– प्रा. हेमंत अय्या
‘भारत’कार गोविंद पुंडलिक हेगडे-देसाई यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८५ रोजी झाला. नुकतीच त्यांची १२७ वी जन्मतिथी पार पडली. हेगडे-देसाई यांनी नोव्हेंबर १९१२ मध्ये ‘भारत’ हे मराठी व पोर्तुगीज भाषेतले द्विसाप्ताहिक जन्माला घातले. पुढची ३७ वर्षे हे द्विसाप्ताहिक त्यांनी समर्थपणे चालविले. पण या समर्थपणामागे त्यांच्या जीवनाची जी आहुती पेटली, त्याची झळ मात्र अद्यापही गोमंतकीयांना नाही.
‘‘लोकाराधना अथवा सरकारी प्रेम संपादण्याचा विचार आमच्या मनात केव्हाच शिवलेला नाही. केवळ देशकल्याण व राष्ट्रीय तत्त्वांचा प्रसार याच दुहेरी उद्देशाने ‘भारत’ चालवण्याची कंटकमय जबाबदारी आम्ही आमच्या शिरावर घेऊन ती कसलीच भीडमुर्वत न राखता पार पाडीत आलो आहोत.’’ हे ‘भारत’कार कै. गोविंद पुंडलिक हेगडे-देसाई यांचे उद्गार! एकंदरीत ‘भारत’ चालविण्यामागचे त्यांचे प्रयोजन, हेतू आणि ‘भारत’ या वृत्तपत्राच्या जन्माबाबत एका पत्रकाराने केलेली कारणमीमांसा!
बर्याच प्रमाणात इ.स. १९१२ नंतरच्या काळात चिपळूणकर, टिळक, आगरकर अशा विभूतींचा वारसा गोमंतकात ‘भारत’च्या माध्यमातून हेगडे-देसाईंनी पुढे नेल्याची साक्ष देतात. माझ्या वाचनात आलेल्या एका लेखात श्री. संजय ढवळीकर यांनी हेगडे-देसाईंना गोव्याचे लोकमान्य टिळक असे म्हटलेले आहे. श्री. ढवळीकर यांचे हे मत यथोचित होय.
आम्हा गोमंतकीयांचे इतिहासप्रेम अन्य भारतीयांच्या तुलनेत फारच उथळ. हा दोष; तसाच तो आमच्यातला गुणही. कारण अनेकदा इतिहास आपल्या समृद्ध अशा जीवनाची साक्ष पटवून देतो, तर काही वेळा हा इतिहासच वर्तमान किंवा भविष्यातील सामाजिक- सांस्कृतिक संग्रामाचे कारण ठरतो. माझ्या मते गोमंतकाच्या इतिहासातून असे अनेक खंड गहाळ झालेले आहेत, जे शोधण्याचा प्रयत्न संशोधकाला आणि पर्यायाने समाजालाही धोक्यात टाकू शकतो. परंतु अशा परिस्थितीत आपल्या इतिहासातील अनेक चांगली पाने कळत-नकळत काळाच्या पडद्याआड होतात; आणि त्यांतलेच एक पर्व म्हणजे ‘भारत’कार गोविंद पुंडलिक हेगडे-देसाई.
१९९९ साली ‘गोमंतक मराठी अकादमी’ने एक सुलभ योजना राबविली. त्यांनी ‘भारतकार हेगडे-देसाई यांचे निवडक अग्रलेख’ नावाचे दोन खंड प्रकाशित केले, ज्यांचे संपादन कै. शशिकांत नार्वेकर यांनी केले. आणि विस्मृतीत गेलेले भारतकार या दोन खंडांच्या रूपाने पुन्हा वाचकांच्या भेटीस आले. यांपैकी पहिल्या खंडातील प्रस्तावनेत कै. शशिकांत नार्वेकर लिहितात- ‘‘टिळक- आगरकर यांच्या पत्रकारिता परंपरेबद्दल उत्साहाने, अभिमानाने नि आदराने नेहमी बोलले जाते. अभिमानाने बोलावे अशीच ती पत्रकारिता होती. ती पत्रकारिता म्हणजे अग्निज्वालेसारखी तेजस्वी होती! अशा त्या अग्निज्वालेत उडी घेणे म्हणजे स्वतःला जाळून घेणे होते! जळणं हेच त्या पत्रकारितेचं कर्म होतं नि भूषणही. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रात त्या अग्निज्वाला पत्रकारिता परंपरेतील अनेक पत्रकार दिसतात. गोमंतकातही विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात त्याच परंपरेतला एक पुरुषार्थी मराठी पत्रकार अग्निज्वालेत उभा असलेला दिसतो. त्या झुंजार मराठी पत्रकाराचे नाव होते- ‘भारत’कार कै. गो. पुं. हेगडे-देसाई.’’
भारतकारांच्या चरित्रावर चर्चा करणे हे माझे प्रस्तुत लिखाणामागचे प्रयोजन नाही. भारतकारांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यांमधले फरक दर्शविणे इथवर अभिप्रेत आहे. उपरोक्त दोन्ही अवतरणे त्या अर्थी मला महत्त्वाची वाटतात. कारण ती दोन्ही अवतरणे भारतकारांची ‘लेखनभूमिका’ आणि त्यांच्या ‘पत्रकारितेचा पिंड’ या दोहोंची यथोचित साक्ष पटवून देतात.
निरीक्षण, चिंतन, संवेदनशीलता, सामाजिक भान, तटस्थ वृत्ती असे गुण पत्रकाराच्या ठिकाणी असणे अत्यंत गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार स्वतःची लेखनशैली आणि विचारसरणीमध्ये योग्य ते बदल करून घेणे हे त्याचे कार्य आहे. आणि अपवृत्तींचे दर्शन सामान्यातील सामान्याला घडवून देऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे हे त्याचे कर्तव्य! आजचा पत्रकार वरील गोष्टींचा अवलंब करून पत्रकारिता करतो की पत्रकारिता हे एक प्रोफेशन बनले आहे, असा प्रश्न मला सतत पडतो. आधुनिकीकरण, व्यवसायीकरण आणि त्याही पुढे जाऊन बाजारीकरणाचे पडसाद पत्रकारितेवरही पडलेत की काय, असा प्रश्न मनात उत्पन्न होतो. कारण ‘अमुक एका घटनेवर आम्ही असा आवाज उठविला आणि त्याचा असा परिणाम झाला’ यांसारख्या स्वतःचीच पाठ थोपटून घेणार्या बातम्या आठवड्यातून एक-दोनदा तरी वाचायला मिळतात.
वस्तुतः भारतकारांची पत्रकारिता आणि आजची पत्रकारिता यात तुलना होणे शक्यच नाही, हे इथवर प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते. कारण दोन्ही कालखंड वेगळे. दोहोंच्या कालखंडांत आजच्या घडीला जवळपास १०० वर्षांचे अंतर. राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती वेगवेगळी. पुन्हा आजचा वाचकवर्ग तोही त्या तुलनेत वेगळाच. आस्थेने वाचन करणारे वाचक फारच तुरळक. अशा वेळी तुलना व्हावी ती तरी कशी? पण या दोन्ही बाजूंच्या पारड्यांमध्ये एक बाब समांतर, आणि ती म्हणजे पत्रकारिता!
आधी उल्लेखिलेल्या पत्रकाराच्या गुणांमधल्या ‘अतिसंवेदनशीलता’ आणि ‘तटस्थ वृत्ती’ या दोन गुणांचा पुनर्उल्लेख इथवर मला करावासा वाटतो. या दोन गुणांबरोबरच ‘समर्पितता’ या भावालाही तितकेच महत्त्व आहे, जे आजच्या पत्रकारितेतच नव्हे तर संपूर्ण जीवनातही फारच तुरळक प्रमाणात आढळते. ‘फ्लॅट’ संस्कृतीत अगदीच ‘फ्लॅट’ होऊन समाजाचे हित साधण्याचे संकल्प एखादा पत्रकार आखतो, ही कल्पनाच माझ्या मनाला विलक्षण वाटते. पण अशा वेळी फक्त आजच्या पत्रकारांवरच तोफ डागण्यात अर्थ तो काय?
‘भारत’कालीन गोमंतक परकीय सत्तेच्या जुलमांखाली होरपळत होता. या होरपळीविरुद्ध उठणारा प्रत्येक ध्वनी नष्ट करण्याचा प्रयत्न पोर्तुगिजांकडून व्हायचा. पोर्तुगिजांच्या नाच्यांबरोबरच सामाजिक रूढी-परंपरांचा दाहही समाजातील काही गटांना सहन करावा लागायचा. या सर्वांचे निरीक्षण भारतकारांचे संवेदनशील मन करीत होते आणि त्यानंतर ‘भारत’च्या माध्यमातून तटस्थ भाष्य करीत होते.
मराठी अकादमीने भारतकारांचे जे अग्रलेख प्रकाशित केलेत त्या सर्व लेखांमधून भारतकारांची ही तटस्थ वृत्तीच स्पष्टपणे जाणवते. इतिहासाने ‘भारत’ आणि भारतकारांच्या कार्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही किंवा भारतकार हे पान काळाच्या पडद्याआड विस्मृतीत गेले. या मागचे एक कारण भारतकारांची ही तटस्थ वृत्ती हेच असू शकते. कारण भारतकारांअगोदरही परकीय सत्तेविरुद्ध आग ओकणार्या लेखनाला आज इतिहासाने मानाचे स्थान दिलेय. तसे स्थान भारतकारांच्या लेखनाला न मिळण्याचे कारण त्यांची तटस्थ वृत्ती हे असणे संभव आहे. या तुलनेत आजच्या पत्रकारितेत संवेदनशीलता आणि तटस्थ वृत्ती या दोहोंचाही अभाव स्पष्टपणे जाणवतो हे नाकारता येणार नाही.
भारतकारांच्या जीवनातील काही घटना इथवर प्रकाशात आणाव्या वाटतात. कावरे येथील शेतकर्यांची शेतजमीन कॉस्टा नावाचा इसम हडप करू पाहत होता. कावरे गावातील शेतकरी आणि त्यांच्या शेतजमिनी पूर्णपणे कॉस्टाच्या तावडीत आलेल्या. अशा प्रसंगी सदर घटनेला भारतकारांनी ‘भारत’मधून वाचा दिली आणि शेवटी कॉस्टाला शेतजमिनीचा नाद सोडावा लागला. भारतकारांच्या ‘भारत’मधल्या लेखनामुळे हे शक्य झाले.
भारतकारांचा ‘वेश्या व्यवसायाचे उच्चाटन’ नावाचा एक अग्रलेख माझ्या वाचनात आला. या अग्रलेखात त्यांनी वैश्विक पातळीवरील वेश्याव्यवसायाचे परिमाण सांगून आपल्या समाजातील रूढी-परंपराबद्ध अशा वेश्याव्यवसायाबद्दलची हळहळ ते व्यक्त करतात. भारतकार फक्त रायटर नव्हते तर ते फायटरही होते, म्हणूनच ते फक्त उपरोक्त विषयी लेखन करून थांबले नाहीत, तर त्यांनी पुढाकार घेऊन देवदासी समाजातील मुलींची लग्नेही लावून दिली. देवदासी समाजातील मुलींची लग्ने लावणे हे त्या काळातील भारतकारांनी उचललेले क्रांतिकारी पाऊलच होते. अर्थात, त्यांना त्यांच्याच समाजातील लोकांचा रोष आणि दाहही सहन करावा लागला. आजचा पत्रकार फक्त लिहितो….? की लेखनापुढे जाऊन तो आणखी काही करतो? हा प्रश्नही इथवर उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.
‘प्रतिभा’, ‘बहुश्रुतता’ आणि ‘अभ्यास’ ही वाङ्मय निर्मितीमागची कारणे म्हणून नोंदवली जातात. अर्थातच प्रतिभासंपन्न माणूसच पत्रकारितेकडे वळू शकतो. (प्रतिभेचे प्रमाण कमी-अधिक असू शकते.) परंतु ‘बहुश्रुतता’ आणि ‘अभ्यास’ या दोन गोष्टींमध्ये आजचा पत्रकार कमी पडतो. भारतकारांचे अग्रलेख, त्यांनी हाताळलेल्या विषयांतील वैविध्य, त्यांची भाषा, एखादी गोष्ट वाचकांस पटवून सांगण्यासाठी त्यांनी वापरलेली उदाहरणे, शाब्दिक कोट्या, विविध संदर्भ यांचा विचार केल्यास भारतकार किती बहुश्रुत आणि अभ्यासू होते याची कल्पना सुज्ञ वाचकांस आल्याखेरीज राहत नाही.
आजच्या पत्रकाराला गटबाजीतून दूर राहणे कितपत शक्य होते, हे एखादा आजच्या काळातला प्रामाणिक पत्रकारच सांगू शकेल. परंतु अनेकवेळा पत्रकाराला पाण्यात राहूनही कोरडे राहता आले पाहिजे, आणि अनेकदा त्याला आपले वेगळे-अलग असे अस्तित्वही सांभाळता आले पाहिजे. श्री. सुहास सावर्डेकर यांच्या भारतकारांवरील पुस्तकात सावर्डेकरांनी भारतकारांविषयी एक घटना सांगितली आहे. ते लिहितात की भारतकारांनी एका दलिताकडे जाऊन सत्यनारायणाची पूजा केली आणि त्यांच्याबरोबर पंक्तीत बसून भोजनही केले. गटबाजीतून दूर असलेले भारतकार इथवर दृष्टीस पडतात. याचेच पडसाद पुढे त्यांच्या लेखनावरही उमटलेले आहेत. म्हणूनच पुढे जाऊन भारतकार ‘अस्पृश्यता दूर करा!’ या नावाचे अभ्यासपूर्ण आणि वैचारिक असे चार विस्तीर्ण लेख लिहितात.
भारतकारांच्या लेखनगुणांपैकी मला सर्वांत जास्त स्पर्श करून गेलेला त्यांच्यातील गुण म्हणजे त्यांच्या लेखनातील ‘आक्रमकता.’ पुन्हा ही आक्रमकता प्रबळ अशा वैचारिक बैठकीवर विराजमान आहे हे लक्षात घेणे तेवढेच गरजेचे. एकंदरीत हिंदू प्रथा, जीवन जाणिवा आणि हिंदू माणूस याबद्दलचे प्रक्षोभक लेखन ‘पोर्तुगेज साम्राज्य’मधून झाले. त्या पार्श्वभूमीवर ‘जशास तसें!’ नावाच्या एका अग्रलेखात भारतकार लिहितात- ‘‘पोर्तुगेज साम्राज्या’त प्रसिद्ध झालेल्या त्या घाणेरड्या व हिंदी लोकांस उपमर्दकारक लिखाणांत फिरंगी संस्कृतीचें मुक्तद्वार आम्हा हिंदी लोकांस बंद करण्याची भीती घातलेली आहे! पण ख्रिस्ती धर्मसमीक्षण सभेने येथे बजावलेली रूधिरप्रिय कामगिरी, तसेच पोर्तुगेज लोकांनी येथील हिंदू देवालयांचा केलेला विद्ध्वंस या दोनच गोष्टी त्यांच्या संस्कृतीची अकरणरूपी थोरवी सिद्ध करण्यास पुर्या आहेत.’ असे निर्भीड लेखन आजच्या काळात क्वचितच वाचनात येते.
‘समाचार घ्या!’, ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’, ‘एक सामाजिक प्रश्न- वरदक्षिणा’, ‘हिंदू-ख्रिस्ती ऐक्य’, ‘मद्यपानाचा प्रसार’, ‘जुगार, सरकार व प्रतिकार’, ‘धर्म, जात आणि देश’ यांसारखे अनेक अग्रलेख त्यांच्यातील पत्रकार पिंडाचा परिचय वाचकांना निश्चितपणे करून देतात. त्यांचे सामाजिक भान, संवेदनशीलता, बहुश्रुतता, आक्रमकता, भाषिक ज्ञान अशा अनेक गुणांची पारख सुज्ञ वाचकाला झाल्याखेरीज राहत नाही.
इथवर पुन्हा नमूद करावेसे वाटते की, भारतकार आणि आजचा पत्रकार यांच्यात तुलना अनेक कारणांमुळे अशक्य आहे. परंतु पत्रकारितेचे जे काही गुण मानले अथवा सांगितले जातात, त्यांचे अनुकरण भारतकारांच्या चरित्राच्या आधारे युवा पत्रकारांना करणे शक्य आहे. सामाजिक भान, नीती-अनीती विषयीच्या भूमिका, तटस्थ वृत्ती, निर्भीडपणा, बहुश्रुतता, अभ्यास, समर्पण भाव अशा अनेक गुणांमुळे भारतकार आजच्या गोमंतकीय पत्रकारितेचे आदर्श ठरू शकतात. भारतकार होणे जरी शक्य नसले तरी त्या दृष्टीने प्रयत्न निश्चितपणे शक्य आहे.