चरख्यावर सूत कातून कापड तयार करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना चरखा उपलब्ध करून देण्याची योजना खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हाती घेणार असल्याचे मंडळाचे चेअरमन बेंजामिन सिल्वा यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
चरख्यावर दरदिवशी सहा मीटर एवढे कापड विणता येते असे सांगून जे लोक आपल्या घरी चरख्यावर असे कापड विणण्यास इच्छुक असतील अशा लोकांना चरखे पुरवण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. एकदा या लोकांनी कापड विणले की महामंडळ ते त्यांच्याकडून विकत घेणार असल्याचे ते म्हणाले. खास करून ५० वर्षांवरील गृहिणी ज्यांच्याकडे खूप वेळ असतो अशा गृहिणींना व स्वयंसहाय्य गटांना हे चरखे पुरवण्याचा विचार असल्याचे सिल्वा यांनी पुढे सांगितले.
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे नवे मंडळ अद्याप स्थापन झालेले नसून एकदा ते स्थापन झाले की वरील योजना मार्गी लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खादी आयोगाच्या विविध योजना असल्या तरी त्या योजनांसाठी काम करणार्यांना दिवसाकाठी फक्त ६० रु. एवढे वेतन मिळत असल्याने हे काम करण्यासाठी कुणी पुढे येत नसल्याने त्यांच्या योजना मार्गी लावता येत नसल्याचे दिसून आल्याचे सिल्वा यांनी सांगितले.