पणजी (प्रतिनिधी)
राज्यातील भाजप आघाडी सरकारच्या नेतृत्व बदलासंबंधीच्या विषयावर चर्चेसाठी भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी बोलावलेली बैठक काही कारणास्तव होऊ शकली नाही. सदर बैठक आज गुरूवारी घेतली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणामुळे नवीन नेता निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपकडून नेतेपदासाठी केडरमधील व्यक्ती की केडर बाहेरील व्यक्तीची निवड केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नेतेपदासाठी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी कॉंग्रेसच्या दोन आमदारांना फोडून आपले वजन वाढविलेले आहे.
भाजप आघाडी सरकारच्या नेतृत्व बदलाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी बुधवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी ज्येष्ठ मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई दिल्लीला दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी भाजपचे आमदार तथा आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे सुध्दा दिल्लीत तळ ठोकून आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या मगो आणि गोवा फॉरवर्ड या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नेतेपदाबाबत अंतिम निर्णय घेणार आहेत, अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली. दरम्यान, ज्येष्ठ मंत्री ढवळीकर यांनी काल दुपारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दोनापावल येथील निवासस्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.