डॉ. सोमनाथ कोमरपंत
१९६० नंतरच्या कालखंडातील मराठी कविकुलातील एक प्रतिभासंपन्न कवी ग्रेस यांचे सोमवार दि. २६ मार्च रोजी सकाळी दहा वाजता पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ही बातमी दूरदर्शनने आणि अन्य माध्यमांनी त्वरित सर्वत्र कळविली. सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. मन सुन्न झाले. गेली तीन वर्षे कॅन्सरसारख्या असाध्य आजाराशी ते निर्धाराने तोंड देत होते. आपणास आज ना उद्या मृत्यू गाठणार हे त्यांना माहीत होते. पण मृत्युभयाचा अथवा नैराश्याचा तवंग त्यांनी आपल्या मनावर येऊ दिला नाही. रुग्णालयात त्यांचे हृदयस्थ स्नेही हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली होती. शुश्रूषा करणार्या डॉक्टरांशीदेखील ग्रेस यांनी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. लतादीदींपासून सर्व मंगेशकर परिवाराचे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष होते. पण ग्रेस यांना वेदनामय परिस्थितीत विजनवासात अगतिकपणे पडून राहावे लागले.
शारीरिक व्याधीने पोखरले असतानाही ते हसतमुखाने आणि उत्साहाने बोलायचे. आपल्या स्नेह्यांशी संवाद साधायचे. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्या सर्जनशील मनाची उभारी नष्ट झाली नव्हती. कविता हा त्यांचा प्राण होता. तो त्यांचा श्वास होता. आजाराच्या वेळीही त्यांच्या मनोधारणा पक्क्या होत्या. लोकान्तापेक्षा एकांत प्रिय असलेल्या या प्रतिभावंताने काव्यप्रेमाचा कंद हृदयात जोपासणार्या कितीतरी रसिकांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते. अनुबंध निर्माण केला होता. ग्रेस यांची कविता दुर्बोध; त्यांची आशयसूत्रे अनाकलनीय आणि प्रतिमासृष्टी अपरिचित भावसंदर्भांमुळे चक्रावून टाकणारी असे सर्वसामान्यतः मानले जाते. एककेंद्री भावविश्वाच्या पलीकडे ते गेलेच नाहीत असेही मतप्रकटन होत राहिले. जर ते खरे मानले तरी त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती आणि काव्यविश्वाविषयी सर्वदूर प्रदेशात का आकर्षण वाटत आले? अमोघ शब्दकळेचे ते स्वामी होते. नवी आशयसूत्रे त्यांनी काव्यसृष्टीला प्रदान केली. परंपरा आणि नवता यांमधील परस्पर संबंध मर्मदृष्टीने ओळखून त्यांनी अनवट काव्यशैली घडविली. अनोखे अक्षरशिल्प निर्माण केले. ‘ओल्या वेळूची बासरी’ या नव्याकोर्या आणि आशयसंपन्न ललितबंधाचे लेखन त्यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बसून केले.
चांगल्या साहित्यकृतीची रचना वेदनेतूनच होते असे म्हणतात. ग्रेस यांच्या निर्मितीतून ते प्रत्ययास येते. आपल्याला कधीतरी जायचेच आहे, पण लौकिक जगातून जाण्यापूर्वी आपण अक्षय शब्दांचे दान मागे ठेवायचे आहे याचे सम्यक आत्मभान ग्रेस यांना होते. म्हणूनच तर त्यांनी आपल्या अंतःप्रेरणेनुसार लेखन करण्याचा वसा कायम ठेवला. एकेकाळी आपल्या प्राणशक्तीतील चैतन्याचा खळाळता प्रवाह नेहमीच आसासून प्रकट करणारे ग्रेस विकल झाले. आणि शेवटी सर्वांना चटका लावून अनंताच्या यात्रेला निघून गेले. एका व्यापक कुटुंबाचा कर्ता आणि खंबीर पुरुष उन्मळून पडला… सर्वत्र शोककळा पसरली… अर्धशतकात आपल्या व्यक्तित्वाची लखलखीत आणि पृथगात्म मुद्रा मराठी कवितेवर उमटविणार्या ग्रेस यांनी लौकिक जगाचा निरोप घेतला… ग्रेसपर्वाची समाप्ती झाली.
१९६० च्या दरम्यान काव्यक्षेत्रात पदार्पण केलेल्या ग्रेस यांनी अल्पावधीतच आपल्या प्रतिभेची चमक दाखविली. त्यांनी स्वीकारलेल्या काव्यनामापासून, कवितांमधील आशयसूत्रांपासून व अभिव्यक्तीच्या रूढ वळणा–वाकणांना अलविदा करीत चोखाळलेल्या नवा वाटापर्यंत रसिकांना कुतूहल वाटत राहिले. १९६७ मध्ये ‘संध्याकाळच्या कविता’ हा पहिला कवितासंग्रह ‘पॉप्युलर प्रकाशन’च्या ‘नवे कवी… नव्या कविता’ या मालेत प्रसिद्ध झाला. या मालेतील हा पहिलाच संग्रह. विलक्षण प्रतिभासामर्थ्य असलेला हा कवी… त्यांची संवेदनशीलता समकालीन कवींपेक्षा काहीशी निराळी… प्रगल्भ जीवनजाणीव व्यक्त करणारी आणि स्वतंत्र शैलीची… पाहता पाहता ग्रेस यांच्या कवितेचे क्षितिज संपन्न होत गेले… काव्यरसिकांचे ते आवडते कवी झाले. ग्रेस यांची जीवनसाधना ही काव्यनिर्मितीसाठी केंद्रीभूत ठरली. काव्यनिर्मिती आणि तिच्याविषयीचे चिंतन हा त्यांचा स्थायिभाव. तेच त्यांचे निरंतर अग्निहोत्र ठरले. त्यांच्यासारखे काव्यनिमग्न व्यक्तिमत्त्व मिळणे कठीण. त्यांची कविता ऐंद्रियतेबरोबर इंद्रियातीत होण्याचा प्रयत्न करते. ती त्यांच्या एकूण जगण्याचीच अभिव्यक्ती होय. त्यांच्या कवितेचे मंत्रभारलेपण शब्दांच्या पलीकडले आहे. ग्रेस यांचा काव्यानुभव शब्दांच्या चिमटीत पकडणे अतिशय कठीण. ‘र्ढीीश िेशा ळी पेीं ींे लश र्ीपवशीीींेेव; ळीं ळी ींे लश षशश्रीं’ असे जे सुप्रसिद्ध वचन आहे ते ग्रेस यांच्या कवितेला तंतोतंत लागू पडते. थॉमस कार्लाईल म्हणतो ः ‘झेशींीू ळी र्ाीीळलरश्र ींर्हेीसहीं.’ ग्रेस वाचताना प्रज्ञा–प्रतिभेचे ते संगमतीर्थ आहे याचा क्षणोक्षणी प्रत्यय येतो. मग ती कविता असो अथवा ललितबंध असो. इथे–तिथे ग्रेस यांच्या जीवनधारणेची, त्यांच्या आसासून आलेल्या जीवनोत्सुकतेची आणि जीवनभर एकांतात बसून केलेल्या आत्मचिंतनाची रूपकळा दिसते. हा माणूस हिमनगासारखा.. त्याचे दृश्य दुःख कवितेतून प्रकट झालेले. पण अथांग दुःख खाली बुडालेले… अंतर्यामी साठवलेले… त्यातील काही कल्लोळ तेवढे आपल्यापर्यंत आलेले.
अर्थाचे अनेक पदर असलेली ही गुणसंपन्न कविता. त्यांच्या कवितेतील तरल संवेदनाविश्व आनंदानुभव देत राहते; त्याचप्रमाणे दुःखसंवेदनेची कविता अंतर्मुख करते. १९७० नंतरच्या मराठी काव्यविश्वावर ग्रेस यांच्या काव्यशैलीचा गहिरा प्रभाव पडलेला आहे. या कवितेचे अनुकरण करणे ही कठीण बाब; परंतु तिची मोहिनी मात्र अनेकांवर पडलेली.
ग्रेस हे चिंतनशील कवी. दुःखचिंतनाची ग्रेस यांची जीवनशैली कवितेला जन्म देते. दुःखासारखी संपूर्ण अव्यभिचारी निष्ठा जगात इतरत्र कुठेही भेटणे शक्य नाही असे त्यांना वाटायचे. आकलन–आस्वादासाठी एरवी दुर्बोध वाटणारी त्यांची कविता दुःखसंदर्भ लावून वाचली तर ती सहजतेने आकळते. समजणे या प्रक्रियेपेक्षा तिचे संवेदन महत्त्वाचे. मराठी कवितेत विशुद्ध कवितेचा (र्झीीश िेशींीू) अंतःप्रवाह रूढ करण्यात ग्रेस यांचा मौलिक हातभार लागलेला आहे. निराकाराचा प्रदेश हा ग्रेस यांचा भावप्रदेश.
भाषा हे मनाचे माध्यम असल्यामुळे आशयाशी बेईमानी करणारी सुबोधता ग्रेस यांना मानवत नसे. ‘ख लरप लशलेाश ीारश्रश्र षेी र्ूेी; र्लीीं ख लरपपेीं लशलेाश ीळाश्रिश’ असे ते म्हणायचे.
दुःखसंवेदनेचा प्रचंड असा वाहता प्रवाह ग्रेस यांच्या कवितेतून दिसतो. गौतमबुद्धाची अपार करुणा, येशूचे दुःख आणि कबिराची असोशी यांचे एकवटलेपण ग्रेस यांच्या काव्यरचनेतून जाणवते. जाणिवेबरोबर तिची नेणीवदेखील तितकीच अधोरेखित करण्यासारखी. या वर्धिष्णू क्षितिजाचे सामर्थ्य आणि सौंदर्य स्तिमित करणारे. मनात सतत कुतूहल निर्माण करणारे. ग्रेस यांनी आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाला ‘संध्याकाळच्या कविता’ हे नाव का बरे दिले असेल? निसर्गाची आत्यंतिक ओढ त्यांना होतीच. निसर्गानुभूती हा तर त्यांच्या काव्यविश्वाचा मर्मबिंदू. पण त्याचे यथार्थदर्शन हा त्यांचा मनःपिंड नव्हे. संध्याकाळ ही प्रिय वेळ. सृजनवेला. अशा शांत, निवांत आणि विश्रब्ध वेळी क्रियाशून्य असणे हे ग्रेस यांना अपराधीपणाचे वाटायचे. स्वतःला गुंतवून घेण्याची प्रक्रिया, आतून पाहण्याची प्रक्रिया म्हणून त्यांनी या वेळेकडे पाहिले होते. त्यांच्या अंतर्मुखतेचा हा प्रवास, प्रवाह आणि प्रवेग… त्यातून आलेला शब्दकल्लोळ रसिकांची जीवनजाणीव भावसमृद्ध करणारा. गहिरेपणाकडे घेऊन जाणारा. आपल्या अम्लान शब्दकळेमुळे आणि संपन्न प्रतिमासृष्टीमुळे लावण्यमय काव्यशिल्प या स्वानंदमग्न कवीने निर्मिलेले आहे.
‘संध्याकाळच्या कविता’ या कवितासंग्रहाच्या अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी ग्रेस यांच्या दाणेदार अक्षरांतली ताम्रपटावर कोरल्याप्रमाणे मुद्रा उमटली होती ः
क्षितिज जसें दिसतें,
तशीं म्हणावीं गाणीं
देहावरची त्वचा आंधळी
छिलून घ्यावी कोणी.
गाय जशी हंबरते,
तसेंच व्याकुळ व्हावें
बुडतां बुडतां सांजप्रवाहीं;
अलगद् भरुनी यावे…
एक तुडुंब काळीजकहाणी तेवढ्याच आर्ततेने आणि उत्कटतेने अभिव्यक्त झाली. दुःखसंवेदनेचे अंतःस्तर एवढे तरल, कोमल असू शकतात याचा आल्हाददायी प्रत्यय रसिकांना आला. ही तप्त ग्रेसमुद्रा प्रमाथी झंझावाताप्रमाणे अंतर्याम ढवळून काढणारी होती आणि वास्तवाच्या प्रखर अनुभूतिदर्शनानंतर रसिकांना चंदनाचा किती शीतल स्पर्श करीत होती याचा प्रत्यय गेल्या अर्धशतकाच्या ग्रेस यांच्या काव्यप्रवासामुळे त्यांनी घेतलेला आहे.
‘संध्याकाळच्या कविता’नंतर ‘राजपुत्र आणि डार्लिंग’ (१९७४), ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’ (१९७७), ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’ (१९९५) आणि ‘सांजभयाच्या साजणी’ (२००६) या सकस, संपन्न कवितासंग्रहांच्या रूपाने ग्रेस यांचा अंतर्मुखतेचा प्रवास निरंतर चालू राहिला. कवितेबरोबर सर्जनशीलतेची उत्तुंगता आणि अथांगता गाठणारे ललितलेखन त्यांनी केले. ‘चर्चबेल’ (१९७४), ‘मितवा’ (१९८७), ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’ (२००१) आणि ‘मृगजळाचे बांधकाम’ (२००३) हे त्यांचे ‘ललितबंध’संग्रह प्रसिद्ध झाले. मनाच्या विकल अवस्थेतदेखील आपल्या परिणत मनाच्या उन्मेषांतील सौंदर्यविलासाचे दर्शन त्यांनी घडविले. ‘कावळे उडाले स्वामी’ आणि ‘ओल्या वेळूची बासरी’ हे त्यांच्या चिंतनशीलतेचे नवनीत आहे.
त्यांचे काव्यलेखन आणि त्यांनी मांडलेला ललितबंध यांच्यामध्ये एकात्मता आहे. त्यांच्याच एकसंध व्यक्तिमत्त्वाची ती निर्मिती आहे. आत्मशोधाच्या, जीवनशोधाच्या आणि काव्यनिर्मितिप्रक्रियेच्या अंतःप्रेरणेतून त्यांचा ललितबंध अवतरलेला आहे. चक्रधर, म्हाइंभट, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, कबीर, रवींद्रनाथ, टॉलस्टॉय, डोस्टोव्हस्की, श्री. म. माटे, रिल्के, जे. कृष्णमूर्ती, केशवसुत आणि जी. ए. कुलकर्णी या प्रज्ञावंतांना आणि प्रतिभावंतांना एकत्रितपणे अनुभवण्याचे हे आनंदनिधान आहे. ग्रेस हे तर विश्वाचे प्रवासी आणि रहिवासी. त्यांच्या भावजाणिवेचा डोह तुडुंब भरलेला होता. स्वतःच एक शक्तिप्रवाह होऊन रसिकांच्या मनावर तो कोसळत होता. कधीकधी हे विस्तीर्ण क्षितिज कवेत कसे घ्यावे याचा प्रश्न पडतो. या चित्कळेचे विभ्रम न्याहाळताना अनामिक आनंदलहरी मनाच्या सरोवरात निर्माण होतात.
परिणतावस्थेत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘सांजभयाच्या साजणी’मधील ‘ग्रेसची वृत्ती’ या कवितेत आत्मशोधाचे प्रगल्भ रूप पाहायला मिळते ः
चालणे वृत्तात माझे
बोलणे वृत्तीपरी
अग्निज्वालेच्या शिखेवरी
मेघमाळांच्या सरी…॥
मोहमाया जागवुनी
यक्षिणी येती घरा
शाक्त झाला सांध्यदीपक
पक्षिणीलाही चरा…॥
मागधी वेणू पुढे ये
दे उमेला सावली
या तिघींना स्पंद देते
राघवाची बाहुली…॥
ग्रेस स्वतःला शाक्तपंथीय म्हणवून घेत. मी अद्वैत मानणारा नसून द्वैती आहे हे त्यांच्या लिहिण्या–बोलण्यातून व्यक्त होत असे. परमेश्वरावर त्यांची श्रद्धा होती. ती डोळस होती. त्याच्या कृपेने शब्दशक्तीचे दान आपल्यावर पडलेले आहे असे त्यांना वाटायचे. रूढ परंपरा आणि कर्मकांड यांची त्यांना कधी गरज भासली नाही. अक्षरांची निस्सीम उपासना हाच त्यांचा धर्म ठरला. त्यामुळे त्यांची दृष्टी विश्वात्मक झाली. साहित्य, चित्रकला, संगीत, शिल्पकला, नृत्य–नाट्यादी कला यांचे परस्पर संबंध सातत्याने उलगडत संस्कृतीचा सारांश त्यांनी ललितबंधांमधून सांगितला. जीवनाचे अक्षांश–रेखांश सूक्ष्मतेने जाणून घेताना त्यांना प्रादेशिकतेची कुंपणे अडवू शकली नाहीत. त्यामुळे त्यांची दृष्टी आरपार गेली. आपल्या ‘रेखेच्या वाहणी’तून ‘विश्वाचे आर्त’ मांडणारे ज्ञानदेव त्यांना प्रातःस्मरणीय आणि नित्यनूतनही वाटले. काव्य रचताना रामदासांची ‘करुणाष्टके’ त्यांना कालबाह्य वाटली नाहीत. कबिराचा आत्मस्वर तर ग्रेस यांचा चिंतनाचा केंद्रबिंदू ठरला. ‘कविता हा मजेचा विषय नसून मज्जेचा विषय आहे’ ही केशवसुतांची काव्यविषयक मनोधारणा त्यांनी सातत्याने अधोरेखित केली. परंपरेचे डोळस परिशीलन करून नवतेशी तिला जोडून घेणारा हा सर्जनशील आत्मा होता. तो निरंतर अस्वस्थ होता. अंतर्यामी पोळलेला होता; पण विद्रोहाचा अग्नी प्रज्वलित न करता आदिम आणि अंतिम यांमध्ये भावात्मक अनुभूतीने ग्रेस यांच्या प्रतिभेने सेतू निर्माण केला. त्यांच्या कवितेतील मृत्यूविषयक चिंतन त्यादृष्टीने समजून घेण्यासारखे आहे.
‘बांग देणारा कबीर’ या कवितेत कवी उद्गारतो ः
तुझ्या खिन्न काळजात
मला घे रे सांभाळून;
जुन्या हातांची कमळे
पुन्हा फुलवू नवीन…
कुठे वाजते रे झांज
दूर दूर शिवालये;
कोण्या आरतीच्यासाठी
गंगा सांडते वलये?
बांग देणारा कबीर
उभा वेळूत मुरारी;
असा कळस मोडून
नको चढूस पायरी…
‘ज्ञानेश्वरीय वर्षा’ या कवितेत या अनामिक अनुबंधाचे मृणालतंतू प्रकट होतात ः
कोणी चाळवला घनु,
डंख आभाळाला झाला;
ढग ओटीत भरता
तिथे वारा ओशाळला…
कोण देशीचा हा घनु?
सारे मागतो अंगण;
गाठी चोळीच्याही गाठी
तीक्ष्ण चोचीचाच व्रण…
सौंदर्यानुभूतीची अनोखी आणि विलोभनीय रूपे ग्रेस यांच्या कवितांतून दिसतात. ‘संध्याकाळच्या कविता’पासून ‘सांजभयाच्या साजणी’पर्यंतच्या त्यांच्या काव्यप्रवासातील ही आल्हाददायी चित्रमालिका न्याहाळणे हा एक शब्दांतून व्यक्त न करण्यासारखा आनंदानुभव आहे. उदा.
कुशीला फुटाव्या कधीं चंद्रवेली
पुढें पृथ्विबिंबांतले आरसे
तुझ्या स्पर्शगांधार शैलींतलें शिल्प
स्वप्नांत माझ्या हंसावे जसें…
‘चंद्रमाधवीचे प्रदेश’मधील ‘द्रौपदी’ या कवितेत कवी उद्गारतो ः
तिथे द्रौपदीच्या दिठीला मिळाले
सुन्या अंतराळातुनी चालणे
नको रक्तगुंफेत शिंपून जाऊ
तुझ्या चंद्रओटीतले चांदणे
‘संध्याकाळच्या कविता’मधील ‘संग’ या कवितेत कविमनातील नेणिवेचा आविष्कार अनोख्या ढंगात होतो. त्याच्यातील सौंदर्यानुभूतीला रूप–गंधादी संवेदनांचा स्पर्श झालेला आहे.
पाय–मेंदीपाशी आले
चांदण्यांचे बळ
कुठें कुठें दुखूं लागे
कस्तुरीची कळ
‘देवाचा पाऊस’ या कवितेत पर्जन्यानुभूतीचे निखळ सौंदर्यदर्शन कवी घडवितो ः
काय देवाची करणी
अस्सा असतो पाऊस?
कधी राणीची पालखी
कधी राजाचा उरूस?
‘मी महाकवी दुःखाचा प्राचीन नदीपरि खोल| दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल’ म्हणणार्या या चिंतनशील कवीने वास्तवाच्या खडकावर स्वप्नपुष्पाचे शिल्प कोरलेले आहे. कवितेची आणि जीवनाची साधना करणार्या या प्रतिभावंत कवीला विनम्र श्रद्धांजली!