‘राज’कीय वादळ!

0
138

महाराष्ट्रात सध्या एक मोठे राजकीय वादळ घोंगावते आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे करीत सध्या ते मुंबईत आणि तेथून नवी मुंबईत पोहोचले आहे. हे वादळ आहे राज ठाकरे यांच्या सभांनी निर्माण केलेले. त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उभा नाही, परंतु तरीही केवळ नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करीत राज ठाकरे यांच्या ह्या सभा सुरू आहेत आणि त्यामधून ते मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळावर भाजपला अडचणीचे ठरू शकणारे प्रश्न उपस्थित करीत आहेत, पूरक व्हिडिओ क्लीप दाखवत आहेत आणि या ‘लाव रे तो व्हिडिओ’चा धुमाकूळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात चालला आहे. आज मोदी – शहांच्या विरोधात देशात सर्वांत घणाघाती आवाज कोणाचा असेल तर तो राज ठाकरे यांचा आहे. हेच राज २०११ मध्ये गुजरातचा दौरा करून आले होते आणि मोदींच्या कारभाराचे कौतुक करीत होते. देशाप्रमाणेच आपल्याही मोदींकडून अपेक्षा होत्या, परंतु माणूस बदलला म्हणून आपली भूमिका बदलली असे आजच्या आपल्या बदललेल्या भूमिकेबाबत राज यांचे म्हणणे आहे. राज हे उत्तम वक्ते आहेत, त्यामुळे त्यांच्या सभा नेहमीच गर्दी खेचतात. त्यामुळे त्यांच्या सभांचे सत्र सुरू झाले, तेव्हा भाजपाने सुरवातीला राज हे केवळ एंटरटेनर आहेत म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती, परंतु जसजशा सभा होत गेल्या, त्यांचे मराठी वृत्तवाहिन्यांवरून अगदी प्राइम टाइमला प्रक्षेपण होत गेले, तसतसे त्यांच्या जनमानसावर होणार्‍या परिणामाचे गांभीर्य भाजपला उमगले असावे. त्यामुळे आता राज यांना त्यांच्याच ‘स्मार्ट’ शैलीत प्रत्युत्तराची घोषणा भाजपाने केली आहे. राज उपस्थित करीत असलेले प्रश्न मराठी माणसांच्या घरोघरी पोहोचत आहेत आणि मोदी सरकारच्या कार्यकाळाची नकारात्मक बाजूच जनतेसमोर ठेवत आहेत. राज यांच्या आजवर झालेल्या सभांचे विश्लेषण केले तर असे दिसते की आपल्या या सभांमागील त्यांचे लक्ष्य अगदी पक्के आहे. ते आहेत केवळ मोदी आणि अमित शहा. भाषणाचा रोख किंचितही अन्यत्र वळणार नाही याची पूर्ण खबरदारी राज घेत असल्याचे दिसते. त्यामुळे आपल्यावरील टीकेकडेही त्यांनी तूर्त दुर्लक्ष केलेले आहे. स्वतःचे उमेदवार नसताना राज यांनी चालवलेल्या या आक्रमक प्रचारामुळे राज यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बेगानी शादीमें अब्दुल्ला दिवाना’ अशी खिल्ली उडवली, परंतु त्यालाही त्यांनी सभेत प्रत्युत्तर देणे टाळले. मोदी सरकारने केलेल्या मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत, उज्ज्वला योजना वगैरेंच्या फलनिष्पत्तीबाबत राज प्रश्न विचारत आहेत, पुलवामा आणि बालाकोटच्या कारवाईवर शंका घेत आहेत, जीएसटी व नोटबंदीचे अपयश, रोजगारनिर्मितीतील अपयश, आरबीआय, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयावरील सरकारी नियंत्रणाचे प्रयत्न वगैरे वगैरेंवर बोचरे प्रश्न विचारत आहेत. या प्रश्नांची उत्तरे मोदींनी द्यावीत असे आव्हान देत आहेत. राज यांनी कॉंग्रेस – राष्ट्रवादीची सुपारी घेतली असल्याचे प्रत्युत्तर भाजपाने दिले असले, तरी देखील ते विचारत असलेल्या प्रश्नांमुळे जनमानस विचलित होण्याची शक्यता आहे हे विसरून चालणार नाही. मोदी – शहा परत येतील अशा उमेदवारांना मते देऊ नका म्हणणारे राज ठाकरे पर्याय काय हे मात्र सांगत नाहीत. राज यांच्या या प्रचारसत्रामागे कॉंग्रेस – राष्ट्रवादी आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत सामील करून घेतले जाईल असे भाजपाचे म्हणणे आहे. काही असो, परंतु या झंझावाती सभांमुळे राज ठाकरे यांचे नाव गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे एवढे निश्‍चित. शिवसेनेतून २००६ साली वेगळे होऊन राज यांनी मनसेचा संसार मांडला. सुरवातीला मुंबई, पुणे, नाशिकच्या महापालिकांत यश मिळवले, २००९ च्या निवडणुकीत विधानसभेतही १३ आमदार आले, २०१२ च्या महापालिका निवडणुकांतही घवघवीत यश मिळवले, परंतु २०१४ च्या मोदी लाटेत राज आणि त्यांच्या मनसेचा साफ सफाया झाला, त्यातून तो पक्ष अजूनही सावरू शकलेला नाही. निवडून आलेले सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत, विधानसभेत एकच आमदार निवडून आला, तोही पक्ष सोडून गेला आहे. मोदी लाटेने २०१४ नंतर अशी दाणादाण उडवल्याने मनसेसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्यातूनच आपली ही विरोधी भूमिका राज मांडू लागले असावेत. या आक्रमक प्रचारातून भविष्यात मनसेला नवसंजीवनी लाभेल की नाही, विरोधक त्यांना आपल्या गोटात घेतील की नाही, हा वेगळा भाग, परंतु सध्याच्या निवडणुकांत राज यांच्या या लक्ष्यभेदी प्रचाराचा भाजपावर महाराष्ट्रात आणि अन्यत्र किती परिणाम होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे आणि येत्या २३ मे रोजी ते दिसणार आहे. राज यांचे या निवडणुकीत उमेदवारच नाहीत, त्यामुळे त्यांचे स्वतःचे काही नुकसान संभवत नाही, परंतु ज्यांच्यावर त्यांचे अत्यंत टोकदार शरसंधान चालले आहे, त्यांचे ते खरोखरच कितपत नुकसान करू शकतात ते पाहावे लागेल!