>> सहापैकी तीन गंभीर
>> वीज खात्याचा खांबवाहू ट्रक उलटून दुर्घटना
मडगावहून बोरीमार्गे फोंड्याला परतणार्या वीज खात्याचा खांबवाहू ट्रक तारीभाट-बोरी सर्कलवरील संरक्षक बेटावर उलटल्याने ट्रकच्या हौद्यातील तीन कामगार विजेचे खांब अंगावर पडल्याने चिरडून जागीच ठार झाले. या ट्रकमध्ये एकूण नऊ कामगार होते. जखमी कामगारांना बांबोळीतील गोमेकॉत दाखल केले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात काल गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडला. मृत कामगारांत दोन आमोणेचे व एक खांडोळ्याचा रहिवासी आहे.
मडगाव येथून वीज खांब घेऊन जीए ०१ जी ७५२७ हा ट्रक दुपारी बोरीमार्गे माशेलमध्ये जाताना हा अपघात घडला. या अपघातात माशेल वीज खात्याचे कर्मचारी पुंडलिक फोंडू जल्मी (४५) जल्मीवाडा – खांडोळा, आंबेशीवाडा – आमोणे येथील समीर राजाराम परब (४२) व सगुण लक्ष्मण गावस (३०) हे तिघेजण जागीच ठार झाले. ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने उतरणीवरील वळणावरच ट्रक संरक्षक बेटावर कोसळून उलटला. ट्रकच्या हौद्यात विजेचे दहा मोठे सिमेंटचे खांब होते. हे खांब ट्रक कलंडल्यावर रस्त्यावर विखुरले गेले. हे खांब अंगावर कोसळल्याने तिघेजण ठार तर अन्य सहाजण जखमी झाले. जखमींपैकी ट्रकच्या केबिनमधील एकाला किरकोळ दुखापत झाली. जखमींपैकी प्रणव नाईक (कुंभारजुवे) यांच्यावर तातडीने गोमेकॉत शस्त्रक्रिया करण्यात आली. तर घनःश्याम नाईक (तिवरे) व विनायक गावडे (भोमा) यांना गंभीर जखमी झाल्यने गोमेकॉत दाखल केले आहे. लाडू काणकोणकर (खोर्ली), ट्रकचालक प्रदोष नाईक (शिरोडा) व कामगार समीमुल्ला खान (बेतोडा) यांच्यावर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले.
यावेळी परिसरातील लोक जमा झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या वाहतूक पोलीस निरीक्षक प्रदीप वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत करण्यात आली. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
फोंड्याचे पोलीस निरीक्षक हरीष मडकईकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह बाहेर काढले आणि क्रेनच्या साह्याने रस्त्यावर आडवा झालेला ट्रक आणि रस्त्यावर पडलेले विजेचे खांब संरक्षक बेटावर ठेवले. अपघाताची माहिती मिळताच वीज खात्याचे अधिकारीही घटनास्थळी धावले. मृतदेह रुग्णवाहिकेतून फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात व त्यानंतर गोमेकॉत पाठविण्यात आले. तसेच जखमी व्यक्तींनाही उपचारासाठी बांबोळीला पाठविण्यात आले. बचावकार्यात स्थानिकांनी तसेच रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांनी सहभाग घेतला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.
स्थानिकांचा आंदोलनाचा इशारा
अपघाताचे वृत्त समजताच बोरीच्या सरपंच भावना नाईक, उपसरपंच सुनील सावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने या संरक्षक बेटाकडचा भाग पंधरा दिवसांच्या आत वाहतूक योग्य करावा अन्यथा बोरीवासीय आंदोलन छेडतील, असा इशारा उपसरपंच सुनील सावकर व इतरांनी दिला आहे.
मुख्यमंत्री, वीजमंत्र्यांकडून विचारपूस
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बोरी फोंडा येथे वीज खांबाची वाहतूक करणार्या वीज खात्याच्या ट्रकला भीषण अपघात झाल्याचे वृत्त समजल्यानंतर आपले नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात धाव घेऊन जखमी वीजखात्याच्या कर्मचार्यांची विचारपूस केली आणि संबंधितांना आवश्यक सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी राज्यातील दहावी, बारावीच्या मुलांशी संवादाचा कार्यक्रम रद्द केला आहे.
नुकसानभरपाई देणार ः काब्राल
बोरीतील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वीज कर्मचार्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाईसह सर्व प्रकारचे सहकार्य केले जाणार असल्याचे तसेच जखमी कर्मचार्यांना ते लवकर बरे होण्यासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कर्मचार्यांच्या झालेल्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले. कामगारांना कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा पुरविण्याची गरज आहे. या अपघाताची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी कामत यांनी केली आहे.