- रमेश सावईकर
आज माणूस सुखा-समाधानाच्या शोधात आहे. पण त्याला ते गवसत नाही. कारण माणसामध्ये त्याचा जो ‘आत्मा’ निवास करून आहे तो परमेश्वराचाच एक अंश आहे. सत्त्व-गुणसंपन्न असं आचरण करीत आपण सात्त्विक कर्मे केली तरच तो आत्मा समाधानी राहील आणि आपल्याला आत्मिक समाधान लाभेल.
आज माणूस सुखा-समाधानाच्या शोधात आहे. पण त्याला ते गवसत नाही. कारण माणसामध्ये त्याचा जो ‘आत्मा’ निवास करून आहे तो परमेश्वराचाच एक अंश आहे. सत्त्व-गुणसंपन्न असं आचरण करीत आपण सात्त्विक कर्मे केली तरच तो आत्मा समाधानी राहील आणि आपल्याला आत्मिक समाधान लाभेल.
जीवन जगायचं कसं? असा प्रश्न माणसाला पडतो. जगणं कठीण झालंय असा समज तो करून घेतो आणि परिस्थितीला दोष देत बसतो. प्राप्त परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा या विचाराने तो हतबल होऊन जातो. परिणामी निराशा घेऊन जगण्यात काही अर्थ नाही, असं त्याला वाटतं. असं सर्रासपणे घडतं. का? तर त्याचं उत्तर सोपं आहे.
परमेश्वरानं आपणाला माणसाचा जन्म दिलाय, त्यामुळे आपण भाग्यवान आहोत हे पहिल्यांदा त्याने जाणून घ्यायला हवं. जे जीवन आपण जगतो ते अर्थपूर्ण व्हायला हवे. त्याकरिता या जीवनावर अधिकाधिक प्रेम माणसानं करायला हवं. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असं कवी म्हणतो. जीवन कशासाठी आहे आणि कोणत्या पद्धतीने ते जगलं तर अर्थपूर्ण बनेल याचा विचार करण्यात आपण कमी पडता कामा नये. त्यात आपण कमी पडलो की जीवन अर्थशून्य वाटू लागतं. शून्यातूनच अर्थ काढून ते अर्थपूर्ण बनविणं ही आपली कसोटी असते.
जीवनाविषयी आपण कोणत्या तऱ्हेने विचार करतो हे महत्त्वाचे. सकारात्मक विचारप्रणाली असली तर जीवन हे सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे आणि त्यावर अधिकाधिक प्रेम करून ते अर्थपूर्ण झाले पाहिजे म्हणून धडपडणे, प्रयत्न करणे गरजेचे आहे हे आपणाला पटतं आणि त्यानुसार आपली कृती असते.
कुटुंबाबाबत विचार करताना आणि त्याच्या सदस्याची चौकशी करताना पूर्वीच्या काळी प्रश्न विचारला जायचा, ‘कसा आहेस? सुखी-समाधानी आहेस ना?’ ‘हो, खाऊन-पिऊन सुखी आहे, समाधानी आहे’ असं उत्तर ऐकायला मिळायचं. त्याचं कारण असं की माणसाला त्यावेळी परिस्थितीनुसार जे मिळायचं त्यात तो समाधानी असायचा. त्यामुळे आपण सुखी आहे याच कल्पनेत तो वावरायचा. जेवढं आवश्यक आहे तेवढं आपणाला मिळतं आहे ना? बस्स झालं! म्हणून आपलं मन सतेज, आनंदात ठेवायचं. त्यामुळे दुःख झालं, संकटाचा सामना करावा लागला तरी तो डगमगत नव्हता. खंबीरपणे प्राप्त परिस्थितीला तोंड देत हेही दिवस निघून जातील अशी मनाची समजूत घालून संकटकाळी हार मानत नसे. परिस्थितीपुढे गुडघे टेकता कामा नये. प्रयत्न करीत राहणे आपल्या हाती आहे असं ठरवून वागावं म्हणजे सुख आपोआप आपल्या दारी येतं.
माणसाला मोह झाला की त्याच्या मनात स्वार्थ निर्माण होतो. स्वार्थाने आपल्या मनात शिरकाव केला की मनावरती त्याचंच राज्य येतं, त्याचीच हुकूमत चालते आणि माणसाची ‘हांव’ वाढते. अपेक्षा ठेवते. आपण मोठमोठी स्वप्ने तो पाहू लागतो. आणि जीवनात संपत्ती निर्माण करण्याकरिता दिन-रात्र धडपड करतो. निवांतपणे श्वास घ्यायलाही त्याला उसंत नसते. त्यात त्याला यशही लाभतं. केवढं मोठं ऐश्वर्य आपणाला लाभलं. लक्ष्मी आपल्या चरणी सेवा करते अशा भ्रमात तो माणूस वावरू लागतो. मनाशी बाळगलेली एक-एक स्वप्ने पुरी होतात, तशी आणखी नवीन स्वप्ने त्याच्या मनात पिंगा घालतात. मी सुखी आहे, परंतु आणखी सुख मला हवंय म्हणून सुखाचा पाठलाग करीत राहतो. जणू त्याची नि सुखाची स्पर्धाच चालते. त्यामुळे कितीही सुखे लाभली तरी तो समाधानी नसतो. त्याचं मन शांत नसतं.
अशी माणसे पाहिली की ‘सुखी माणसाचा सदरा’ या गोष्टीची आठवण होते. ऐश्वर्य, श्रीमंती, सोयी-सुबत्ता मिळाल्या म्हणून माणूस सुखी असतोच असे नाही. अशा माणसाला पाहणाऱ्या दुसऱ्या माणसाला म्हणजे इतरांना तो सुखी आहे, समाधानी जीवन जगतो आहे असं वाटत असतं. त्याच्यासारखी परिस्थिती आपणालाही लाभली तर आपणही आणखी सुखी होऊ असं त्याला वाटतं.
पण तसं नसतं. जो कष्ट करतो, मेहनत करतो, त्यातून जे मिळतं त्यावरती समाधान मानून जो राहतो तोच खरा सुखी जीवन जगू शकतो. मेहनत करीत राहणे आपल्या हाती आहे, बाकी सगळं परमेश्वराच्या कृपेवर अशी त्या कष्टकरीची दृढ श्रद्धा असते. म्हणून तो देवाची भक्ती करणे गरजेचं मानून त्याची आराधना करतो. त्यात त्याला समाधान लाभतं आणि तो आनंदी असतो. पूर्वीच्या काळी माणसाला खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी निवारा आणि चरितार्थ चालविण्यापुरता पैसा मिळाला की त्यात तो समाधानी असायचा.
मातीच्या भिंतींची कौलारू घरं. घरच्या जमिनीदेखील मातीच्या. त्या भिंतीना मायेची ऊब असायची. कौलारू घर असल्यामुळं घरात ऊन असायचं, वारा असायचा. त्यामुळे ऋतुमानानुसार होणारे बदलही जाणवायचे. पावसाच्या दिवसांत घराची कौलारू छप्परे उदार व्हायची अन् अंगणी पागोळ्या यायच्या. उन्हाळ्यात उष्णता असूनही हळूच वाऱ्याची मंद झुळूक आली तरी ती घरात प्रवेश करायची. निसर्ग हाच आपला खरा मित्र मानून माणूस निसर्गाच्या सान्निध्यात राहायचा. निसर्गावर प्रेम करीत नैसर्गिक भू-जल, वनसंपत्तीचे संवर्धन करायचा. अशा प्रकारचं जीवन जगण्याची संधी मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानं लाभली म्हणून देवाचे उपकार मानून जीवनात सुखात राहायचा.
आज आपण पाहतो की परिस्थिती पूर्णपणे बदलत चालली आहे. माणूस निसर्गावर मात करू पाहत आहे पण त्याला ते जमत नाही. भू-संपत्ती, जलसंपत्ती नि वनसंपत्ती नष्ट झाली तरी चालेल, स्वसंपत्तीत वाढ कशी होईल याचसाठी त्याची दिवसरात्र धडपड चालू आहे. त्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाऊन वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी आहे. ऐश्वर्य, संपत्ती, सुविधा यांची उपलब्धी असूनही माणूस सुखी नाही. याचं कारण म्हणजे, सुख ही कल्पना आहे. त्यामुळे सुख मानण्यावर अवलंबून आहे. आज आपण ज्या सुखाच्या पाठीमागे धावतो ते भौतिक सुख आहे. त्यामुळे माणसाला आज मानसिक सुख लाभत नाही.
मनाला शांती कुठे मिळेल? हा प्रश्न माणसाला आज भेडसावतो आहे. शांती लाभावी म्हणून मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतो आहे. तिथं थोडा वेळ बसतो आणि घरी परततो. पण घरी आल्यावर पुनश्च कौटुंबिक जीवनाबाबत विचार करीत बसतो. बेचैन होतो आणि प्राप्त झालेलं समाधान हरवतो.
माणसाला समाधान हवं असेल तर त्यानं भौतिक सुखाचं खूळ मनातून काढून टाकायला हवं. मानसिक सुख लाभण्यासाठी आपल्यामध्ये जो ‘मी’ म्हणजे ‘आत्मा’ आहे, त्याचा विचार करायला हवा. आपली जीवनशैली, आपली कर्मे, आचरण हे किती शुद्ध आहे याचा विचार करायला हवा. आपला ‘आत्मा’ ज्यावेळी प्रसन्न ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल, त्यावेळी तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. हे समाधान जोपर्यंत लाभत नाही तोपर्यंत आपण सुख प्राप्त करू शकणार नाही.
आज माणूस सुखा-समाधानाच्या शोधात आहे. पण त्याला ते गवसत नाही. कारण माणसामध्ये त्याचा जो ‘आत्मा’ निवास करून आहे तो परमेश्वराचाच एक अंश आहे. म्हणून त्याला महत्त्व अधिक आहे. सत्त्व-गुणसंपन्न असं आचरण करीत आपण सात्त्विक कर्मे केली तरच तो आत्मा समाधानी राहील आणि आपल्याला आत्मिक समाधान लाभेल.