– अनिल आचार्य, पर्तगाळ – काणकोण
महाराष्ट्रातल्या राळेगणसिद्धी गावातून ७४ वर्षांचा एक वृद्ध (?) देशभर पसरलेल्या भ्रष्टाचाराविरूद्ध आवाज उठवण्यासाठी दिल्लीत येऊन उपोषणाला बसतो, सगळ्या जनतेला लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन करतो व एक चमत्कार घडावा तसा सगळा देश त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देतो ही सगळे राजकीय पक्ष आणि संघटनांना धक्का देणारी गोष्ट ठरली. इतर देशांमध्ये सत्ताधार्यांविरूद्ध चालू असलेल्या आंदोलनांत मोठा हिंसाचार आणि मालमत्तेचे होत असलेले नुकसान आम्ही टीव्हीवर पाहात असतो. आमच्या देशामध्येही एखाद्या पक्षाचे, संघटनेचे आंदोलन चालू असते, तेव्हा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे नुकसान व हिंसाचार घडत असतो. पण एकशे दहा कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात अण्णांच्या शांततामय आंदोलनाला मिळालेला जवळपास शंभर टक्के प्रतिसाद, तोही कुठेही एकही हिंसक घटना न घडता, ही सगळ्या जगाने थक्क होऊन पाहण्यासारखी गोष्ट आहे.
हे कसे घडू शकले याचा विचार करता काही गोष्टी जाणवतात. एक म्हणजे देशभरातले आर्थिकदृष्ट्या उच्च स्तरातले लोक सोडल्यास सगळी जनता भ्रष्टाचारामुळे उबगून गेलेली आहे. उघडरीत्या भ्रष्टाचाराची मोठाली प्रकरणे घडत असताना, मुकाट्याने पाहण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही, अशा विरूद्ध ठामपणे उभा राहण्याची योग्यता आणि तयारी असलेल्या व्यक्तीच्या प्रतीक्षेतच लोक होते. अशा वेळीच अण्णा पुढे सरसावले. अण्णा हे चारित्र्याने शुद्ध आहेतच, शिवाय गेल्या सुमारे वीस वर्षात आपला स्वतःचा गाव सुधारण्यासाठी त्यांनी बरेच काम केलेले आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या युतीच्या असो वा सध्याच्या आघाडी सरकारमधले असो, काही भ्रष्टाचारी मंत्र्यांविरूद्ध त्यांनी पुराव्यांसकट आंदोलन केलेले आहे. त्यामुळे चार मंत्र्यांना राजीनामे देणे भाग पडलेले आहे. अनेक सरकारी अधिकार्यांना कारवाईला सामोरे जाणे भाग पडलेले आहे. अण्णांची नैतिक बाजू बळकट असल्यामुळे आणि शुद्ध चारित्र्यामुळे सरकार पक्षाकडून त्यांच्यावर अगदी सगळी यंत्रणा हाती असूनही काहीच वाकडे करू शकणार नाही. चुकीच्या माहितीवरून अण्णांविरूद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करणार्या कॉंग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांना माङ्गी मागावी लागली यातच अण्णा ही काय चीज आहे, ते दिसून येते. गेल्या सात–आठ महिन्यांत भ्रष्टाचाराची जी प्रकरणे प्रसारमाध्यमांमुळे उघडकीस आली, त्यामुळे सगळा देश हादरून गेल्यासारखा झाला होता, कारण पूर्वी पाच – दहा कोटींचे भ्रष्टाचार ऐकून होतो, पण राष्ट्रकुल स्पधेर्र्मधला सत्तर हजार कोटींचा घोटाळा, टु–जी स्पेक्ट्रममधील दीड लाख कोटींचा तर कुठे कुठे पाच–दहा हजार कोटींची भ्रष्टाचारांची प्रकरणे गाजू लागली. आणि सरकार म्हणून जे काही आहे ती त्यांचीच माणसे असल्यामुळे प्रकरण दाबून टाकले जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर एव्हाना सगळे निर्दोष म्हणून सरकारने जाहीरही केले असते.
या आंदोलनाने ङ्गक्त सत्ताधार्यांचीच नव्हे तर, अन्य राजकीय पक्षांचीही गोची झाल्याचे दिसून आले. सर्वसामान्य जनता सोडल्यास सगळ्याच राजकीय पक्षांसाठी हे आंदोलन चिंताजनक ठरले. सत्ताधारी आणि लालूप्रसादांसारखे लोक बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन जनलोकपाल विधेयकाला विरोध दर्शवत होते. जणू काही बाबासाहेबांनी या लोकांना पाहिजे तेवढा भ्रष्टाचार करा, कुणाही गुन्हेगाराला लोकप्रतिनिधी म्हणून आणून सभागृहात बसवा व कोणी विरोध केला तर आपले नाव सांगा, असेच यांना सांगितले असावे, असेच जणू वाटावे. काही सरकारसमर्थक पत्रकारांनी तर, अण्णांच्या आंदोलनाला ब्लॅकमेलिंग म्हणूनही हिणवले. क्वचितच लोकसभेत येऊन बसणार्या राहुल गांधींनी राष्ट्राला संदेश देण्याच्या आविर्भावात भाषण करताना मूळ मुद्यालाच बगल देण्याचा प्रयत्न केला. सत्ता हाती असूनही गेल्या सात वर्षांत या संदर्भात कुठलेच पाऊल का उचलले नाही हे मात्र त्यांनी सांगितले नाही.
दिवसेंदिवस अण्णा समर्थकांची संख्या वाढू लागली. सरकारवर दबावही वाढू लागला आणि नाईलाजाने का होईना, अण्णांच्या भावनाशी आपण सहमत असून सक्षम व प्रभावी असे लोकपाल विधेयक आपण बनवू असे दोन्ही सभागृहांनी मान्य करून प्रश्न पुढील प्रक्रीयेसाठी स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. पण हे करतानाही जे डावपेंच खेळले गेले, शब्दांचे खेळ केले गेले, बनवेगिरी करण्याचे प्रयत्न झाले त्याचे सार्या देशाला दर्शन झाले.
या जनलोकपाल विधेयकाच्या निमित्ताने देशभर चांगलीच जागृती झाली. युवावर्गाला एक चांगले व्यासपीठ मिळाले. मनात आणले तर मस्तवाल राजकारण्यांना वठणीवर आणणे शक्य आहे, तेही शांततामय मार्गाने ही भावना अण्णांनी सर्वांमध्ये रूजवली आहे. बारा दिवसांच्या उपोषण काळात कुठेच हिंसाचार, दंगल, गडबड गोंधळ माजला नाही हे या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
कुठलाच पक्ष आणि संघटना हाताशी नसतानाही अण्णांमागे जनशक्ती उभी राहिली याला इतिहासात तोड नाही. मुख्य लढाई पुढेच आहे. तीही अण्णा जिंकणार यात शंका नाही. कारण सत्यासाठी, देश आणि जनतेच्या भल्यासाठी चाललेली ही लढाई आहे.
नुकतंच अण्णांच्या आंदोलनाविषयी ते अयशस्वी झाल्याचे रामदेवबाबांचे वक्तव्य टीव्हीवर पाहिले आणि धक्काच बसला. योग आणि आयुर्वेदाची ओळख रामदेवबाबांनी देश–परदेशात प्रभावीपणे करून दिलेली आहे, यात शंकाच नाही. पण भ्रष्टाचाराविरूद्ध त्यांनी चालू केलेली मोहीम शिबिरातील त्यांच्या व्याख्यानापुरतीच मर्यादित ठेवली असती तर, बरे झाले असते, कारण, रामलीला मैदानावरील त्यांच्या उपोषणाला सरकारने दिलेला दणका आणि त्यानंतरचे त्यांचे वागणे बोलणे हे त्यांच्या विषयीच्या आदरभावनेला तडा देणारेच ठरले आहे. आपल्या वक्तव्यातून ते अण्णांच्या आंदोलनाला कमी लेखत आहेत, हे दिसून येते. त्यात अण्णांचे काहीच नुकसान नाही पण, रामदेवबाबा स्वतःचेच अवमूल्यन मात्र करून घेणार असे दिसते.. अण्णांच्या आंदोलनाला यापुढेही असाच प्रतिसाद मिळणार यात शंकाच नाही. अण्णांना चांगले आरोग्य लाभो या सदिच्छा! अण्णा तुझे सलाम!