राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना अखेर राज्य मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला. त्यांचा गोविंदा होणार हे केव्हाच स्पष्ट झाले होते, फक्त तो कधी होणार एवढाच प्रश्न होता. त्यांच्या हकालपट्टीवर वरिष्ठ पातळीवरून शिक्कामोर्तब झाले असतानाच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरशी गैरवर्तनाचे नवे प्रकरण उद्भवल्याने गावडे यांची हकालपट्टी थोडी लांबणीवर गेली होती खरी, परंतु शेवटी नानाविध कारणांनी सतत वादग्रस्तच राहिलेल्या मंत्र्याची पाठराखण करणे मुख्यमंत्र्यांनाही अशक्य झाल्याने आपल्याच पक्षाच्या ह्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून वगळण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ह्या निर्णयाबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे गावडे प्रसारमाध्यमांना सांगत आहेत, ह्याचा अर्थ त्यांना राजीनामा देण्यास सांगूनही त्यांनी तो न दिल्याने त्यांची सरळसरळ हकालपट्टी करण्यात आली आहे. आदिवासी कल्याण खात्याशी संबंधित कामे घेणाऱ्या कंत्राटदारांना पाटो पणजीच्या श्रमशक्ती भवनातील खात्याच्या कार्यालयाबाहेर लाच द्यावी लागते आणि लाच देणाऱ्यांच्याच फायली पुढे सरकतात असा अत्यंत खळबळजनक आरोप गावडे यांनी केला होता. हे खाते स्वतः मुख्यमंत्र्यांपाशी असल्याने ह्या आरोपाची गंभीर दखल पक्षाला घ्यावी लागली आणि अखेर गावडे यांना नारळ दिला गेला. वास्तविक मंत्रिपदी आल्यापासून गावडे सतत वादग्रस्तच ठरत राहिले होते. गोवा कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम विनानिविदा देण्याचा निर्णय त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता, ज्याला नंतर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. नूतनीकरणाचे हे काम अत्यंत गचाळ झाल्याने कलाकारांनी त्याविरुद्ध कलाऱाखण मंचाच्या नावे आंदोलन उभारले होते. ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांना एका नाट्यप्रयोगावेळी वीजप्रवाहातील त्रुटींमुळे नाटक थांबवावे लागले असता मंत्री गावडे यांनी आपल्या मंत्रिपदाच्या गुर्मीत त्यांच्यावर सुपारी घेतल्याचा आरोप करून स्वतःचे हसे करून घेतले होते. अनुसूचित जमातींच्या उटा ह्या संघटनेच्या पाठबळावर सरकार आपले काहीही करू शकणार नाही असे गावडे यांना वाटत होते. उटाचे नेते प्रकाश वेळीप हे सतत गावडे यांच्या पाठीशी राहिले, परंतु अनुसूचित जमातीचे दुसरे प्रबळ नेते व मुख्य म्हणजे संघपरिवाराच्या संस्कारांतून पुढे आलेले रमेश तवडकर यांच्याशी एस. टी. समाजाच्या नेतृत्वाच्या विषयावरून त्यांचा प्रखर संघर्ष सुरू राहिला. त्यातच तवडकर यांनी गावडे यांच्या कला व संस्कृती खात्यावर पक्षपाताचा व भ्रष्टाचाराचा आरोप केला होता, तर तवडकर हे आपल्या प्रियोळ मतदारसंघात आपले राजकीय प्रतिस्पर्धी व मगो पक्षाचे नेते दीपक ढवळीकर यांचे हात बळकट करीत असल्याची तक्रार गावडे करीत होते. तवडकर यांच्या श्रमधाम ह्या योजनेचे काम प्रियोळमध्ये सुरू झाल्याने ते नाराज झाले होते. परंतु एवढे सगळे होत असतानाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हा विषय अत्यंत संयमाने हाताळला होता. गावडे यांना डच्चू देणे कधीही शक्य असताना ते दीर्घकाळ गावडेंसंदर्भातील प्रकरणे शांत होण्याची संधी देत राहिले. परंतु शेवटी त्यांच्याच खात्यावर टीका करण्यापर्यंत जेव्हा गावडे यांची मजल गेली, तेव्हा पाणी गळ्यापर्यंत आल्याचे मुख्यमंत्र्यांनाही कळून चुकले होते. त्यामुळे सरकारमधून गावडे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला गेला व नूतन प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांच्यामार्फत तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात आला होता. मध्यंतरी पक्षाचे केंद्रीय नेते बी. एल. संतोष कारवारला जात असताना काणकोणमध्ये थांबले तेव्हाच बहुधा गावडे यांच्या हकालपट्टीच्या निर्णयावर मोहोर उठवली गेली असावी. विश्वजित प्रकरणामुळे थोडा विलंब झाला असला तरी अखेर गावडे यांना पक्षातून बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. मंत्रिपदाचे व पर्यायाने पक्षाचे संरक्षक कवच गळून पडणे गोविंद गावडे यांच्यासाठी राजकीय भवितव्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. मुळात ते भाजपचे केडर नव्हेत. अपक्ष म्हणून ते प्रियोळ मतदारसंघातून 2017 च्या निवडणुकीत निवडून आले व पुढे भाजपवासी झाले. मागील निवडणूक त्यांनी भाजपच्या तिकिटावर परंतु मोजक्या मताधिक्क्याने जिंकली होती. प्रियोळ हा सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा दावा असलेला मतदारसंघ. खुद्द त्या पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना तेथे स्वारस्य आहे. त्यामुळे आता गावडे यांना पुढील निवडणुकीत भाजपचे समर्थन तेथे लाभणार की नाही हा प्रश्न आहे. गावडे यांच्या जागी कोणाला मंत्रिमंडळात घेतले जाणार हाही प्रश्न आहे. एस. टी. समाजालाच मंत्रिपद द्यायचे झाले तर रमेश तवडकर यांना सभापतिपदावरून मंत्रिपदी आणावे लागले. मग सभापतीपदावर विश्वासू नेत्याची वर्णी लावावी लागेल. तवडकर यांची प्रतिमा केंद्रीय पातळीवरही उजळ आहे. त्यामुळे भविष्यात ते मुख्यमंत्री सावंत यांच्यासाठी सुद्धा प्रतिस्पर्धी ठरू शकतात हेही ओघाने आलेच.