भूकंपाचा सर्वाधिक तडाखा सिक्किमला बसला आहे. ईशान्येतील अन्य राज्यांनाही फटका बसला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान तसेच पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, झारखंड, चंदीगढ या राज्यांतही हादरे जाणवले व नुकसान झाले. मृतांमध्ये सर्वाधिक सात सिक्कीममधील, चार पश्चिम बंगालमधील, दोन बिहारमधील आहे. नेपाळमध्ये पाच जण मरण पावलले. अनेक जण ठिकठिकाणी जखमी झाल्याचे वृत्त असून सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर लोक अडकून पडले असल्याचे वृत्त होते.
काल संध्याकाळी ६.११ वा., ६.२१ वा. आणि ६.४२ वा. काही वेळाच्या अंतराने भूकंपाचे धक्के जाणवले.
सिक्कीममधील दळणवळण यंत्रणा भूकंपानंतर ठप्प झाल्याने नुकसानाचा नेमका अंदाज यायला उशीर लागणार आहे. तेथील रस्ते कोसल्याने रसद पुरविण्याचा मार्गही बंद झाला आहे. तो मोकळा करण्यासाठी लष्करास पाचारण करण्यात आले आहे. सिक्कीममध्ये इमारती कोसळल्या असून अनेक ठिकाणी लोक अडकून पडले असल्याची शक्यता आहे. घरे, इमारतींना हादरे बसू लागल्यानंतर लोक घरांतून बाहेर पडून रस्त्यांवर जमा झाले होते. दरम्यान, बिहारमध्ये राजधानी पटना आणि कटियार भागांत इमारती कोसळल्याचे वृत्त होते. बंगालमध्येही अनेकजण जखमी झाले. राज्याच्या उत्तरेकडील भागांत भूकंपानंतर वीजपुरवठा ठप्प झाला होता. झारखंडमध्ये लोकांनी दिलेल्या माहितीनुसार टेबल, खुर्च्या हलू लागल्या होत्या. दिल्लीमध्ये दि. ७ रोजी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. कालही या भागांत भूकंपाचे हादरे बसले. भूकंपाचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्याशी संपर्क साधून सर्व ती मदत देण्याचे आश्वासन दिले.
भूकंपप्रवण भाग
हा भूकंपप्रवण भाग असून, १८९७ साली या भागात झालेल्या भूकंपात दीड हजाराहून अधिक लोकांचे बळी गेले होते. अलिकडेच हरयाणातील सोनेपत जिल्ह्यात रिश्टर स्केलवर ४.२ क्षमतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी दिल्लीलाही भूकंपाचे धक्के जाणवले होते.