आल्तिन्हो-पणजी येथे 2021 मध्ये राज्यातील अंगणवाडी शिक्षिकांनी आपल्या आंदोलनादरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या धरणे आंदोलनात तेथील पोलिसांनाी धक्काबुक्की करून हिंसा केल्याप्रकरणी ज्या आरोपींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता, त्या सर्व आरोपींची काल प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांना या आंदोलनात सहभागी झालेल्या संबंधित एकाही व्यक्तिविरोधात स्वतंत्रपणेसबळ असा कोणताही पुरावा उपलब्ध सादर करण्यात यश आले नाही. तसेच एका पोलीस अधिकाऱ्याच्या हाताचा चावा घेतल्याच्या जखमेचा वैद्यकीय अहवाल सादर करण्यात आलेला नाही. असे न्यायालयाने स्पष्ट केले. मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायाधीश मनीषा पारकर नार्वेकर यांनी हा निकाल दिला.
दि. 29 डिसेंबर 2021 रोजी अंगणवाडी शिक्षिकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. यावेळी या आंदोलनात सहभागी झालेल्या जनार्दन भंडारी, वरद म्हार्दोळकर, साईश आरोसकर, व्यास चोडणकर, दुर्गादास कामत, महेश म्हांबरे, उद्देश नाईक देसाई, रुनल केरकर, हृदयनाथ शिरोडकर, विकास भगत यांची पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सुटका केली. आल्तिनो येथे मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर राज्यातील अंगणवाणी सेविकांनी बेकायदेशीर सभा घेतल्याचा आणि परवानगीशिवाय निदर्शने करून पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा व पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला होता.
पगारवाढ व निवृत्ती वेतन व अन्य काही मागण्यांसाठी अंगणवाडी शिक्षिकांनी हे आदंलोन केले होते. या प्रकरणी संशयितांच्या वतीने ज्येष्ठ वकील कार्लुस फेरेरा यांनी बाजू मांडली.