैवाने घडीघडीस ह्या संबंधांच्या चिंधड्या उडताना दिसत आहेत. आपला देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवामध्ये पदार्पण करण्याच्या उंबरठ्यावर असताना अशा प्रकारच्या राजकीय सूडनाट्याचे घडणारे हिडीस दर्शन भारतीय लोकशाहीच्या परिपक्वतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारेच ठरते.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

उत्तम आरोग्यासाठी योगासने

डॉ. मनाली म. पवार ‘पादांगुष्ठासन’ हे पोटाची जादा चरबी कमी करण्यासाठी, मान दुखत असल्यास त्याचा त्रास कमी करण्यासाठी,...

व्हिटिलिगो किंवा कोड

डॉ. अनुपमा कुडचडकरपणजी कोडामुळे व्यक्तीच्या शरीराच्या आतील भागात काही उपद्रव होत नसून फक्त बाह्य सौंदर्यात विद्रुपता येते ज्यामुळे...

इफ्‌स अँड बट्‌स! बायोस्कोप

प्रा. रमेश सप्रे ‘इफ्‌स अँड बट्‌स’नी आपलं दैनंदिन जीवन, संभाषण ओतप्रोत भरलेलं असतं. अनेकवेळा ‘इफ्‌स अँड बट्‌स’ यांनी...

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

कोरोना बळी ३ हजाराच्या उंबरठ्यावर

>> राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ३ हजारांवर; नवे केवळ २१७ रुग्ण; ७ जणांचा बळी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३...

ALSO IN THIS SECTION

विरोधक एकत्र येणार?

‘जो मै बोलता हूँ, वो मै करता हूँ, जो मै नही बोलता वो तो डेफिनेटली करता हूँ’ हा हिंदी चित्रपटातील संवाद ज्यांना...

कोरोना बळी ३ हजाराच्या उंबरठ्यावर

>> राज्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्याही ३ हजारांवर; नवे केवळ २१७ रुग्ण; ७ जणांचा बळी राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ३...

१० हजार पदे भरणारच : मुख्यमंत्री

>> विरोधकांकडून होणार्‍या टीकेनंतर घोषणेचा पुनरुच्चार विविध सरकारी खात्यांमध्ये रिक्त असलेली १० हजार पदे येत्या सहा महिन्यांत भरणे अशक्य...

कोविडविरुद्धच्या लढ्यात योग ठरला फायदेशीर

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : आग्वाद किल्ल्यावर योगदिन साजरा योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य अशी भेट असून,...

भाजपचा तूर्त स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय

>> प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीतील आघाडीबाबत एवढ्या लवकर निर्णय घेतला जाऊ शकत नाही....