– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा
उत्तरार्ध
४. पुष्कळ वेळा आपण ऐकतो व वाचतो की, पेट्रोल व डिझेलचा जगभरातील साठा दिवसेंदिवस संपुष्टात येत चालला आहे. त्यामुळे भविष्यात लोकांना त्याचा पुष्कळ त्रास होऊ शकतो, पण प्रत्यक्षात बघता या पदार्थांचा योग्य व नियंत्रित वापर करण्याबाबत काहीच जनजागृती केली जात नाही. वेळोवेळी होणार्या कार रॅलीज व मोटारसायकल स्पर्धा या कुठल्या इंधन बचतीचा संकल्प करतात?
५. आपल्या सणांमुळे व अन्य धार्मिक कार्यामुळे पर्यावरणाची किती हानी व अन्नाची नासाडी होते याचा कोणी विचार केला आहे का? सणासाठी पुजल्या जाणार्या अगणित मूर्तींचे विसर्जन करून आपण नद्यानाल्यांचे प्रदूषण करीत नाही का? देवाला वाहिलेली फुले दुसर्या दिवशी सरळ नदीत वा विहिरीत टाकल्याने प्रदूषण होत नाही का? सणांमध्ये खर्चिक असे फटाके वाजवून आपण ध्वनीप्रदूषण, धुरामुळे वातावरणाचे प्रदूषण व विनाकारण काही क्षणांसाठी पैशांचा प्रचंड चुराडा करीत नाही का? तेव्हा आपल्या धर्माच्या विविध पंडितांच्या व धर्मगुरूंच्या उपस्थितीत यावर काही तोडगा काढला का जाऊ नये? आजही पुरोगामी विचारांचे काही लोक एका पाण्याच्या लहान पिंपात किंवा पाणी भरलेल्या खड्ड्यात मूर्तींचे प्रतिकात्मक विसर्जन करून पर्यावरण जतनासाठी लावतात, पण हे सर्व मोठ्या प्रमाणात होण्याची गरज आहे.
लघुरूद्र, महारूद्र, शांती, होम करतानाही दुधाची, तुपाची, अन्य खाद्यपदार्थांची किती नासाडी होते यावर कोणी विचारही करीत नाही. प्रबोधनाची बातच सोडा. होळीच्या सणात व अन्य होमहवनांत नारळाची आहुती देण्याची प्रथा आहे. या महागाईच्या दिवसांत पुष्कळ लोकांना एका वेळच्या अन्नाची भ्रांत लागून राहिलेली असते, पण हे खाद्यपदार्थ गोरगरीबांना किंवा गरजूंना दान म्हणून न देता ते आगीच्या भक्ष्यस्थानी टाकण्यात धन्यता मानली जाते.
माझ्या घराच्या शेजारच्या मंदिरात एकदा महारूद्र साजरा केला जात होता. कार्याला पुष्कळ लोकांची गर्दी होती व लोकांची ये – जा चालू होती. प्रत्येकजण घरून एक मोठा नारळ घेऊन येत होता व तो होमकुंडात टाकत होता. हा प्रकार पाहून माझ्या मनात विचार आला की, जर देवस्थानच्या अध्यक्षाने सर्व नागरिकांच्या वतीने एकच मोठ्यातला मोठा नारळ होमकुंडात अर्पण केला असता व बाकीचे नारळ जमा करून ते गोरगरिबांना वाटून टाकले असते तर! हा विषय जेव्हा मी देवस्थानच्या अध्यक्षांपाशी व्यक्त केला, तेव्हा लोकांच्या भावनांचा विचार करता ते शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले व मलाही या सार्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला.
पण मला प्रामाणिकपणे वाटते की या माझ्या सूचनांचा सुज्ञपणे विचार व्हावा.
हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे पुष्कळ वेळा आपण पर्यावरण जतनाबद्दल बोलतो, पण प्रत्यक्षात ते जपण्यासाठी काहीही ठोस उपाययोजना करीत नाही, किंबहुना आपण बोलण्याच्या अगदी विरुद्ध वागतो. या गोष्टींचा सारासार विचार करून आपण खरोखरच पर्यावरण जतनासाठी कटिबद्ध आहोत हे सिद्ध करून दाखवावे.