अजून खूप जायचे आहे पुढे…

0
569


प्रिय वाचकहो, नमस्कार!
आपल्या सर्वांचे लाडके दैनिक नवप्रभा आज ५० वर्षांची सुवर्णमहोत्सवी वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून हीरक महोत्सवाच्या दिशेने पहिले पाऊल टाकत आहे. गोवा मुक्तीनंतर गोमंतकीय समाजमानसाच्या ज्ञानाच्या आणि त्याद्वारे स्व-उत्कर्षाच्या आकांक्षा ध्यानात घेऊन गोमंतकाच्या आधुनिक उद्योगपर्वाचे एक प्रणेते आणि धेंपो उद्योगसमूहाचे अध्वर्यू वै. वसंतराव धेंपो आणि त्यांचे बंधू वै. वैकुंठराव धेंपो यांनी १९६३ साली १८ फेब्रुवारीला ‘द नवहिंद टाइम्स’ हे मुक्त गोमंतकातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र आणि त्यानंतर सात वर्षांनी १९७० साली ‘नवप्रभा’ हे त्याचे मराठी भावंड अशी दोन वृत्तपत्रे सुरू केली. मुक्त गोमंतकाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीमध्ये या दैनिकांनी आजवर किती विविधांगांनी योगदान दिलेले आहे त्याची आपल्यासारख्या सुजाण वाचकांना कल्पना आहेच.
नवप्रभेचे पहिले संपादक पत्रमहर्षी कै. द्वा. भ. कर्णिक यांनी आपल्या चिंतनशील, बुद्धिवादी व्यक्तिमत्त्वानुसार गोमंतकाच्या मातीतल्या या दैनिकाचा भरभक्कम पाया रचताना त्याला प्रबोधनात्मक वळण दिले. पहिली पाच वर्षे त्यांनी या दैनिकाला जे गंभीर वैचारिक अधिष्ठान दिले, तीच वाट त्यांच्यानंतरच्या संपादकांनीही अनुसरली. कै. शांताराम बोकील (२ वर्षे), कै. लक्ष्मीदास बोरकर (८ वर्षे), कै. तुकाराम कोकजे (२ वर्षे) आणि श्री. सुरेश वाळवे (२२ वर्षे) या उत्तराधिकार्‍यांनी आपापल्या कारकिर्दीमध्ये आपापल्या कौशल्यगुणांच्या आधारे त्यावर वेळोवेळी कळस चढवला. गेली बारा वर्षे या दैनिकाची जबाबदारी सांभाळताना पूर्वसुरींनी घालून दिलेल्या याच मळवाटेवरून नवप्रभेचा प्रवास सुरू ठेवला आहे आणि नव्या युगाच्या नव्या तंत्रज्ञानांचा आधार घेत संकेतस्थळ, ईपेपर, मोबाईल ऍप आणि समाजमाध्यमांची तसेच नव्या पुरवण्या, नवी आधुनिक मांडणी, दिवाळी अंक, वार्षिक दिनदर्शिका, विशेषांक आदी नानाविध उपक्रमांची जोड देत त्याला ताजा टवटवीत, आधुनिक चेहरा देण्याचा सतत प्रयत्न केला आहे.
वाचकांचे निखळ प्रेम नवप्रभेला सतत लाभत आले आहे. वर्षानुवर्षे साथ देणारा एवढा निष्ठावंत वाचक एखाद्या वृत्तपत्राला क्वचितच लाभत असतो. आमच्या निष्ठावंत वाचकांचा आम्हाला नितांत अभिमान आहे आणि आम्ही वेळोवेळी तो मिरवीतही असतो! अटीतटीच्या स्पर्धेच्या आणि आव्हानांच्या आजच्या युगामध्ये देखील नवप्रभेचे निशाण दिमाखाने फडकत राहिले आहे ते या आपल्या वाचकांच्या मनातील तिच्याप्रतीच्या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या बळावर!
गोमंतकीय मराठी पत्रकारितेला फार मोठी उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये ‘दर्पण’ हे पहिले मराठी नियतकालिक कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले, त्यानंतर चाळीस वर्षांनी १८७२ साली गोव्यामध्ये ‘देशसुधारणेच्छु’ हे पहिले गोमंतकीय मराठी नियतकालिक अस्तित्वात आले. तिथपासून झुंजार आणि विचारप्रवर्तक पत्रकारितेची एक देदीप्यमान परंपरा गोव्यामध्ये दिसून येते. ‘सत्संग’ कार कै. करंडेशास्त्री, ‘प्राचीप्रभा’ कार कै. दादा वैद्य, ‘प्रभात’ कार कै. डॉ. पुरुषोत्तम वामन शिरगावकर, ‘भारत’ कार कै. गोविंद पुंडलिक हेगडे देसाई, ‘हिंदू’ कार कै. दत्तात्रेय व्यंकटेश पै, ‘भारतमित्र’ कार कै. ना. भा. नायक, अशा अनेक झुंजार पत्रकारांनी आपल्या नियतकालिकांमधून प्रबोधनाची आणि जागृतीची ज्योत सतत तेवती ठेवली.
गोवा मुक्तीनंतर अनेक नवनवी दैनिके आणि इतर नियतकालिके गोव्यामध्ये अवतरली आणि त्यांनी येथील पत्रकारितेला नवी आधुनिक दिशा दिली. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, समाज बदलतो, तसे वर्तमानपत्रांनाही बदलणे भाग असते. काळाशी सुसंगत ठेवणे जरूरी असते. जी असे बदल सतत स्वतःमध्ये घडवतात ती टिकतात आणि जी घडवत नाहीत ती अस्ताला जातात. गोव्यामध्ये याचीही अनेक उदाहरणे आहेत. नवप्रभा या भूमीत रुजली, टिकली आणि विस्तारली, कारण बदलत्या काळासोबत ती बदलत राहिली. मात्र तिच्या मुळाशी असलेली मूल्यनिष्ठा तिने कायम राखली. वाचकांच्या आपल्यावरील विश्वासाला अतोनात महत्त्व दिले आणि तो जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला. सर्वसामान्य सुजाण वाचकापासून विविध क्षेत्रांमध्ये समाजाचे नेतृत्व करणार्‍या बुद्धिवादी, विचारवंत वाचकांपर्यंत सर्वांना जोडून ठेवत नवप्रभेने गेल्या पाच दशकांची ही वाटचाल केली म्हणूनच ती सफल ठरली आहे.
आज एका नव्या वळणावर ही वाटचाल येऊन ठेपली आहे. या सुवर्णमहोत्सवी वर्षाला कोरोना महामारीच्या जागतिक प्रकोपाने ग्रासले असले, तरी या आनंदाच्या सुवर्णक्षणाला त्यामुळे कोठेही उणीव येणार नाही असा आम्ही कसोशीने प्रयत्न केला आहे.
नवप्रभेला जेव्हा ४० वर्षे पूर्ण झाली तेव्हा आम्ही एक ४० पानी विशेषांक आपल्याला सादर केला होता. आज ५० व्या वर्षपूर्तीच्या प्रसंगी ५० पानांचा विशेषांक आपल्याला सादर करीत आहोत. या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ गतवर्षी झाला तेव्हा गेल्या १५ ऑगस्टला ‘सुवर्णमहोत्सवी वर्षारंभ विशेषांका’मध्येे आम्ही नवप्रभेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला होता. असंख्य वाचक, लेखकांनी त्यामध्ये नवप्रभेशी असलेल्या आपल्या अनुबंधांना उजाळा दिला होता. त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये प्रत्येक महिन्याला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे एकेक क्षेत्र घेऊन गोमंतकाच्या त्यातील गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीचा मागोवा मान्यवरांकडून घेतला गेला. आजच्या विशेषांकामध्ये गोमंतकाच्या भावी वाटचालीची दिशा आखणारा ‘माझ्या स्वप्नातला गोवा’ हा विषय विविध क्षेत्रांतील मान्यवरांना देण्यात आलेला आहे. त्याच्याच जोडीने गेल्या वर्षभरातील अत्यंत अभ्यासपूर्ण असे वेचक, वेधक लेखनही या विशेषांकाची संग्राह्यता लक्षात घेऊन आवर्जून समाविष्ट करण्यात आलेले आहे. गोमंतकाच्या भावीकाळासंबंधीचे दिशादिग्दर्शन या विचारमंथनातून घडावे असा यामागील मानस आहे.
नवप्रभेच्या सुवर्णमहोत्सवाचा हा आनंदोत्सव केवळ या विशेषांकांतून संपत नाही. आज अनेक नव्या गोष्टी या आनंदसोहळ्यामध्ये प्रकाशात येणार आहेत. गेल्या पन्नास वर्षांतील गोमंतकाच्या, भारताच्या आणि जगाच्या एकंदर वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आणि त्याचे नवप्रभेने केलेले वार्तांकन यांचे दर्शन घडवणारा मोठ्या आकारातील एक २०० पानी संदर्भग्रंथ ‘नवप्रभाः एक सोनेरी प्रवास’ या नावाने प्रकाशित होणार आहे.
नवप्रभेच्या गेल्या पन्नास वर्षांची वाटचाल मांडणारी ‘द नवप्रभा स्टोरी’ ही इंग्रजी ध्वनिचित्रफीत आज प्रकाशित होते आहे.
नवप्रभाचे ‘नवप्रभा डॉट कॉम’ हे संकेतस्थळ एका नव्या चेहर्‍यानिशी आजपासून आपल्या भेटीला येते आहे.
आणि आजच्या दिवशी दरवर्षी नवप्रभा कार्यालयामध्ये होणार्‍या, परंतु यंदा कोरोनाच्या कहरामुळे होऊ न शकलेल्या स्नेहमेळाव्याची उणीव भरून काढण्यासाठी आज सकाळी ११ ते १२ दरम्यान ‘गुगल मीट’ या मोबाईल ऍपद्वारे एक ऑनलाइन स्नेहमेळावाही आम्ही आयोजित केलेला आहे. आपणही त्यामध्ये या अंकात अन्यत्र दिलेल्या जाहिरातीतील मीटिंग कोड देऊन सहभागी होऊ शकता, आपल्या नवप्रभेप्रतीच्या भावना व्यक्त करू शकता.
या सुवर्णमहोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गोव्यातून आणि गोव्याबाहेरून आमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. भारताचे महामहिम राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंद, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, गोव्याचे राज्यपाल मा. श्री. सत्यपाल मलिक, गोव्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते मा. श्री. दिगंबर कामत, सध्या कोरोनाची झुंज घेत असलेले केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री मा. श्री. श्रीपाद नाईक यांनी आपल्या मनमोकळ्या शुभेच्छा संदेशांनी आम्हांस उपकृत केलेले आहे.
मा. राष्ट्रपती श्री. रामनाथजी कोविंद यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नवप्रभेने गोमंतकीय समाजाशी निगडित विविध सामाजिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नांमध्ये नवप्रभेने केलेल्या जनप्रबोधनाची दखल घेतली आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या विस्तृत शुभेच्छा संदेशात नवप्रभेने गोव्यामध्ये भाषा, संस्कृती आणि परंपरांच्या संवर्धनासाठी आणि लोकप्रियतेसाठी निष्ठेने आणि बांधिलकीपूर्वक केलेल्या कामगिरीचा गौरव केलेला आहे. थोरामोठ्यांचे हे आशीर्वाद आमच्या भावी वाटचालीला निश्‍चितच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरतील.
‘बिंब जरी बचके एवढे | प्रकाशा परी त्रैलोक्य थोकडे’ असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. नवप्रभेचे बिंब जरी छोटे असले तरी आजवर त्याची प्रभा गोमंतकाच्या सर्व जीवनांगांना व्यापून राहिलेली आहे. ‘अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे’ असे सांगणार्‍या संत सोहिरोबांच्या शिकवणीबरहुकूम जनमानसाच्या अंतरातील ज्ञानदिवा प्रज्वलित ठेवून मनामनांच्या सांदिकोपर्‍यातील अंधार नष्ट करण्यासाठी आणि आपल्या वाचकांचा रोजचा प्रत्येक दिवस समृद्ध करण्यासाठी नवप्रभा सदैव आपल्या भेटीला येत राहील. वर्तमानपत्र हे एखाद्या अग्निहोत्रासारखे असते. ते सतत जागे ठेवावे लागते. सुवर्णमहोत्सव हा या प्रवासातला एक टप्पा झाला. आता पुढे जायचे आहे. हीरक महोत्सव, अमृतमहोत्सव आणि शतक महोत्सवावर नजर ठेवून यापुढील वाटचाल करायची आहे ही जबाबदारीची जाणीव ठेवत असताना आपल्या सर्वांचे उदंड प्रेम, आशीर्वाद आणि पाठबळ यापुढील मार्गक्रमणही सुकर करील असा विश्वास आहे. आपली ही सक्रिय साथ यापुढेही अशीच उत्तरोत्तर लाभावी. तुम्हा सर्वांना आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला नम्र,

परेश वासुदेव प्रभू,
संपादक