Home बातम्या दिला धोका ओहोटीने

दिला धोका ओहोटीने

0

कृष्णा महादेव शेटकर

१९५६ सालातील एप्रिल महिना. आयएनएस तीर नेव्हल कॅडेट ट्रेनिंग शीप पूर्वेकडील देशांच्या सदिच्छा भेटीवर असताना दहा दिवसांकरिता इंडोनेशियामधील जकार्ता बंदरात होते. तिथल्या वास्तव्यात माझा मित्र रीतपालसिंग राठोड अकस्मात आजारी पडल्यामुळे त्याला जकार्तामधील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. तिथेच त्या हॉस्पिटलमध्ये रीतपालच्या शेजारच्या कॉटवर एक फ्रेंच नौसैनिक होता. रीतपालला संध्याकाळी माझे भेटायला जाणे व्हायचे. तो फ्रेंच नौसैनिक कॉटवर बसून डायरीत काहीतरी लिहीत असताना मी सहज त्याला विचारले, ‘‘कसा आहेस तू?’’ जवळच तिथे एक इंडोनेशियन नर्स उभी होती. तीच म्हणाली, ‘‘हा फ्रेंच नौसैनिक जकार्ता बंदराच्या बाहेर एका राफ्टवर बेशुद्धावस्थेत असताना आमच्या कोळ्यांना मिळाला. त्या कोळ्यानेच त्याला इथे ऍडमिट केले. तीस दिवस तो भर समुद्रात तराफ्यावर होता. कोलंबो ते जकार्तापर्यंत येण्यास त्याला तीस दिवस लागले. तो त्या तीस दिवसांची डायरी लिहीत आहे.’’

नर्सने थोडक्यात सांगितलेली त्याची ती रोमांचकारी घटना ऐकून माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. त्या फ्रेंच नौसैनिकाला थोड्याफार प्रमाणात इंग्रजी बोलता येत होते. त्याची ती डायरी मी हातात घेतली. त्याने फ्रेंच भाषेत खूप काही लिहिले होते. त्याने जे काही लिहिले ते थोडक्यात मला सांग असे मी म्हटल्यावर मोडक्यातोडक्या इंग्रजीमध्ये त्याने सांगण्यास सुरुवात केली ः

फ्रान्सच्या दक्षिणेला असलेल्या मार्सेलीस बंदरातील नेपोलियन बोनापार्ट या क्रूझरने संध्याकाळी पाच वाजता नांगर उचलला होता. माझी लुकआउटची ट्युटी संध्याकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत होती. मार्सेलीस बंदरात अनेक लढाऊ जहाजे नांगरावर उभी होती. त्या सर्वांना पारंपरिक पद्धतीने सलामी देत व घेत जहाजाने भूमध्य समुद्रातून आपला पुढील प्रवास सुरू केला. माझा जहाजावरील हा प्रवास पहिलाच होता. ट्रेनिंगच्या काळात पाच-सहा दिवसांसाठी सी-ट्रेनिंगकरिता आमच्या बॅचला ओपन सीमध्ये नेले होते. ट्रेनिंग संपल्यानंतर महिन्यापूर्वीच माझी ट्रान्स्फर नेपोलियन बोनापार्टवर झाली होती. एक महिना डॉकमध्येच होतो. तेव्हाच कळले होते की, काही दिवसांत जहाज लांबच्या क्रूझवर जाणार आहे. कुठे जाणार ते माहीत नव्हते; पण पूर्वेकडच्या देशांकडे जाणार असे जुन्या नैसैनिकांकडून कळले होते.

ता. २५-४-१९५६. संध्याकाळच्या पाचच्या सुमारास नेपोलियन बोनापार्ट दूरच्या क्रूझवर जाण्याकरिता जेटीवरील आपल्या पुढील व पाठीमागच्या दोर्‍या सोडून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना जेनी माझी मैत्रीण जेटीवर उभी असलेली दिसली. तिचे डोळे मला शोधीत होते. बहुतेक मी तिला दिसलो नव्हतो. जेव्हा तिने मला पाहिले तेव्हा ती हात हलवून मला निरोप देत होती. मधूनमधून फ्लाईंग किस पण देत होती.

जहाज हळूहळू जेटीपासून दूर होत होते. मी जहाजाच्या डेकवर उभा राहून त्यांच्याकडे पाहत होतो. जेटीवर बहुतेकांचे आईवडील व मैत्रिणी पण आल्या होत्या. माझे डॅडी व मम्मी व दोन बहिणी पण जेटीवर मला निरोप देण्याकरिता आल्या होत्या. हळूहळू नेपोलियन बोनापार्ट क्रुझर दूर होत होते.

सहा वाजून गेले होते. जहाजाने आपली गती वाढवली होती. माझी लूकआउटची ट्युटी आठ वाजेपर्यंत होती. डोळ्यांवर बायनाकुलर लावून मी बाहेरचे दृश्य पाहत होतो. सूर्य मावळताना आकाश अनेक रंगांनी रंगवलेले दिसत होते. सूर्य पूर्ण पाण्यात जाताच हळूहळू संधिप्रकाश लुप्त होत होता. कुठेतरी दूर एक दीपगृह आपल्या प्रकाशाचा झोत बाहेर फेकत होता. बायनाकुलरमधून बाहेरचे दृश्य पाहत असताना जेनीचा चेहरा माझ्या नजरेसमोर येत होता. खूप काही तिच्याकरिता मी परदेशातून आणावे असे तिने आग्रहाने सांगितले होते.

आठ वाजता लुकआउटची ट्युटी संपल्यानंतर दुसर्‍या वॉचमधील लुकआउटला बायनाकुलर देऊन खाली क्वार्टर डेकमधील माझ्या मेस डेकमध्ये गेलो. जेवण केल्यानंतर परत अपर डेकवर येऊन दूर क्षितिजाकडे शून्य नजरेने पाहत बसलो. थंड वारा अंगाला झोंबत होता. चांदण्यांची रात्र होती. जहाज आपल्या गतीने पुढे पुढे जात होते. जहाजाच्या गतीप्रमाणे माझे मनही मार्सेलीनमधील जेनीच्या सहवासातील दिवस आठवत होते. जेनी माझी अतिप्रिय मैत्रीण. मी परदेशातून परत आल्यावर आम्ही लग्न करायचं असं ठरवलं होतं.

नेपोलियन बोनापार्ट क्रूझर पूर्वेकडे असलेल्या कोरिया या देशाकडे दक्षिण कोरिया व उत्तर कोरियाच्या युद्धामध्ये अमेरिकेला मदत करण्याकरिता जात आहे हे मला दोन दिवसांच्या सेलिंगनंतर जहाजावरील सिनियर नौसैनिकांकडून कळले. त्या लढाईत नॉर्थ कोरियाने अमेरिकेची अनेक जहाजे बुडविली होती हे पण मला काहीजणांकडून कळले. हे कळताच आमचे नेपोलियन बोनापार्ट जहाज परत फ्रान्सला येईल की नाही? का तिकडेच युद्धात नष्ट होईल? हा एकच विचार माझ्या मनात एकसारखा येत होता. रोज संध्याकाळी जहाजाच्या डेकवर एकांतात बसून मी विचार करीत होतो की, माझी जेनी मला परत दिसणार की नाही?

सेलिंगचा पाचवा दिवस होता. संध्याकाळी नेहमीप्रमाणेच जहाजाच्या क्वार्टर डेकवर बसलो असताना माझ्या शेजारी माझा मित्र फ्रान्सिस येऊन बसला. ‘कसला एकसारखा विचार करतोस?’ असे त्याने विचारताच मी मनातील भीती त्याला सांगितली. हे पण सांगितले की, दोन क्रूझर जी कोरियाला गेली होती ती परत आली नाहीत. त्यांना तिकडेच जलसमाधी मिळाली. या जहाजावरून पळून जावे असा एकसारखा विचार मी करीत आहे. पण कसे व कोठून पळायचे हा एकच विचार मला सतावीत आहे. माझा पळून जाण्याचा विचार फ्रान्सिसला पटला होता. तो पण माझ्याप्रमाणेच जहाजावरून पळून जाण्यास उत्सुक होता.

सातव्या दिवशी जहाज सकाळीच कैरोला पोचले. तेल व पाणी घेतल्यानंतर दुपारी जहाज कोलंबोकडे जाण्यास निघाले. तयारी नसल्यामुळे कैरोहून पळून जाता आले नाही. कोलंबोहून पळून जाण्याकरिता आम्ही त्या संध्याकाळी अपरडेकवर बसून योजना आखली. फ्रान्सिसला जहाजाचे सेलिंगचे वेळापत्रक माहीत होते. कोलंबो ऑईल जेटीवरून तेल घेतल्यानंतर जहाज ऑईल जेटीवरूनच भर समुद्रात जाण्यास निघणार होते. कोलंबोला पोचण्याअगोदर चारपाच दिवसांकरिता आपल्याला लागणार्‍या खाद्यवस्तू क्वार्टर डेकवरील पोर्ट साईडच्या एका राफ्टमध्ये स्टोअर करून ठेवायच्या. जहाज जेव्हा पहाटे चार वाजता ऑईल जेटीवरून बाहेर जाण्यास निघेल तेव्हा अंधाराचा फायदा घेऊन राफ्टला दोरीवर वजन घेऊन पाण्यात सोडायचा व आपण त्याच दोरीच्या सहाय्याने पाण्यात सोडलेल्या राफ्टवर आरूढ व्हायचे. जहाज पुढे गेलेले असेल तेव्हा पाठीमागे आपणच असणार. वल्ह्यांच्या सहाय्याने राफ्टला किनार्‍याकडे वल्हवीत न्यायचे. किनारा जवळच असल्यामुळे थोड्याच वेळात आपण किनार्‍यावर पोचू. सकाळ होताच कोलंबोमधील फ्रान्सच्या कौन्सुलेटला भेटून सांगायचे की, आम्ही नेपोलियन बोनापार्ट या जहाजावर पहाटे काम करीत असताना पाण्यात पडलो. जहाज खूप पुढे गेल्यामुळे आम्हाला फ्रान्सला परत पाठविले जाईल, असा आम्ही प्लॅन केला. आम्ही जहाजावर नसल्यामुळे आमची शोधाशोध होईल व शेवटी जहाजावरून फ्रान्समधील नेव्हल हेडक्वार्टरला कळविण्यात येईल की, जहाजावरील दोन नौसैनिक रिचर्ड व फ्रान्सिस मिसिंग, बहुतेक ओवर बोर्ड झाले असतील.

शेवटी तो दिवस आला. जहाज चार वाजता कोलंबो हार्बर सोडणार म्हणून तीन वाजताच हॅन्डस कॉल म्हणजे सगळ्यांना उठविण्यात आले. जहाज ऑईल जेटीवर होते. बरोबर चार वाजता जहाजाने पुढचे व पाठीमागचे रोप सोडले व पुढून येणार्‍या वार्‍याला हेडवर ठेवून जहाजाच्या हेड स्टारबोर्डला बाहेर घेतले. पूर्ण जेटीपासून दूर होताच जहाजाने स्लो स्पीड ठेवून पुढे जाण्यास गती घेतली. शंभर-दीडशे मीटर जहाज जेव्हा पुढे गेले तेव्हा आम्ही क्वार्टर डेकवरील राफ्ट पाण्यात सोडला व अंधाराचा फायदा घेऊन पाण्यात उड्या टाकल्या.

राफ्टला पकडण्यास आम्हाला दहा-बारा मिनिटे लागली. पोहत पोहत आम्ही शेवटी राफ्टला पकडले व त्यावर बसलो. हातात राफ्टवरील वल्हे घेऊन त्याला किनार्‍याकडे नेण्याचा प्रयत्न करू लागलो. आम्ही जीव तोडून वल्हवीत होतो, पण किनार्‍याकडे राफ्ट कसाच जात नव्हता. उलट तो भर समुद्राच्या बाजूला सरकत होता. वल्हवून वल्हवून आमच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या, पण राफ्ट किनार्‍याच्या दिशेने कसाच जात नव्हता. शेवटी आमच्या लक्षात आले की समुद्राला ओहोटी आहे व ओहोटीचे पाणी दक्षिणेकडे वाहत आहे. वल्हवून वल्हवून आम्ही थकलो होतो. शरीरात त्राण उरले नव्हते. राफ्ट ओहोटीच्या पाण्यावर वाहत दक्षिणेकडे जात होता. उजाडले तेव्हा आम्हाला किनारा दिसत नव्हता. चारी बाजूंनी अफाट हिंदी महासागर व वर निळे आकाश. आमची योजना फसली होती. पाण्यात राफ्ट सोडीपर्यंत आमचा प्लॅन व्यवस्थित होता. राफ्टवर तीनचार दिवस पुरतील एवढेच खाद्यपदार्थ टीनमध्ये होते. पाणी पण एकदोन लीटरच होते.

राफ्ट वाहतच होता. दिवसभरात आम्हाला एकही जहाज दिसले नाही. पण संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सूर्याच्या लाल-पिवळ्या बिंबावर एका जहाजाची काळी आकृती दिसली. खूप दूर होते ते जहाज. अंगातील शर्ट काढून ते हाताने हलवून आम्ही त्या जहाजाला इशारा करीत होतो. पण त्या जहाजाचे लक्ष आमच्याकडे गेलेच नाही. काही वेळाने ते जहाज दृष्टीआडही झाले. हळूहळू अंधार पडू लागला. गार वारा अंगाला झोंबत होता. दात एकमेकांवर आपटत होते. राफ्टवरील कॅनोपी (छत) जेव्हा वर केले तेव्हा जरा बरे वाटले. अंधार पूर्ण पडला होता. रात्र चांदण्यांची असल्यामुळे दूरवरचे क्षितिज दिसत होते. फ्लाईंग फिश उड्या मारताना दिसत होते. काही राफ्टमध्ये पडत होते. ती रात्र पाण्याच्या प्रहावाबरोबर आम्ही फरफटत वाहतच होतो. हातातील रिस्ट वॉचमध्ये कंपास असल्यामुळे दिशा कळत होत्या.

दुसर्‍या दिवशी समुद्राचे पाणी संथ होते. अगदी आरशासारखे. कुठेही वर आलेली लाट दिसत नव्हती. संथ पाण्यावरून काळेकुट्ट असे मोठमोठे व्हेल मासे वर डोके काढून परत पाण्यात जात असताना दिसत होते. आमच्या जवळपास ते काही येत नव्हते; पण त्यांना पाहिल्यावर भीती वाटत होती. सूर्य पूर्ण वर आला होता. पाण्याला म्हणावा तसा प्रवाह नव्हता. राफ्ट एकाच ठिकाणी उभा असल्यासारखा वाटत होता. दुपारी ब्रेडला बटर व जॅम लावून आम्ही भूक भागवली. सूर्य पश्‍चिमेकडे झुकू लागल्यावर वार्‍याचा वेग वाढला होता. लाटा पण वर येऊ लागल्या होत्या. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी एक काळाकुट्ट व्हेल मासा आमच्याभोवती फेर्‍या मारत असताना आम्ही पाहिला. तो एकसारखा फेर्‍या का मारतो याबद्दल आम्हाला कुतूहल वाटले. सूर्य जेव्हा पूर्ण पाण्यात गेला त्या वेळेला एक सफेद रंगाचा लांबलचक दहाबारा फुटांचा मासा आमच्याकडे वेगाने तीरासारखा येत असताना फेर्‍या मारणार्‍या त्या व्हेल माशाने त्याच्यावर झडप घातली व त्याला दूर पळवले. तो शार्क मासा होता. फ्रान्सिसने कुठेतरी वाचले होते की, व्हेल मासा माणसाचे शार्क माशापासून रक्षण करतो, ते आज आम्हाला पटले.

राफ्ट हळूहळू पूर्वेच्या दिशेने वाहत होता. ब्रेडला बटर व जॅम लावून आम्ही भूक भागविली. त्या रात्री समुद्र खूपच खवळलेला होता. वारा थंड वाहत होता. राफ्टची कॅनोपी वर करून ती रात्र आम्ही जवळजवळ जागूनच काढली.

तिसर्‍या दिवशी पण समुद्र खवळलेला होता. मोठमोठ्या लाटांवरून राफ्ट हेलकावे खात होता. वादळच होते ते. राफ्ट वादळामुळे गोलगोल फिरत होता. आणि एक भयानक अशी लाट आली. त्या लाटेने राफ्ट उलटा झाला. आम्ही दोघेही पाण्यात फेकले गेलो. राफ्टमध्ये काही खाद्यवस्तू होत्या त्या पण पाण्यात गेल्या. पाण्याचा कॅन होता तो पण पाण्यात पडला. त्या भयानक तुफानी वादळात आम्ही जवळजवळ दोन तास पाण्याबाहेरच राफ्टच्या बिल्जरेलला धरून होतो. तुफानाचा प्रभाव जसा कमी झाला, आम्ही मोठ्या मेहनतीने उलटलेला राफ्ट सरळ केला. राफ्टमध्ये खाण्यासारखे आता काहीच उरले नव्हते. प्यायलाही पाणी नव्हते. ती रात्र वैर्‍याची होती. राफ्टची कॅनोपी वर करून आम्ही रात्रभर राफ्टवर पडून होतो. पोटात कावळे ओरडत होते.

सकाळी समुद्र शांत होता. फ्रान्सिस दूर सूर्योदय होत असलेला पाहत होता. अचानक त्याला जवळच उजव्या बाजूला एक जहाज अर्धे वर व अर्ध्ये पाण्याखाली अशा स्थितीत असल्याचे दिसले. जवळच होते ते जहाज. वल्हे बाहेर काढून आम्ही त्या जहाजाच्या दिशेने वल्हवायला सुरुवात केली. शरीरात शक्ती नव्हती, तरी पण जीव तोडून आम्ही वल्हवीत वल्हवीत त्या जहाजाजवळ पोचलो. राफ्टला दोरीने जहाजाच्या साईडला बांधून त्या जहाजावर चढलो. आशा होती काहीतरी खायला मिळेल. जहाजाच्या पेन्ट्रीमध्ये काही बियरच्या बाटल्या होत्या. टीनमध्ये फ्रुट्‌स व फिश पण होते. खूप काही होते… आम्हाला सणकून भूक लागली होती. आम्ही भराभर खूप काही खाल्ले. खूप बरे वाटले. फ्रान्सिस म्हणाला, आता आपण काही दिवस याच जहाजावर राहूया. जवळून जाणार्‍या एखाद्या जहाजाला इशारा करून आपल्याला त्या जहाजाची मदत घेता येईल. जहाज जवळ जवळ अर्धे पाण्यात बुडाले होते. केबिनमध्ये कुशन व बेडशीट पण होत्या. आम्ही चार दिवस त्या जहाजावर होतो. खाण्यापिण्याची आमची चंगळ होती. पण त्या चार दिवसांत आम्हाला एकही जहाज दिसले नाही. आणखीन किती दिवस आपण या जहाजावर राहणार… कोणतेही जहाज जवळपास नाही आले तर आपण इथेच या जहाजावर मरणार. खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू होत्या त्या जास्तीत जास्त आणखी साताठ दिवस पुरतील, नंतर काय? या विचारात मी एकटाच डेकवर बसलो होतो. पाणी जहाजावर नव्हतेच. बियरच्याच बाटल्यांनी तहान भागवत होतो. मी दूर क्षितिजाकडे शून्य नजरेने पाहत असताना धावतच फ्रान्सिस जवळ आला व म्हणाला, पुढे हेडवर पोर्ट साईडला जे छिद्र होते ते फारच मोठे झाले आहे व पाणी भराभर आत शिरत आहे. संध्याकाळपर्यंत जहाजात पाणी भरले तर हे जहाज पूर्ण पाण्यात बुडणार व आपणालाही जलसमाधी मिळणार. संध्याकाळच्या पाचच्या सुमारास जहाजाचा पुढचा भाग पूर्ण पाण्यात बुडाला होता. फक्त पाठीमागचा थोडासा भाग पाण्यावर होता. काही तासांत तो पण बुडणार म्हणून जहाजावर ज्या काही खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या त्या आम्ही बरोबर घेऊन सूर्यास्ताबरोबरच राफ्टवर खिन्न मानाने आरूढ होऊन राफ्ट जिकडे नेईल तिकडे जाण्याचा निर्धार केला. साताठ दिवस पुरेल एवढे खाण्याचे साहित्य होते. काही बियरच्या बाटल्या व काही डब्यातील मटण व मासे पण होते. समुद्र शांत असल्यामुळे राफ्टमध्ये त्या रात्री चांगलीच झोप लागली. अधूनमधून समुद्र खवळलेला मिळायचा. त्या जहाजापासून दूर झाल्यापासून पाचव्या की सहाव्या दिवशी फ्रान्सिसला खूपच ताप आला. चारपाच दिवस त्याचा ताप तसाच होता. त्याच्या शरीराची हालचाल बंद होत होती व शेवटी त्या विखारी तापामुळे त्याने शेवटचे डोळे मिटले. काय करावे तेच मला सुचत नव्हते. त्याच्या दिवंगत शरीराकडे मी पाहतच होतो. आणखी किती दिवस असेच या अफाट सागरावर मला राहावे लागणार होते देवास माहीत. फ्रान्सिसप्रमाणे माझा पण मृत्यू अटळ आहे असे मला वाटू लागले होते. येशू ख्रिस्ताची प्रार्थना करून मी फ्रान्सिसचे शव पाण्यात विसर्जित केले.

आता मी एकटाच राफ्टवर राहिलो. बहुतेक वेळा राफ्टवर आडवा पडूनच होतो. बसायलासुद्धा त्राण नव्हता. त्या बुडत असलेल्या जहाजावरून आणलेले खाद्यपदार्थ आता संपले होते. मधून मधून फ्लाईंग फिश उडून राफ्टवर पडत ते कच्चेच खाऊ लागलो. पाण्यावरच्या शेवाळात सुंगटे अडकत, ती पण मी कच्चीच खाऊन पोटाची खळगी भरू लागलो. शरीरात त्राण असेपर्यंत मी पाण्यावरील शेवाळात अडकलेली ती सुंगटे खाऊन राफ्टवर आडवा पडायचो. जवळ जवळ बेशुद्धच होतो. असे कितीतरी दिवस मी त्या राफ्टवर बेशुद्ध स्थितीत होतो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी जकार्ताच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये आहे हे मला कळले. जकार्तातील मच्छीमाराला मी बेशुद्ध अवस्थेत सापडलो व त्याने मला इथे या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा समोर इंडोनेशियन नेव्हल युनिफार्ममधील डॉक्टर व काही नर्सेस नजरेस पडल्या. मी पूर्ण शुद्धीवर आलो तेव्हा एका नर्सने मला सांगितले की मी एका राफ्टवर बेशुद्धावस्थेत होतो.

हळूहळू मला सर्व आठवायला लागले. ४ एप्रिल १९५६ रोजी कोलंबोहून मी व फ्रान्सिसने राफ्टच्या साह्याने जहाजावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण आमचा प्लॅन फसला होता. समुद्राला ओहोटी असल्यामुळे आम्ही किनार्‍यावर येऊ शकलो नाही व बरोबर एक महिन्याने ३ मे रोजी इंडोनेशियाच्या किनार्‍यावर पोचलो. दुःखद घटना म्हणजे फ्रान्सिसचे निधन.

थोड्याच दिवसांनी मला हॉस्पिटलमधून डिचार्ज मिळेल. मला फ्रान्सला पाठविले जाईल. जहाजावरून पळून गेल्यामुळे कोर्ट माशेल होईल, शिक्षा पण कदाचित होईल. जेनीशी लग्न करीन व तीस दिवसांचे भर समुद्रावरील अनुभवाचे पुस्तक लिहीन. हे सर्व रिचर्ड आपल्या मोडक्यातोडक्या इंग्रजीत मला सांगत होता.

संध्याकाळचे सहा वाजले होते. पेशंटला भेटण्याची वेळ संपल्यामुळे आम्ही त्याची ती साहसपूर्ण रोमांचकारी कथा ऐकून हॉस्पिटलबाहेर पडलो.