१८-४४ वर्षांपर्यंतच्या विशेष गटांचे आजपासून लसीकरण

0
104

>> स्तनदा माता, टॅक्सी-रिक्षाचालक, पायलट, दिव्यांग आणि खल

राज्यातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आता अधिकाधिक लसीकरणावर भर देण्याचे निश्‍चित केले आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील विशेष गटांचे लसीकरण सुरू केले जाणार आहे. हे लसीकरण दि. ३ ते १० जून या काळात चालणार आहे. या लसीकरण मोहिमेत स्तनदा माता, दिव्यांग अशा काही जणांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती लसीकरण मोहिमेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

राज्यात आजपासून सुरू होणार्‍या १८ ते ४४ वयोगटासाठीच्या लसीकरण मोहिमेत स्तनदा माता, दिव्यांग, खलाशी, ऑटोरिक्षाचालक, टॅक्सीचालक, पिवळ्या व काळ्या टॅक्सींचे चालक व मोटारसायकल पायलट यांना प्राधान्य मिळणार आहे. गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्ती, तसेच दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मुले असलेल्या पालकांनाही या लसीकरणात प्राधान्य देणार येणार आहे. तसेच जहाजांवर काम करणार्‍या खलाशांचेही लसीकरण केले जाणार आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र बोरकर यांनी दिली.

जहाजांवर काम करणार्‍या खलाशांचे लसीकरण करण्यात आल्यास त्यांना जहाजांवर नोकरीत रुजू होता येईल. टॅक्सीचालक, रिक्षाचालक व मोटारसायकल पायलट या लोकांचा दररोज कित्येक लोकांशी जवळचा संबंध येतो. त्यामुळे त्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. किनारपट्टीवरील जीवरक्षकांचा कोविड योद्ध्यांमध्ये समावेश करण्यात आलेला असून, त्यांचेही लसीकरण केले जाणार आहे.
राज्यातील लोकांकडून अजूनही लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत डॉ. राजेंद्र बोरकर यांनी व्यक्त केली. ‘लस महोत्सव २.०’लाही अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. त्यामुळे राज्यात शिल्लक राहिलेला लसींचा साठा हा नवीन लाभार्थींच्या लसीकरणासाठी वापरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष गटांना आधार कार्डसह
अन्य कागदपत्रांची आवश्यकता
या लसीकरण मोहिमेत प्राधान्य दिल्या जाणार्‍या व्यक्तींना आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. दिव्यांगांनी समाज कल्याण प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. स्तनदा माता आणि २ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या पालकांनी लसीकरणासाठी येताना मुलाचा जन्मदाखला आणि आधार कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. टॅक्सी, मोटरसायकल आणि रिक्षाचालकांना आरटीओ बॅच, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.