महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल आल्तिनो, पणजी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगून अधिक बोलण्याचे टाळले.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आले होते. मुंबईला परत जात असताना त्यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची उपस्थिती होती.
फडणवीस यांनी महाराष्ट्र आणि देशात वाढणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात कोरोनाच्या जास्त बळींची नोंद होत आहे. तसेच, कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला सहकार्य केले जात आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चाचण्या वाढविण्याची गरज आहे, असेही महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सांगितले.