मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जिल्हा इस्पितळ पीपीपी तत्वावर देण्यासाठी आलेल्या निविदांवर फेर अभ्यास करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे सरकारची सल्लागार समिती त्यावर अभ्यास करून अहवाल सादर करील. आपण दिल्लीत जाऊन सॉलिसीटर जनरलचाही सल्ला घेतला आहे.
त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले आहे. परंतु न्यायालयाने इस्पितळ पीपीपी तत्वावर सुरू न करण्याचा कोणताही आदेश दिलेला नाही. त्यामुळे त्यासंबंधीचा निर्णय समितीच्या अहवाल आल्यानंतर घेतला जाईल, असे राणे म्हणाले. आझिलो इस्पितळ नव्या इमारतीत हलविण्यात येत असले तरी तेथे आयसीयू, सीसीयू या सुविधा उपलब्ध होणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे ते म्हणाले.
जिल्हा इस्पितळ पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी रेडिएन्ट, शेल्बी व अपोलो या तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यामुळे सरकारची समिती या तिन्ही निविदांवर फेरअभ्यास करील, असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत दि. ३०पर्यंत यासंबंधीचा प्रश्न सुटला पाहिजे, असे आपण संबंधित अधिकार्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.
फोंडा येथील नव्या इस्पितळाची इमारत पूर्ण झाली आहे. परंतु विजेच्या व पाण्याच्या जोडण्या देण्यास विलंब झाल्याचे त्यांनी सांगितले. या कारणामुळेच इस्पितळ रखडल्याचे ते म्हणाले.
‘पर्रीकरांचे आरोप वैफल्यग्रस्ततेतून’
विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांना स्वत:च्या आमदारांना सांभाळणे शक्य होत नाही त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन वाटेल तसे आरोप करीत असल्याचा आरोप आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल केला. आपल्या पक्षातून आमदार का बाहेर पडत आहेत, याची विरोधी नेत्यांनी कारणे शोधून काढावीत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री असताना पर्रीकर यांनी डिचोली मतदारसंघात कोणताही विकास केलेला नाही. विकास हा राजेश पाटणेकर यांच्यासमोर महत्त्वाचा विषय होता. त्यामुळेच त्यांनी भाजप सोडला आहे. अद्याप त्यांनी कॉंग्रेस प्रदेश केलेला नाही. कॉंग्रेस प्रवेशानंतर त्यांना पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
खासदार श्रीपाद नाईक हे पर्रीकर यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. नाईक यांना डिचोलीतूनच नव्हे तर वाळपई मतदारसंघातही उमेदवारी दिल्यास काहीही फरक पडणार नाही. डिचोली मतदारसंघातून पाटणेकर निश्चितच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटणेकर यांच्या राजीनाम्या मागे कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही, असे राणे म्हणाले.