भाजप गाभा समिती बैठकीत खडाजंगी

0
83

पणजी (प्रतिनिधी)
कॉंग्रेसच्या दोन माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर भाजप मुख्यालयात काल घेण्यात आलेली भाजपच्या गाभा समितीची बैठक बरीच वादळी ठरली. कॉंग्रेसचे मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आल्याने भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी बैठकीत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली येथे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कॉंग्रेसच्या दोन माजी आमदारांना प्रवेश देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी गाभा समितीची बैठक काल संध्याकाळी घेण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी आमदार दामू नाईक व इतरांची उपस्थिती होती.
या बैठकीत कॉंग्रेसच्या दोन माजी आमदारांच्या भाजप प्रवेशावरून माजी मुख्यमंत्री पार्सेकर व इतरांनी विविध प्रश्‍नांचा भडिमार करून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी कॉंग्रेसच्या माजी आमदारांना प्रवेश देण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतल्याचे प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.
गाभा समितीच्या बैठकीबाबत प्रसिद्धी माध्यमाशी जाहीरपणे बोलणे रास्त नाही, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कॉंग्रेसच्या माजी आमदारांना भाजपमध्ये देण्यात आलेला प्रवेश योग्य आहे की नाही? हे आगामी काळच ठरविणार आहे, असेही पार्सेकर यांनी सांगितले.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ज्या आमदारांची मतदारांशी वागण्याची पद्धत चांगली नव्हती, त्यांना जनतेने त्यांची जागा दाखविली, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी व्यक्त केली. कॉंग्रेसच्या दोन आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात आलेला नाही. भाजप पक्ष बळकट करण्यासाठी दोघांना प्रवेश देण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेतली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.