Home बातम्या अपरिचित मारिओ

अपरिचित मारिओ

0

रामनाथ न. पै रायकर

हजारो शब्द खर्च घालूनही जी गोष्ट एखादेवेळी व्यक्त करणे शक्य होत नाही, तीच गोष्ट ब्रशच्या काही फटकार्‍यांनी सहज सांगता येते अशा अर्थाची एक म्हण प्रचलित आहे. लेखणीच्या जोरापेक्षा कुंचल्याच्या रेषा सदैव अधिक परिणामकारक ठरत आलेल्या आहेत, हे एखाद्या डोळस माणसाला पटवून द्यायला वर उल्लेखीत म्हणीची तशी गरज पडत नाही. चित्र हे माध्यम आपल्यातील आशय एखाद्या अज्ञानी व्यक्तीपर्यंतदेखील सहजतेने पोचविते, जे लिखित मजकुराला शक्य नसते. थोर गोमंतकीय व्यंगचित्रकार मारिओ द मिरांदा यांची व्यंगचित्रे तर बघणार्‍यांपुढे अवघे विश्‍वच उभे करतात. किंबहुना मारिओची प्रत्येक कलाकृती म्हणजे एखाद्या कादंबरीचे प्रकरणच ठरावे. त्यांच्या व्यंगचित्रांमधील तपशील, बारीकसारीक गोष्टी, एखाद्या प्रचंड शिल्पावर डोळ्यात न मावणारे सूक्ष्म कोरीवकाम असावे त्याप्रमाणे छोट्याछोट्या चित्रमय नोंदींची नक्षी उमटवीत जाते.

जवळजवळ सहा दशके आपल्या चित्रकलेचा अफाट आविष्कार घडविणार्‍या मारिओच्या व्यंगचित्रांवर तसेच रेखाचित्रांवर त्यांच्या खास शैलीची छाप आढळते. हजारो चित्रकारांच्या कलाकृतींमधून मारिओच्या एखाद्या चित्राचा शोध घेणे याच शैलीमुळे सोपे ठरते. मात्र एखाद्याला मारिओच्या शैलीचे वर्णन कर म्हणून सांगितले तर ते अत्यंत जिकिरीचे काम बनून जाते. चित्रकलेसाठी वापरण्यात येणारी पेन्सिल किंवा कुंचला या पारंपरिक आयुधांचा त्याग करून मारिओने काळी शाई भरलेल्या लांब निबाच्या पेनाने आपली अगणित चित्रे निर्माण केली होती. अशा या अफलातून कलाकाराने त्याच्या व्यंगचित्रांमध्ये नाना व्यक्तींना बेढबपणाकडे झुकवत एक विशेष प्रकारचे हसरे विश्‍व साकार केले असले तरी मारिओची गंभीर प्रकृतीची रेखाचित्रे ही बघणार्‍यांना एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात. वेगवेगळ्या आकारांचे आणि जाडीचे बारीकमोठे फटकारे वापरून अमेरिकेपासून चीनपर्यंत आणि जनावरांपासून पक्ष्यांपर्यंत सगळ्यांनाच स्वतःच्या चित्रमय जगतात स्थान देत मारिओने कागदावरती चमत्कार घडविलेले आहेत. या कलावंताची गोव्यासंबंधीची चित्रे एकत्र केली तर कालचा आणि आजचा गोवा काय होता व आहे हे तपशीलवारपणे वर्णन करायला एकाही शब्दाची गरज भासणार नाही.

तर नमनालाच घडाभर तेल ओतण्याच्या या प्रपंचामागचे एकमेव कारण म्हणजे, बर्‍याच जणांना मारिओच्या माहीत नसलेल्या अशा अपरिचित बाजूचे दर्शन घडविण्यापूर्वी त्याच्या चित्रशैलीबद्दल माहिती देणे. तसे बघितले तर या प्रतिभासंपन्न गोमंतकीय कलाकाराच्या चित्रकलेचा श्रीगणेशा त्याच्या लोटलीस्थित वाड्याच्या भिंतींवर वेगवेगळ्या आकृत्या चितारण्याने झाला. त्यानंतर मारिओच्या आईने त्याला एक कोरी वही आणून दिली आणि तेव्हापासून त्याची चित्रकलेशी गट्टी जमली.

हा सगळा तपशील वेळोवेळी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होत आलेला आहे, परंतु १९४६ ते १९५१ या कालखंडामध्ये मारिओच्या जीवनात जी एक अनोखी गोष्ट घडली, त्याबद्दल फार थोड्या जणांना माहिती असेल.

१९४६ मध्ये वयाच्या विसाव्या वर्षी मुंबईतील सेंट झेविअर महाविद्यालयात इतिहास विषय घेऊन बी..चा अभ्यास करणार्‍या तरुण मारिओला डायरी अर्थात रोजनिशी लिहिण्याचा छंद जडला; आणि डायरीवर प्रत्येक दिवसाचा तपशील भरताना त्याने मजकुराच्या बाजूला चित्रे रेखाटण्याचा ध्यास घेतला. अर्थात ही चित्रे काही आपल्याला परिचित असलेल्या त्याच्या शैलीतील नव्हती. मारिओचा हा चित्रप्रपंच १९५१ पर्यंत चालला. कालपरवापर्यंत मारिओच्या या चित्रांनी नटलेल्या रोजनिश्यांचा कुणालाही पत्ता नव्हता. सुदैवाने मारिओच्या जीवनकाळातच प्रसिद्ध गोमंतकीय स्थापत्त्यशास्त्रज्ञ जेरार्ड द कुन्हा यांनी या डायर्‍या आपल्या ताब्यात घेतल्या व साठपासष्ट वर्षांपूर्वीच्या डायर्‍यांना पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध करण्याचा विडा उचलला. आज जेरार्ड यांच्या आर्किटेक्चर ऑटोनोमस् या संस्थेद्वारा मारिओच्या १९५० व १९५१ अशा दोन वर्षांशी संबंध सांगणार्‍या रोजनिश्या पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या आहेत. १९५१ सालातील डायरीचे प्रकाशन गेल्या वर्षी करण्यात आले होते, तर १९५० सालातील रोजनिशी परवाच २ मे रोजी मारिओच्या ८६ व्या जयंतीचे निमित्त साधून विमोचित करण्यात आली.

जेरार्डपाशी मारिओच्या डायर्‍यांबद्दल बरीच मनोरंजक माहिती उपलब्ध आहे. तो सांगतो, ‘‘मारिओ मुंबईत पदवी शिक्षण घेत असतानाच त्याला चित्रमय रोजनिशी लिहिण्याचा छंद जडला; छंद नव्हे ते वेडच होते!’’ पुढे सांगतो, ‘‘पुस्तकांच्या दुकानामधून विकत घेतलेल्या कोर्‍या डायरीवर सुरुवातीला मारिओ निळ्या शाईच्या पेनाने लिखित मजकुराच्या बाजूला रेखाटन करत असे. पुढे त्याने हळूहळू जलरंग, पोस्टर कलर, रंगीत पेन्सिली यांच्या मदतीने रंगीबेरंगी चित्रांनी आपल्या डायर्‍या सजविल्या.’’ जोपर्यंत मारिओ मुंबईत राहिला तोवर त्याने महाविद्यालयामधील जीवन, मित्रांबरोबर सिनेमा अथवा चौपाटीवर जाणे, इथपासून ते आंदोलने व संपांसकट मुंबईतील विविध घटनांवर आपल्या डायर्‍यांमधून भाष्य करणे चालू ठेवले. बाजूला रेखाटलेली चित्रे होतीच.

जेरार्ड सांगतो, ‘‘पुढे १९५० व १९५१ अशा दोन वर्षांसाठी मारिओ गोव्यामध्ये लोटली येथील आपल्या घरी वास्तव्यासाठी आला, आणि या चोवीस महिन्यांच्या सुट्टीदरम्यान त्याच्या चित्रकलेला बहर आला.’’ तो पुढे म्हणतो, ‘‘गोव्याच्या निसर्गाचाही कदाचित परिणाम असावा, त्याच्या डायर्‍या रंगीत रेखाचित्रांनी नटत गेल्या.’’ १९५०५१ या काळात मारिओ आपल्या फिलिप, ग्रॅशीअस, कोन्स्तान्सीयो, सॅबॅस्तीयांव तसेच बांदोडकर अशा मित्रमंडळींसह गोव्यामध्ये ज्याज्या ठिकाणी गेला, त्यात्या ठिकाणची सचित्र वर्णने या दोन प्रकाशित डायर्‍यांमध्ये बघायला मिळतात. शिवाय गोव्यातील ग्रामीण जीवन, त्याकाळचे मडगाव शहर असे बरेच तपशील त्यांमध्ये सापडतात.

‘‘तसे बघितल्यास या सगळ्या डायर्‍या म्हणजे मारिओचे त्याच्या तरुणपणातील आत्मचरित्रच म्हणावे लागेल.’’ जेरार्ड पुढे सांगतो, ‘‘शिवाय या रोजनिश्यांमधून तत्कालीन गोवा, त्याकाळातील गोव्यामधील पोर्तुगीज राजवट आणि एकूणच गोव्याचा १९५० च्या दशकातला समाज यांचे उत्कृष्ट दर्शन घडते.’’ समाजशास्त्राच्या विद्यार्थ्याला चित्रमय खजिनाच वाटावा अशा या डायर्‍या. त्याकाळातील गोमंतकीय कशाप्रकारे जीवन जगत असत, काय खात असत, कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करत असत या सगळ्यांचा सचित्र पटच उभा करतात.

सदर डायर्‍यांबद्दल अधिक माहिती देताना जेरार्ड म्हणतो, ‘‘आपली रोजनिशी लिहिताना मारिओने कुठेही विनोदाचे बोट सोडलेले दिसत नाही. तो सतत कुणा ना कुणावर निर्भेळ विनोद करताना आढळतो. मग तो खेड्यातील चर्चमधील पाद्री असो, नाहीतर मस्तवाल पोर्तुगीज पोलीस.’’ या प्रकाशित डायर्‍यांमधील चित्रांतून मारिओ गोव्याची सौंदर्यस्थळे, वैशिष्ट्ये दाखवावी वा इथल्या खासियतीचा वेध घ्यावा असा जाणूनबुजून प्रयत्न करताना दिसत नाही. मात्र त्या रेखाटनांतून बघणार्‍यांना मंत्रमुग्ध करत तो विलक्षण ऐंद्रजालिक किमया साधतो. मारिओमधील विनोदाचे अंग तसेच त्याच्या चित्रकलेचा विकासही १९४६ ते १९५१ या वर्षांदरम्यान त्याच्या डायर्‍यांतून साकार होत गेला हे स्पष्टपणे दिसते, ज्याचे फलित त्याच्या पुढच्या आयुष्यातील कलाकृतींमधून बघायला मिळते. आपल्या डायर्‍यांमधून हास्याचे फवारे उडवणार्‍या मारिओने त्याच्या मित्रांवरही भरपूर विनोद केलेले आहेत.

जेरार्ड सांगतो, ‘‘मारिओच्या मित्रमंडळीमध्ये बांदोडकर नावाचा एक लंबूटांग मित्र होता. किंबहुना हा मित्र सुदैवाने आजही हयात आहे, ज्याचा सगळेजण बांडूम्हणून उल्लेख करतात. या बांडूवर सदर डायर्‍यांमधून सर्वात जास्त विनोद केलेले आढळतात. एकदा बांडूच्या घरी फर्ग्युसन कंपनीचा सेकंड हॅण्डरेडिओ आणतात आणि त्याच सुमारास गणेश चतुर्थीचा सण आलेला असतो. तर मारिओने बांडू गणपतीऐवजी रेडिओसमोर दंडवत घालतो व माझा एवढा अपमान कुणीही केला नव्हता असे म्हणून गणपतीची मूर्ती आपले तोंड फिरविते, असे रेखाचित्र काढले होते.’’ १९५० मध्ये नृत्य शिकणारा बांडू १९५१ च्या डायरीमध्ये लग्न करताना दिसतो. अशा प्रकारची नानाविध चित्रे सदर डायर्‍यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात.

जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा महिन्यांच्या क्रमानुसार तसेच प्रत्येक महिन्याच्या तारखेप्रमाणे या प्रकाशित डायर्‍यांमधून मारिओचे तारुण्य तसेच त्याची कला डोकावते. ज्या दिवशी काहीच घडले नाही, त्या दिवशी मारिओने आपल्या डायरीचे पान एखादे निसर्गचित्र अथवा गावातील गावडा स्त्री, कोळी, शेतकरी, वयस्क हिंदू कुटुंबप्रमुख, केशकर्तनालयात करामत करणारा न्हावी अशा व्यक्तिचित्रांनी सजविलेले आढळते. याशिवाय मारिओ व मित्रमंडळाने भेट दिलेली एखाद्या खेड्यातील जत्रा, त्यांनी मडगाव शहरात नव्याने सुरू केलेल्या चित्रपटगृहाला दिलेली भेट, मारिओ व मित्रांनी हॉटेलमधील खाद्यपदार्थांवर ताव मारतानाचे दृश्य अशा आठवणी या रोजनिशांमध्ये बघायला मिळतात. खेड्यात आलेली नवीन गाडी, कणसाच्या फेस्तप्रसंगी कणसे कापताना आडवा झालेला पाद्री, आणि कित्येक वेळा मारिओने मित्रांसोबत त्यांच्या मैत्रिणींची केलेली थट्टामस्करी असेही प्रसंग या डायर्‍यांमध्ये सजीव झालेले आहेत. जेरार्ड सांगतो, ‘‘त्याकाळी फोटोग्राफी अर्थात स्थिरछायाचित्रण हा प्रकार अत्यंत लोकप्रिय झाल्यामुळे डायर्‍यांमध्ये बर्‍याच ठिकाणी मारिओने आपल्या मित्रांसोबत टिपलेली अनेक छायाचित्रेही चिकटवलेली होती. मी प्रकाशित केलेल्या डायर्‍यांमध्ये सदर छायाचित्रेही बघायला मिळतात. आणि महत्त्वाचे म्हणजे, १९५१ च्या डायरीमध्ये काही ठिकाणी मारिओच्या जुन्या रेखाटन शैलीमध्ये होणारा बदल व त्याच्या प्रचलित शैलीचा उगम बघायला मिळतो.’’

मारिओच्या डायर्‍या पुढे त्याच्यासाठी महाविद्यालयाच्या पदवी प्रमाणपत्रापेक्षाही महत्त्वाच्या ठरल्या. याचे कारण म्हणजे, १९५२५३ साली गोव्याहून मुंबईला परतल्यावर त्याने याच डायर्‍यांमधील रेखाचित्रे व व्यंगचित्रे दाखवून प्रथम करंटमध्ये फ्रीलान्सरचित्रकार म्हणून व तद्नंतर कायमस्वरूपी आर्टिस्ट म्हणून द टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकर्‍या पटकावल्या. ‘‘खरे तर या डायर्‍यांमधील मूळ मजकूर हा पोर्तुगीज भाषेमध्ये लिहिलेला होता, पण आम्ही या डायर्‍या प्रकाशित करताना सर्वसामान्य वाचकांसाठी इंग्रजीमध्ये भाषांतरित केल्या,’’ जेरार्ड म्हणाला. त्याच्याच सांगण्यानुसार जर पोर्तुगालमधून या डायर्‍यांना मागणी आली तर मूळ पोर्तुगीज भाषेतील मजकुरासकट त्या प्रसिद्ध करण्यात त्याला आनंदच होईल.

पुस्तकांच्या बाजारपेठेत या डायर्‍या कितपत तग धरून राहतील याबद्दल जेरार्ड साशंक आहे. ‘‘या डायर्‍या जुन्या पिढीतील अनुभवांचे गाठोडे बाळगणार्‍या वयस्क लोकांना ओळखीच्या वाटतील. मात्र नव्या पिढीला या रोजनिश्यांबद्दल काय वाटेल हे मला सांगता येत नसले तरीही मी येत्या दोन वर्षांमध्ये १९४६ व १९४७ सालच्या डायर्‍या प्रसिद्ध करणार आहे,’’ असे जेरार्ड म्हणाला. मारिओने इतर काही वर्षांच्या डायर्‍या लिहिलेल्या असल्या तरी त्या आज गहाळ झालेल्या आहेत. जेरार्डच्या मते अशा डायर्‍या खुद्द मारिओने त्याच्या नातेवाइकांना अथवा मित्रांना भेट म्हणून दिल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेरार्ड म्हणतो, ‘‘आज छपाईचे महत्त्व कमी होत चालले आहे, त्याचबरोबर वर्तमानपत्रांमधून छापली जाणारी व्यंगचित्रेही गायब होत आहेत. अशा स्थितीत व्यंगचित्रकार म्हणून आपली कारकीर्द घडविण्यासाठी गोव्यात कोणी उत्सुक असेल असे मला वाटत नाही. आर. के. लक्ष्मण, अबू अब्राहम, मारिओ यांसारखे लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेले व्यंगचित्रकार सुपरस्टारबनले होते; तो काळ दुर्दैवाने मागे पडला आहे. असे असले तरी मारिओच्या इतर कलाकृतींच्या तुलनेने त्याच्या डायर्‍यांचे महत्त्व कमी लेखता येणार नाही. कारण या रोजनिश्यांमध्ये एका महान कलाकाराच्या चित्रकलेच्या क्षेत्रातील नेत्रदीपक योगदानाचे मूळ दडलेले आहे.’’

आपल्या जीवनात प्रत्येक नवा शब्द एक नवा संदर्भ घेऊन येत असतो. एखादा शब्द डोळ्यांपुढे नाना प्रकारच्या चित्रमालिका उभ्या करून जातो. नुसते जत्राअसे म्हटले की एखाद्या देवाची आपण कधीकाळी पाहिलेली जत्रा, त्या देवाच्या देवळाचा कळस, मैदानात फिरणारी प्रचंड गोलाकार चाके, त्या परिसरात मांडलेली हलवायांची, खेळण्यांची, भांड्यांची, कपड्यांची दुकाने, पिपाण्या वाजवीत कानात वारे भरलेल्या वासरांप्रमाणे मोटाक सुटलेली मुले, लाऊडस्पीकरवरून कानांवर आदळणारी गाणी, देवाच्या पालखीची मिरवणूकअशा सगळ्या सगळ्यांसकट मनासमोरून झर्रकन जाते. मारिओच्या डायर्‍या अशा अनेक चित्रपटांचे दर्शन पानापानांमधून घडवितात. मग गोवा हे नकाशावरील एक ठिकाण राहत नाही, ते या डायर्‍यांमधून एका विशिष्ट काळातील समाजाचे चित्रण बनून जाते आणि बघणार्‍यांच्या मनात गतकाळात हरवलेल्या समृद्ध जीवनाबद्दल हुरहुर निर्माण करते.