सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द

0
135

>> उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींचा निर्णय

>> गोवा बोर्डाकडूनही परीक्षा रद्द होण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबतच्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात काल मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.

सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षादेखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशीही भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मूल्यमापनाचा प्रश्‍न
दरम्यान, परीक्षा होणार नसल्यामुळे आता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळापत्रकानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासोबतच, गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य!

हा निर्णय घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य असल्याचे स्पष्ट केलेआहे. सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलतेने पाहायला हवे, असे यावेळी पंतप्रधानांनी सांगितले.