– डॉ. राजीव कामत, खोर्ली – म्हापसा
पूर्वार्ध
आज काल आपण सर्वजण जागतिक पर्यावरणाबद्दल भरपूर बोलत असतो. एकीकडे पर्यावरण जतनाबद्दल आस्था दाखवायची, त्यासाठी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलांत परिसंवादाचे आयोजन करायचे. कोपनहेगनमध्ये जागतिक पर्यावरण व्यासपीठ भरवायचे, पण हे करताना स्वतः मात्र पर्यावरण जपण्यासाठी काहीही ठोस करायचे नाही, कोणतेही ठोस उपाय आचरायचे नाहीत.
बेसुमार जंगलतोड, खनिज मिळवण्यासाठी कायदेशीर व बहुतेक वेळा बेकायदेशीर खाणींतून अनिर्बंध उत्खनन, प्लास्टिकचा अमर्याद वापर, इंधन वापराबद्दल व ते वाचवण्याबद्दल सतत उपदेश, वीज कशी वाचवावी यावर दूरचित्रवाणीवरून जाहिरातींचा मारा, या सार्या गोष्टी आपण रोज पाहतो, ऐकतो व सोडूनही देतो.
दुसरा रोज चघळण्याचा विषय म्हणजे गरिबीमुळे, भारतात कुपोषणामुळे किती बालके दगावतात, किती लोक दररोज अर्धपोटी झोपतात, किती लोक पुरेसे अन्न न मिळाल्यामुळे हलाखीत दिवस ढकलतात वगैरे वगैरे. पण हे सर्व करताना आपण काही प्रतिबंधात्मक उपाययोजना योजून या गोष्टींवर काही प्रमाणात निर्बंध आणू शकतो यावर कोणी विचार केला आहे का?
उदाहरणादाखल पुढील गोष्टींवर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे –
१. आजकाल आपण ग्लोबल वॉर्मिंगवर तावातावाने बोलतो, पण या विषयावरच्या सर्व परिषदा कोठे होतात? एक तर एखाद्या पंचतारांकित हॉटेलात किंवा एखाद्या वातानुकूलित सभागृहात. या परिसंवादात भाग घेणार्या सभासदांच्या सुखसोयींसाठी असंख्य वातानुकूलित यंत्रे दिवसरात्र चालू असतात. एखाद्या वातानुकूलित यंत्राच्या बाहेरच्या भागात दहा मिनिटे उभे राहून बघा. आतील लोकांना थंडावा देण्यासाठी बाहेर अक्षरशः गरम हवा वातावरणात सोडली जाते. जगभर चालू असलेल्या वातानुकूलित यंत्रामुळे वातावरणाच्या तापमानात किती वाढ होत असेल याची कोणी कल्पना केली आहे का? ही यंत्रे बहुतेकवेळा गरज नसतानाही चालू असतात. तेव्हा त्या यंत्रांचा योग्य तो वापर व्हावा. गैरवापर नव्हे.
२. हिंदूंच्या रिवाजाप्रमाणे माणूस मेल्यावर त्याचे दहन केले जाते. या दहनाला लाकडांची सोय अनिवार्य ठरते. म्हणजे त्यासाठी झाडे कापावी लागतात. म्हणजे पर्यायाने जंगलतोड ही झालीच. आजकाल पुष्कळ महानगरांत विद्युतदाहिनीचा वापर सुरू झाला आहे. जरी त्यात वीजवापर आला, तरी ते सयुक्तिक ठरते. गोव्यातही अशा विद्युतवाहिन्या उभारण्याची गरज आहे, पण पारंपरिक रूढीमुळे लोक सरणावर दहन करायलाच पसंती देतात. तेव्हा या विषयावर लोकप्रबोधनाची गरज वाटते, पण आजकाल चित्रपटामध्ये किंवा एखाद्या टीव्ही मालिकेमध्ये पुष्कळदा अंत्यविधीचा भाग दाखवला जातो व ते जास्त वास्तववादी करण्यासाठी दहनाचे दृश्यही दाखवले जाते. याची खरोखर गरज आहे का? सरणावर कुठलेही कलेवर नसताना हे दहनाचे दृश्य दाखवणे आपले निर्माते टाळू शकत नाहीत?
३. आजकाल सर्वत्र रात्रीचे सामने भरवण्याची टूमच निघाली आहे. याची झलक आपल्याला छोट्या छोट्या शहरांतही दिसून येते. इतका मुबलक सूर्यप्रकाश लाभलेला असताना ही रात्रीचे प्रकाशझोतातील सामने भरवण्याची आपल्याकडे खरोखर गरज आहे का? क्रिकेटच्या दिवसरात्र सामन्यात एक संघ दिवसा, तर दुसरा रात्रीचा खेळतो. यामुळे दोन्ही संघांना वेगवेगळ्या वातावरणाचा सामना करावा लागतो. दुसरे म्हणजे आजकाल सर्वत्र निऑन लाईटस्चे साईनबोर्ड रात्रंदिवस झळकताना दिसतात. या सामन्यावर व निऑन साईनबोर्डस्वर विजेचा किती गैरवापर होतो याचा विचार होऊन त्यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.